लिलीचे फूल—गंगाधर गाडगीळ

युवा विवेक    29-Mar-2023
Total Views |
 
लिलीचे फूल
 
"लिलीचे फूल" गंगाधर गाडगीळ लिखित कादंबरीमध्ये मध्यवर्ती भूमिका ही नीलाची आहे. नीला ही एक स्त्रीपणाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेली सुंदर तरूणी. पण म्हणतात ना आपण जन्म कोणाच्या पोटी घ्यावा हे कुठे आपल्या हातात असते? असंच नीलाबाबतही आहे. तिचे सौंदर्य कुस्करण्यात जेवढा वासनांध माणसांचा हात आहे. तेवढाच हात काळाचाही आहे. तेवढाच हात तिच्या सख्या आईचाही आहे. तेवढाच हात ती वाढली त्या वातावरणाचा ही आहे का? हे वाचताना सतत जाणवतं राहतं. नव्हे हे प्रश्न आपल्या आजूबाजूला रेंगाळत असतात. लिलीचे फूल कुठेही, कसेही, सहज उगवते आणि तेवढेच ते मनालाही भावते. किळसवाण्या नजरा झेलत वारंवार कणा ताठ करून उभं राहायचाही प्रयत्न करते. कारण मिळालेला जन्म जगायचा असतो. पण या समाजातील काही दुष्ट नजरा तिला मिळालेला तिचा जन्म तिला जगू देत नाहीत फक्त भोगायला लावतात. या समाजात अजूनही स्त्रियांची खरेदी विक्री होते किती किळसवाणी, लाजिरवाणी, संतापजनक गोष्ट आहे. गंगाधर गाडगीळांनी ही कादंबरी लिहिली तो काळही तोच होता जो आजचा काळ आहे, स्त्रियांच्या बाबतीत. सगळे आपल्या तंद्रीत असतात. निसर्गही आपल्या तंद्रीत असतो.. पण त्या वेळी कुठेतरी एखादे लिलीचे फूल कुस्करले जात असते, चिरडले जात असते. पण या भयंकर प्रकाराचा त्या वेळी कोणालाही मागमूस नसतो. त्यानंतर चं दुःख मात्र बधिर करत राहतं..
नीलाला हवं असलेलं प्रेम राहिलं बाजूला आणि जे नको असते, ज्या गोष्टीची तिला भीती वाटते, किळस येते. तीच गोष्ट चार वासनांध पुरूष तिच्याकडून हिसकावून घेतात. तिचं ज्या मुकुंदवर प्रेम होते. तो तिचं मन जपत राहतो आणि तिचा आजूबाजूचा भोवताल मात्र तिला कुस्करण्यासाठी टपलेला असतो. असे म्हणतात की, पूर्वी चीनमध्ये एखाद्या माणसाचा छळ करायचा म्हणजे त्याच्या डोक्यावर सावकाश- अगदी सावकाश एकेक पाण्याचा थेंब पडेल अशी व्यवस्था करीत. त्यामुळे तो मनुष्य दर क्षणाला पुढला थेंब केव्हा पडेल त्याचा जळणारा विचार करीत राही. दुसरे काहीच त्याला सुचू शकत नसे आणि जर सुचलेच तर तेवढ्यात पाण्याचा दुसरा थेंब झपकन् त्या माणसाच्या डोक्यावर पडत असे. विजेच्या लोळांसारखे दुःख अंगावर कोसळले तर ते एका परीने बरे असते, पण बलात्काराचे दुःख त्या स्त्रीच्या तनामनाला कुस्करून टाकते आणि ते दुःख त्या बर्फाच्या थेंबासारखे झेलत राहावे लागते. असल्या यातना तनाच्या-मनाच्या चिंधड्या उडवून टाकतात. मग तिच्या जगण्यासाठी उरते ती अरूंद, वेडीवाकडी आणि खोल दरी. ती इतकी खोल की नजरेला भय वाटत राहते. हिरवे जीवन जळून खाक होते. जसे या कादंबरीतील नीलाचे झाले. मुकुंदने म्हणजे तिच्या प्रेमाने तिला सावरल्यावरही नीला वादळातून प्रवास केल्यावर सुरक्षित बंदरावर नांगरलेली बोट जशी मंदपणे डुलते तशी तिची अवस्था झाली होती. ती वेडसर पणाकडे जायला लागली होती. तासानतास एकटीच बसून राहायची. संध्याकाळच्या उदास वेळी वस्तुमात्रांच्या कातरलेल्या सावल्या न्हायच्या आणि त्यांचे थिरकते प्रतिबिंब तिच्या मनात पडायचे आणि मग ती भीतीने खिडकीबाहेरच्या म्लान चांदण्याकडे एकटक नजरेने बघत बसायची. सुंदर दिसणे व स्त्री असणे हा गुन्हा या लिलीच्या फुलाने केला होता का? हा प्रश्न या भयंकर घटनेनंतर छळत राहतो. पण मग हाच विचारांचा गुंतावळा तिला खोल दरीत शरीराची आत्महत्या करायला भाग पाडतो. मनाची आत्महत्या तर आधीच झालेली असते. एका क्षणात एका लिलीचे जीवन जळून खाक झाले. लिलीच्या फूलाचे क्षणभंगूर जीवन आणि स्त्रीचे जीवन सारखेच आहे. हेच लेखकाने या कादंबरीतून उलगडले आहे. या कादंबरीची किंमत तीन रूपये आहे म्हणजे ही कादंबरी किती जुनी आणि दुर्दम्य आहे आपण समजूच शकतो. कितीतरी मोठा काळ लोटला; पण बलात्काराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच गेल्याचे आपल्याला जाणवते. कधी बदलणार हे चित्र ? हा अजगरा एवढा मोठा प्रश्न आहे समाजात. या कादंबरीत तिच्या भोवताली रेंगाळणारेच लोक हे नीच काम करतात. तिला सिनेसृष्टीचं आमीश दाखवूनही ती हाती लागत नाही म्हटल्यावर असा वाईट डाव साधतात… एका हळव्या प्रेम कथेपासून सुरू झालेली ही कादंबरी शेवटाला मात्र सुन्न करून जाते. तिचा प्रियकर, सखा जो तिला आवडत असतो. तो मात्र हवालदिल होऊन पाहत राहतो. एवढेच त्याच्या हातात शिल्लक राहते. ही कादंबरी लघु जरी असली तरी विषय मात्र फार मोठा आहे. पण मला एक स्त्री लेखिका म्हणून असं वाटतं की हा विषय या काळातल्या कादंबरीचा असला तरी शेवट मात्र या कादंबरीसारखा नसावा. पण मग लक्षात येतं हा विषय किंवा कादंबरी काही फिक्शनल नाही. ही वास्तविकता आहे आणि ती पचत नसेल तरी पचवून घ्यावीच लागणार आहे…..
एक हतबलता घेवून……..
 
- वर्षा पतके थोटे