काश्मिरी पुलाव

युवा विवेक    09-Feb-2023
Total Views |

काश्मिरी पुलाव
मी पहिल्यांदा काश्मिरी पुलाव खाल्ला तेव्हा अजिबात आवडला नव्हता. एका साध्या पंजाबी ग्रेव्ही मिळणाऱ्या, फॅमिली रेस्टारंटमध्ये खूप वर्षांपूर्वी काश्मिरी पुलाव मागवला होता. ऑर्डर देतांना एक तरी नविन पदार्थ ऑर्डर करायचा या माझ्या सवयीचे चांगले अनुभव जसे आहेत तसे वाईटही. अशाच एका "कुछ नया ट्राय करते है" क्षणी ऑर्डर दिली आणि नंतर जेवण संपेपर्यंत गप्प बसले होते. मित्रमैत्रिणींनी मला स्पेसिफिक टोमणे मारता यावे यासाठी तो गोड पुलाव एक एक चमचा खाऊन पाहिला! अर्थात मी तो वाया घालवला नाही, पॅक करून घरी आणला. सस्पेन्स थ्रिल्लर पाहत लोणच्यासोबत संपवला. नावडते पदार्थ आवडते पुस्तक वाचत किंवा छान सिनेमा पाहत संपवायचे ही शक्कल तुम्हीही वापरून पहा. त्यानंतर काही वर्षांनी एका बफेमध्ये हा रंगीबेरंगी भात परत दिसला. हो नाही करत थोडासा प्लेटमध्ये वाढला आणि त्या दिवशी पुलावाबद्दलचे माझे मत बदलले. पुलाव बनवणे हे अतिशय कौशल्याचे काम यासाठी आहे कि फ्लेवर्स, मसाल्यांचे प्रमाण चुकले कि सत्यानाश! काश्मिरी पुलावही अशीच डेलिकसी आहे.
बिर्याणीसारखा पोटभर खाण्याचा हा पदार्थ नव्हे. प्रीमियम शाही पदार्थ आहे (बिर्याणी शाही नाही का? असं लोक ओरडतील म्हणून प्रीमियम शाही म्हणतेय.) प्रीमियम कुकीज कशा सगळ्या ब्रँड्सच्या चांगल्या नसतात, एखादी खाऊ शकतो, रोज परवडणाऱ्या नाही आणि सगळ्यांना पसंत पडतील अशाही नाही. काश्मिरी पुलावही असाच आहे! पुलावचा जन्म पर्शियात झाला. तो भारतात येतांना काश्मीरमार्गेही आला. पुलावमध्ये तांदूळ तेलात/तुपात परततात. बाकी भारतात सगळीकडे ही पाककृती पोहोचेपर्यंत परतण्याची स्टेप गाळली गेली. काश्मीरमध्ये मात्र अजूनही तीच प्रथा आहे.
काश्मिरी पुलावला मोधुर पुलावही म्हणतात. मोधुर म्हणजे गोडच असावे. हा पुलाव असतोच गोड. सुका मेवा, फळे, मसाले, तांदूळ आणि केसर यांच्यापासून हा पुलाव बनवतात. अननस, पपई, द्राक्षे, सफरचंद, बदाम, काजू, मनुका अशी सगळी रंगीबेरंगी फळे यात असतात. केशराचा सुगंध आणि चव याची गोष्टच न्यारी! लवंग, दालचिनी वगैरे मसाल्यांचा मंद सुवास असेल तर हा पुलाव लाजवाब. कोणत्याही पदार्थाने एकमेकांवर कुरघोडी करायला नको. प्रत्येकाने सांगितले ते आणि तितके काम चोख बजावावे. मंद आचेवर पुलाव शिजवला कि सगळे फ्लेवर्स मुरतात. तुपात परतलेला तांदूळ दूध आणि पाण्यात शिजवतात आणि सुकामेवा, ताज्या फळांनी सजवतात. गोडसर असलेला हा पुलाव गुजराती लोकांच्या आवडीस उतरू शकतो असं मला नेहमी वाटतं!
कमी मसाले, तिखट नसलेला हा प्रकार पौष्टिक आहे म्हणून लहान मुले आवडीने खाऊ शकतात. तरीही सर्वांना बनवता येईल किंवा सर्वांना आवडेल असा हा पदार्थ नाही! दक्षिण आणि उत्तर भारताचा मिलाप करायचा असेल तर हिरव्यागार केळीच्या पानावर हा रंगीबेरंगी पुलाव वाढावा! सोशल मीडियावर पोस्ट करू शकू असा फोटो नक्कीच मिळेल.
 
सावनी