सावळाच रंग तुझा...

युवा विवेक    10-Mar-2023   
Total Views |

सावळाच रंग तुझा...

अहो, बाकी सगळं छान आहे हो, पण रंग थोडा उजळ हवा होता. एवढे मस्त मार्क्स मिळवते, पण काय उपयोग, तसं रूपही हवं. लग्न करताय पण हिला नवरा कसा मिळणार. कोणतीही फॅशन कॅरी मस्त करतो हा पण काळा आहे कसं घेणार शोमध्ये. ही कुठे उठून दिसते, कसा हिला रिसेप्शनचा जॉब द्यायचा. मुलात/मुलीत सगळं छान आहे, पण काळा/काळी आहे, म्हणून लग्नासाठी नको वाटतं... वाटतायत का हे संवाद अगदी आसपास ऐकल्यासारखे. आजही आपल्याकडे, म्हणजे संपूर्ण जगातच रूपाचा संबंध थेट गोऱ्या किंवा उजळ रंगाशी जोडला जातो. आज एकविसाव्या शतकातही हे कायम आहे. पण आलं तरी कुठून हे खूळ.

मुळात भारत हा विविध भौगोलिक वातावरणांचा देश. उत्तरेत काश्मीरपासून दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत याचा विस्तार. म्हणजे अर्थातच हिमालयीन बर्फाळ पर्वतराजींपासून ते समुद्रकिनारच्या उष्ण दमट हवेपर्यंत प्रचंड वैविध्य. त्यामुळे साहजिकच आहारविहारात, तब्येतीत, उंचीत, वजनात, वर्णात (शारिरीक रंगात) फरक पडतोच. उत्तरेकडून जसजसे दक्षिणेकडे जाऊ लागतो, तसतसा रंग अधिक गडद होऊ लागतो. भारतीय माणूस हा सर्वसाधारणपणे गहूवर्णीच. युरोप अमेरिकेशी किंवा टोकाचं थंड हवामान असणाऱ्या भौगोलिक प्रांताशी तुलना केली तर आपण तसे सुखीच. कारण उत्तमोत्तम पौष्टिक पदार्थ येथे पिकतात व आहारात समाविष्ट होतात. त्या सगळ्याचा परिणाम वर्णावर होतो. आणि तजेलदार शामवर्ण/गव्हाळ/गोरा असा विविधतापूर्ण वर्ण प्राप्त होतो.

पण दुर्दैवाने कित्येक दशके मनोरंजन क्षेत्र आणि जाहिरात क्षेत्र यांनी गौरवर्णाला कायमच उचलून धरलं. गोरा रंग हे सौंदर्याचं मानक झालं. त्यामुळे अनेक नीटस देखणे, सावळे चेहरेदेखील कुरूपात मोजले गेले. गोरेपणा हाच नोकरीच्या ठिकाणी, लग्नाच्या बाजारात, मनोरंजन क्षेत्रात, मॉडेलिंग क्षेत्रात सर्वोत्तम मानला गेला. मनाने कितीही चांगलं असलं, तरी गोरं असायला हवं होतं असं अगदी सावळ्यांच्या सहज मनात येऊ लागलं. गौरवर्णी मैत्रिणींपुढे आपण कुरूप दिसतो हा न्यूनगंड सतावू लागला. मग गहूवर्णी आणि श्यामवर्णींनाही आपण थेट काळंच असल्याचं भासू लागलं आणि नेमकं हेच हेरून सौंदर्यप्रसाधन विकणाऱ्या कंपन्यांनी तुंबड्या भरायला सुरुवात केली. वेगवेगळ्या क्रीम्स, लोशन्स, टाल्कम पावडरी, मेकअपची साधनं यात गोरेपणा देणाऱ्या उत्पादनांना अमाप प्रसिद्धी मिळू लागली. घरोघरी अशा क्रिम्स वापरल्या जाऊ लागल्या. ज्या सूर्यकिरणांची त्वचेला गरज आहे अशा किरणांपासून स्वतःला वाचवण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावण्याचं प्रमाण वाढलं, त्यातही स्वस्तात स्वस्त ते महागात महाग अशा रेंजची लोशन बाजारात उपलब्ध झाली. गोऱ्या रंगाला काहीही शोभून दिसतं हा एक प्रचार सुरू झाला. मग या रंगांना शोभतील असे भडक रंग बाजारात जास्त दिसू लागले. तुम्ही नीट पाहिलंत तर तुमच्याही लक्षात येईल. सावळ्या वर्णांना शोभतील अशा बेसिक रंगांच्या आणि पेस्टल शेडच्या कपड्यांना मार्केट कमी मिळतं. आजही मनोरंजन क्षेत्राचा तरुणाईवर विशेष प्रभाव असतो. अगदी २०व्या शतकापर्यंत गोऱ्या रंगाचीच सद्दी या क्षेत्रावर होती. स्मिता पाटील, रेखा, शबाना आझमी, झिनम अमान आणि दीप्ती नवल अशा काही निवडक सावळ्या अभिनेत्रींनाच प्रसिद्धी मिळाली. अन्यथा गोऱ्या रंगांच्या अभिनेत्रींनाच अधिक महत्त्व होतं. त्यापैकी काही तर अभिनयात निव्वळ ठोकळा होत्या, पण केवळ गोऱ्यापान चेहऱ्यांनीच त्यांना ग्लॅमर मिळवून दिलं. याचा परिणाम असा झाला की अनेक अभिनेत्रींनी विविध घातक उपचार करूनही आपला रंग उजळण्याचा परिणाम केला. एकाच अभिनेत्रीचे दोन वेगळ्या काळातले चित्रपट पाहिले तरी हा फरक लक्षात येईल. २०व्या शतकानंतर मात्र सुदैवाने परिस्थिती बदलू लागली आहे आणि त्यामुळेच ठोकळा अभिनय करणाऱ्या सडपातळ, गौरवर्णी अभिनेत्रींऐवजी भारतीय बांध्याच्या सावळ्या-गहूवर्णी पण गुणवान अभिनेत्रींनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं. विद्या बालन, राणी मुखर्जी, काजोल, कंकणा सेन या अशाच अभिनेत्रींचं प्रतिनिधित्व करतात. केवळ हिंदीतच नव्हे तर मराठीतही हे प्रमाण बदलतंय. आपलं खरंखुरं रूप घेऊन प्रेक्षकांसमोर जाण्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही. इतकंच नव्हे तर अनेक अभिनेत्रींना सौंदर्य प्रसाधनांच्या गोरेपणाचा दावा करणाऱ्या जाहिराती करण्यासही नकार दिलाय. अभिनेत्यांच्या बाबतीत मात्र परदेशातील टॉल डार्क हँडसम की संकल्पना बाजारात दणकून चालते.

