3 इडियटस…. रियुनियनच्या निमित्ताने !!!

युवा विवेक    08-Feb-2023
Total Views |

3 इडियटस…. रियुनियनच्या निमित्ताने !!!
काही सिनेकलाकृती कालातीत आहेत. कोणत्याही काळातील प्रेक्षक स्वत:च्या आयुष्याचे प्रतिबिंब त्या चित्रपटातील पात्रांमध्ये पाहू शकतो.!!!
"3 इडियटस" हे त्यापैकी एक नाव !!! २५ डिसेंबर २००९ रोजी प्रदर्शित झालेल्या ह्या सिनेमाला आता १३ - १४ वर्षे उलटून गेली आहेत, तरीदेखील आजही पाहताना तो तितकाच ताजातवाना वाटतो. जेवढा तो १४ वर्षापूर्वी होता.
आज हे अचानक आठवण्याच कारण म्हणजे नुकतच शर्मन जोशी अभिनित ' काँग्रेज्युलेशन ' ह्या गुजराती सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी' हे ३ इडियटसमधील गाजलेले त्रिकुट शर्मनच्या एका ट्विटमधून पुन्हा एकत्र दिसले होते.
३ इडियटसचा सिक्वेल येतो की काय अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली होती, पण वस्तुस्थिती तशी नव्हती.
खरं तर प्रख्यात दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहराच्या "रंग दे बसंती" ह्या गाजलेल्या चित्रपटात हे तिघे प्रथम एकत्र झळकले होते. पण ३ इडियटसच्या लोकप्रियतेमुळे "रॅंचो, राजू, फरहान" ह्या तिन्ही पात्रांना भारतीय सिनेमाच्या इतिहासात अढळ स्थान मिळालं आहे.
३ इंडियट्सच कथानक ख्यातनाम लेखक चेतन भगतच्या गाजलेल्या "फाईव पॉइंट समवन" ह्या कादंबरीवर आधारित होतं. मूळ कथानकात बदल करत राजकुमार हिरानीने त्याला खास आपल्या दिग्दर्शकीय टचची फोडणी दिल्याने झालेली डिश अजून चवीष्ट होती. (श्रेयनामावलीत स्थान न मिळाल्याने चेतन भगतने त्याकाळी बरीच आगपाखड केली होती.)
शिक्षणक्षेत्रातील गळेकापू स्पर्धा आणि पैशामागे धावताना त्यातून मनासारखं कारकीर्द न घडवता येण्याचं शल्य हे कोणत्याही विद्यार्थ्याला जवळच वाटावं असं कथानक होतं.
त्या सुमारास दिल्ली व जवळपासच्या परिसरात २० दिवसांत ३०० आत्महत्या झाल्या होत्या. त्यातल्या बहुतेक इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या होत्या... रँचोच्या भाषेत 'वो सुसाईड नही था, मर्डर था...यह इंजिनियरभी कमालके होते है, ऐसा कोई मशीनही नही बनाया जो दिमागके अंदरका प्रेशर नाप सके'
एकूणच दारुण परिस्थिती होती. पण '3 इडियट्स' रिलीज झाला आणि ह्यात कमालीची घट झाली. एका बातमीत तर वाचलं होतं की बँकेत एका मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने 'बहती हवा सा था वो' गाणं ऐकून स्वतःच्या तगड्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला, कारण त्याला जाणीव झाली की 'ह्या पैशाच्या मागे धावताना मी स्वतःला कुठेतरी मागे सोडलंय.' यंत्रवत आयुष्य जगणाऱ्याना स्वत:चा आयुष्याचा फेरविचार करायला भाग पाडले.
रँचो, फरहान, राजु, चतुर, जॉय... ही सगळी पात्रे प्रतीकात्मक होती. बॉलिवूडचे कथानायक हे तोवर चाकोरीबद्ध होते, पण '3 इडियट्स'ने तो पायंडा मोडला.
'हम स्पेसमे पेन्सिलका इस्तेमाल क्यु नही करते?' असा भाबडा प्रश्न विचारणारा किंवा नायिकेच्या हातातल्या जुन्या घड्याळावरून तिचं अंतरंग ओळखणारा नायक विरळा होता. एरवी 'बी.ए.पास झाल्यावर आनंदात घरी धावत येणारा आणि गाजरका हलवा खाणाऱ्या टिपिकल नायकापेक्षा हा एक पाऊल पुढे गेला होता. पैसे कमावण्यापेक्षा लड्डाखच्या गिरीकुंदरातील मुलांसाठी शाळा काढणारा रँचो म्हणूनच सर्वांना भावला.
व्हायरस इन्व्हर्टर, व्हॅक्यूम पंप पासून डिलिव्हरी, जॉय लोबोने बनवलेलं हेलीकॅम, अशा अनेक गोष्टी ३ इडियटसमुळे आजही आठवतात. ह्या सिनेमाचे अधिकृत आणि अनधिकृत रिमेकदेखील झाले.
एरवी हिंदी सिनेमातील इंजिनियर म्हणजे कोणत्या तरी आडवाटेच्या गावात धरणाच्या कामासाठी आलेला शहरी बाबू एवढच त्याच स्थान होत, पण ह्या सिनेमामुळे ती चाकोरी मोडली गेली. बॉलिवूडला कला शाखेतून बाहेर काढून इंजिनियरिंगच्या शाखेत टाकण्याचं काम ३ इडियटसने केलं.
'3 इडियट्स'ने आयुष्याची विविध रूपे नकळत दाखवली. आमिर खानचे 'दिलं चाहता है, रंग दे बसंती आणि 3 इडियट्स' हे आमच्या तारुण्याचे तीन टप्पे होते.
'काबिल बनो, कामयाबी झक मारके पिछे आएगी' हा गेल्या दशकभरातल्या अनेक इंजिनियर्ससाठी प्रेरणामंत्र ठरला आहे. 'ऑल इज वेल' म्हटल्याने प्रॉब्लम सुटत नाही पण सहन करण्याची शक्ती येते हेही अनुभवले.
'रणछोडदास श्यामलदास चांचड' (ufff फुंसुक वांगडू) असाच येणाऱ्या पिढ्यांना मनसोक्त जगण्याचे बळ देवो ही सदिच्छा !
- सौरभ रत्नपारखी