ही वाट दूर जाते….

युवा विवेक    08-Feb-2023
Total Views |

ही वाट दूर जाते….
तुला इतर कितीही जरी नावं असली तरी मला मात्र 'वाट' हे तुझं नाव जास्त जवळचं वाटतं. वाट म्हटलं की कशी साधी सरळ तू डोळ्यासमोर उभी राहतेस. बघ…साधी म्हटलं की सवयीने सरळ त्याला जोडून येतंच…पण तुला सरळ म्हणून कसं चालेल. तुझ्या नागमोडी असण्यातच तर खरा डौल आहे. त्यातून नुसती मातीची असलीस तर मग काय बघायलाच नको. त्यातूनही कोकणातली लाल मातीची असलीस तर म्हणजे काय…अगदीच जिव्हाळ्याची होऊन जातेस बघ. तुझ्या स्वागतास सज्ज हिरव्या गार पानांनी भरलेल्या फांद्यांची कमान, तुझ्यावर सोनेरी पखरण करणारे उन्हाचे कवडसे आणि त्यातून दिमाखात पुढे पुढे जात राहणारी तू…अहाहा! हे असं दृश्य पाहिलं की वाट होऊन तुझ्यातच मिसळून जावं वाटायला लागतं. तुझ्या अंगांगावर बैलांच्या खुराचे निशाण आणि बैलगाड्यांच्या चाकांचे किंवा इतरही अनेक जे दागिने मिरवतेस ना ते माझे खास आवडीचे. ते पाहिले की कानात आपोआपच बैलांच्या गळ्यातल्या घुंगुरांचा गोड आवाज घुमायला लागतो. अशी वाट असेल तर ती कधी संपू नये असंच वाटत राहतं.
तुझी बाकी रुपंही आवडतात मला. पण डांबरी रस्ता किंवा रोड प्रकरण मात्र का कोण जाणे त्याच्या नावाप्रमाणे जरा रुक्ष वाटतं. कदाचित रोड म्हटलं की नुसती गाड्यांची गर्दी असा विचार मनात येत असल्यामुळे असेल. पण काही काही जंगलातून जाणारं तुझं हे रूप मात्र भुरळ पाडतं. इतकं की तिथून हलू नये असंच वाटतं. तरी सहा पदरी/आठ पदरी महामार्ग हा शब्द ऐकल्यावर खरं धडकी भरते. मग आठवतो तो फक्त रेसमधे पळणारा घोडा…वेगाने नुसते पुढे जात रहा. रस्त्याला इतके पदर करण्याच्या नादात भोवतालचं सौंदर्य तर गायबच होऊन जातं. त्यामुळं वाटेत काही चांगलं दिसलं तर ते पहायला जरा थांबलंय हा विषयच उरत नाही. फक्त गती, गती आणि गती. अर्थात जग बदलतंय तसं बाकी बदलही होत जाणारच. त्याला काही इलाज नाही आणि तक्रारही नाही फार. त्यामुळेच म्हटलं ना तुला 'वाट' हा शब्द जवळचा वाटतो. असो.
तुला सांगू…वाट म्हटलं की अशा कितीतरी वाटा आठवतात ज्यावरून हिंडले आहे. शाळेत असताना करवंद खायला डोंगरावरच्या पायवाटेवरून इतकं फिरलोय आम्ही मैत्रिणी की ते फिरणं आणि त्या वाटा विस्मरणात जाणारच नाहीत कधी. तशाच जंगलातल्या वाटा…आहाहा! लाल माती, दोन्ही बाजूला झाडांची दाट गर्दी, कधी पक्ष्यांचा किलबिलाट तर कधी नीरव शांतता, ऊन सावलीचा खेळ आणि सोबत जंगलाचा तो विशिष्ट वास. अशा तुझ्या रुपावरून निर्हेतुकपणे, मोकळ्या मनाने फिरणे….सुख यालाच म्हणावे. तू कायम अशी आणि अशीच रहावीस असं वाटतं. प्रगतीची पावलं यावर कधी पडूच नयेत. तुझं हे रूप नैसर्गिक झालं. पण एक मानवनिर्मित वाटही मला फार आवडली होती. एका छोट्या पण सुंदर मंदिराकडे जाणारी ती वाटही तितकीच सुंदर होती. अर्थात आजूबाजूला जंगल असल्यामुळे जास्त शोभा आली होती. पण तरीही कलाकारी नजरेने तिथं तुला तयार केलं असणार हे नक्कीच कळत होतं. तुझ्या काठावर ठेवलेल्या सुंदर डिझाईन असलेल्या बाकावर कितीही वेळ नुसतं जरी बसले असते तरी वेळ खूप छान गेला असता. उघड्या डोळ्यांनी ध्यानावस्था अनुभवली असती तिथं नक्की.
आणखी एक सांगू…मायेने छत धरणाऱ्या झाडांची जी सावली तुझ्यावर पडते ना ती बघत बसायला मला फार आवडतं. कॅलिडोस्कोप हलवला की कशी नक्षी बदलत जाते, तशी उन्हामुळे बदलत जाणारी सावलीची नक्षी किती छान दिसते! तुमचं सगळ्यांचं नातं काही वेगळंच आहे बघ…अगदी हेवा वाटण्यासारखं.
पण काही वेळा मात्र मला तुझी एकदम भीतीही वाटली होती हा… विशेषत:रात्री. दिवसा त्यांच्याच प्रेमात असणाऱ्या मला का भीती दाखवता कोण जाणे. एकदा असंच एका जंगलात रहायला गेले होते. तिथं रहायची सोय होती तंबूत. सकाळी तिथं पोहोचल्यावर इतकं प्रसन्न वाटलं होतं ती जागा पाहून. तंबूच्या शेजारून तू वेडीवाकडी वळणं घेत जात होतीस. पण तेच रात्री…हवा टाईट की. प्राण्यांच्या राज्यात रहायला गेल्यावर तिथं आपण थोडीच त्यांना कुठं प्रवेश बंदी करणार. आमचा वावर संपल्यावर झाला की त्यांचा प्रवेश रात्री. कोण फिरत होतं काय माहित. पण त्यांच्या पायांचे आवाज ऐकून माझी झोपही घाबरुन लांब कुठं पळून गेली होती. पण खरं सांगू. त्यातही एक वेगळीच मजा होती.
बऱ्याच वेळा मला तुझा खूप अभिमानही वाटतो. तुला नमस्कार केल्याशिवाय तुझ्यावर पाऊल ठेवायचं धाडस होत नाही. केव्हा माहितेय? गडांवर चढण्यापूर्वी. कित्येकवेळा मनात विचार येऊन जातो…आपण जातोय तिथूनच पूर्वी छ. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चढून गेले असतील. किती भारी वाटतं माहितेय तेव्हा! प्रत्यक्ष महाराज, त्यांचा आवाज, त्यांचे शौर्य तू पाहिलं असणार. किती भाग्यवान गं तू! अर्थात मी ही मला भाग्यवानच समजते की अशा मुलुखातच मी ही जन्मले आहे. यापेक्षा जास्त काय बोलणार…
आज असंच बसले होते माझ्या आवडत्या जागी आणि एकदम तुझी आठवण आली. वेगवेगळ्या ठिकाणची तू समोर दिसायला लागलीस. म्हणून म्हटलं लिहावं आता तुला पत्रच. सध्या डांबरी तेही खड्डेवाल्या सडकेव्यतिरिक्त तुझी वेगळी भेट नाही. पावलं लाल करुन घ्यायची इच्छा तर खूप आहे. बघू कधी जमतंय.
जस्मिन जोगळेकर.