पुरानी दिल्ली - चाट आणि फास्ट फूड

पुरानी दिल्ली - चाट आणि फास्ट फूड

युवा विवेक    08-Dec-2023
Total Views |

पुरानी दिल्ली - चाट आणि फास्ट फूड

ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते काही उगाच नाही. पुरानी दिल्लीबद्दलचा हा तिसरा लेख आहे. जितके लिहावे आणि जितके खावे तितके कमीच आहे. आज आपण काही प्रसिद्ध दुकाने आणि त्यांच्या स्पेशॅलिटीज कोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत.

सीताराम बाजारात एक भलेमोठे आम्लेटही मिळते. सिकंदर ऑम्लेटचे व्हिडीओ तुम्ही कदाचित सोशल मीडियावर पाहिले असतील. या दुकानाचे मालक सिकंदरजी यांनी आपल्या वडिलांचा हा बिझनेस पुढे नेला आणि वेगवेगळे प्रकार सुरु केले. 'डबल योक' असलेल्या अंड्यांचे आम्लेट, पिझ्झा आम्लेट, केसर आम्लेट (दौलत कि चाट आम्लेट) असे वेगवेगळे प्रकार दिल्लीच्या स्पेशल मसाल्यांसोबत बनवले जाते आणि खूप लोक दुरून इथे याचा आस्वाद घेण्यासाठी येतात. दौलत कि चाट आम्लेटमध्ये एग व्हाईट whipped करून त्याचे ऑम्लेट बनवतात.

टिळक नगरमध्ये एक सरदारजी अंडा कुल्फी विकतात. कोरियन कुल्फी म्हणतात आणि त्यासाठीचे मशीन त्यांनी बँकॉकमधून आणले आहे. तिकडे बनणारा हा पदार्थ त्यांनी भारतीय मसाले टाकून बनवला आणि लोकांना तो आवडतो आहे. चिकन सॉसेज कुल्फीच्या काडीवर लावले जाते. अंडे फेटून त्यात मसाले टाकून कुल्फीसारख्या दिसणाऱ्या मशीनमध्ये सॉसेजभोवती टाकले जाते. या मशीनमध्ये अंड्याचे मिश्रण टाकल्यावर टेम्परेचर सेट होऊन कुल्फी लगेच तयार होते. त्यावर परत आवडीचे मसाले टाकून सर्व्ह केली जाते. आता याला कुल्फी म्हणणे चूक आहे. कारण, गोडही नाही आणि थंडही नाही, पण एक वेगळा पदार्थ जो कमी तेल-तुपात बनवला आहे आणि हायजेनिक पद्धतीने बनवला आहे. नक्की खाऊन पाहू शकता. टेक्नॉलॉजिचा इतका छान वापर करून आपल्या भारतीय मसाल्यांचा वापर करून पदार्थ बनवले की मला प्रचंड आनंद होतो! माझ्यातली फूड इंजिनिअर खुश होते. इथेच तळलेले आणि मसालेदार तुफानी मोमोज सुद्धा मिळतात.

सबवे रॅप जर तुम्हाला आवडत असतील, तर रॅप हट नक्की आवडेल. हेल्दी स्ट्रीट फूडमध्ये मोडणारा हा प्रकार आहे. पालक, मसाला, चारकोल असे रॅप आणि त्यात भरपूर भाज्या, भारतीय मसाले टाकून बनवले जातात. अवाकाडो, ब्रोकोली असे प्रीमियम भाज्या तुम्हाला मिळतील. साऊथ इंडियन स्वाद असलेला गन पावडर रॅप इथला प्रसिद्ध आहे. हेल्दी खाऊन कंटाळा आला किंवा आवडत नसेल तर जवळच जस्ट भटुरे नावाच्या एका दुकान सात प्रकारचे भटुरे मिळतात. पनीर, प्लेन, ग्रीन चिली, धनिया, रेड चिल्ली, कसुरी मेथी आणि अज्वायन असे खाकऱ्याचे असतात तसे प्रकार तुम्हाला खायला मिळतील. तसे तर सोपीच रेसिपी आहे; पण मार्केटिंग चांगले आहे. काहीतरी नवीन केले की "एकदा तर खाऊन पाहू या" असे म्हणून बरेच लोक आणि इन्फ्लुएन्सर्स अशा जागी गर्दी करतातच!

चावडी बाजारमध्ये श्याम स्वीट्समध्ये बदामी पुरी प्रसिद्ध आहे. हे दुकान इतके जुने आणि प्रसिद्ध आहे की इथली मटार कचोरी पंडित जवाहरलाल नेहरूंना आवडायची. किंबहुना नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी मटार कचोरी बनवणे सुरू केले. यासोबत मेथीची चटणी, आलू सब्जी आणि चक्क भोपळ्याचे लोणचे खायला देतात. कोणत्याही पदार्थात लसूण आणि कांदा न वापरता तिसरी पिढी हे दुकान चालवते आहे. उडदाच्या डाळीची बेडमी पुरी आणि रव्याची पुरी बनवतात. नागोरी पुरी ही पाणीपुरीच्या सुजी पुरीपेक्षा मोठी पण सध्या पुरीपेक्षा लहान असते. ही पुरी आणि सुजी हलवा खातात. पाणीपुरीसारखं पुरीत हलवा भरून खाल्ला जातो, याला नागोरी हलवा म्हणतात. सकाळी आठला सुरु होणारे हे दुकान रात्री अकरा वाजता बंद होते. इथे मात्र सगळे पदार्थ २-३ घासात संपणारे मिळतात.

हिरालाल चाट कॉर्नर कुलिया चाटसाठी प्रसिद्ध आहे. सफरचंद, काकडी, पपई, अननस, केळे, आंबा यांना पणतीसारखा आकार देऊन त्यात मसाला, उकडलेले वाटाणे, डाळिंबाचे दाणे भरून सर्व्ह करतात. एकही पदार्थ तळलेला नाही आणि तरीही चाट! फ्रुट चाट नेहमी खातो, पण वाटाणे आणि मसाल्यांची चव वेगळी आहे.

इथे अजूनही खूप दुकानं आहेत आणि असंख्य पदार्थ आहेत. मला जे वेगळे वाटले ते मी शब्दांच्या द्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
- सावनी