पण लोकांच्या मानसिकतेतून मात्र गोरा रंग श्रेष्ठ हे समीकरण काही बदलत नाही. खरं म्हणजे आपला रंग हा आपल्या आहारविहार, प्रदेश, अनुवंशिकता, मूळ प्रकृती, त्वचेत तयार होणारे मेलॅनिन यावर अवलंबून असतो. तो आपल्या आर्थिक स्थितीवर वा सामाजिक स्थितीवर अवलंबून नसतो. सावळ्या त्वचेतील मेलॅनिन नावाचा घटक हा आपल्या त्वचेला अत्यंत उपयुक्त असतो. सूर्याच्या प्रखर किरणांपासून हे मेलॅनिनच आपलं रक्षण करतं. त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्यातही हे मेलॅनिन साहाय्यभूत ठरतं असंही ऐकण्यात आलं. आजही लग्नाच्या बाजारात मुलीचा रंगच वरचढ ठरतो. एकवेळ गोरी मुलगी सावळा मुलगा निवडेल. सावळा मुलगा सावळी मुलगी निवडेल पण आजही गोऱ्या मुलांचं सावळी मुलगी निवडताना मन कच खातं असंच दिसून येतं. प्रेमविवाहातही बाकीच्या गोष्टी जुळून आल्या तरी मुलगी काळी असेल तर घरातून नकार दिला जातो. जोडा शोभेल का हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. नोकरीच्या ठिकाणी आता बऱ्याच प्रमाणात सुधारणा असली तरीही सुंदर किंवा प्रेझेंटेबल असण्यात गोरेपणाचा आजही मोठा वाटा असतो. अर्थात गेल्या काही वर्षांत जाहिरात क्षेत्रालाही झुकावं लागलंय. फेअरअसणाऱ्या जाहिराती ग्लोव्हायला लागल्या. पण अजूनही ते उजळपणाचं भूत काही उतरत नाही ही खंत आहेच.

खरं तर आपल्या देवदेवतांची कल्पनादेखील कालिका माता, सावळा गं रामचंद्र अशाच भारतीय वर्णाच्या आहेत. कृष्णाला तर मुळी त्याचं नावच त्याच्या वर्णावरून मिळालं आहे. आपल्या देवीदेवतांची चित्रे नीट पाहिली तर ती गहूवर्णी, श्यामवर्णी अशीच दिसून येतात. मग गोरेपणाचा हा खोटा प्रचार आला तरी कुठून असा प्रश्न साहजिकच पडतो. आजही मला तृतीय वर्षाला अभ्यासायला असलेली शुभ्र गुणांची ही वसुंधरा पटवर्धन यांची कथा स्पष्ट आठवते. लग्नासाठी बघितलेल्या मुलीच्या गुणांवर भाळूनही, तिचा स्वभाव, स्फटिकासारखं मन अतिशय आवडूनही, केवळ तिचा गोरा रंग नसल्यामुळे नकार देणारा उपवर तरूण याच मानसिकतेचं दर्शन घडवतो. खरं तर या सावळ्या रंगाची मजाच वेगळी आहे. त्यात अस्सल भारतीय रूप दडलेलं आहे. इतकं की हे श्यामल रूप पाहून गदिमांना थेट कविताच सुचली जी पुढे अजरामर गीत ठरली. तर असा हा पावसाळी नभापरी, गोकुळीच्या कृष्णापरी, चंदनाच्या बनापरी असलेला हा श्याम रंग कवीला थेट बेचैन करतो, तो मुखचंद्रमा कधी एकदा दिसेल असं त्याला होतं आणि तो कवी तिच्या घायाळ नजरेचा थेट बंदीवानच होतो. जे गदिमांना दिसलं ते आपल्यालाही दिसेल, फक्त जरा तो गोरेपणाचा चष्मा दूर सारायला हवा.

 
-मृदुला राजवाडे