रोहित शेट्टी - आज का मनमोहन देसाई

युवा विवेक    10-Apr-2023   
Total Views |


रोहित शेट्टी - आज का मनमोहन देसाई

शाहरूखच्या 'ओम शांती ओम' सिनेमात एक सीन आहे. निर्मात्याच्या रोलमध्ये असलेल्या अर्जुन रामपालला त्याच्या सिनेमाचा दिग्दर्शक उत्साहाने सांगत असतो की "मी अमुक सीन सत्यजित रेंच्या एंगलमधून घेणार आहे, तमुक सीन बिमल रॉय ह्यांच्या एंगलमधून घेणार आहे."

यावर अर्जुन रामपाल म्हणतो, "एक एंगल मनमोहन देसाईकाभी लगाना, आखीरमे वोही काम आएगा"

हे सिनेसृष्टीचे कटूसत्य आहे. शेवटी हा एक व्यवसाय आहे, प्रेक्षकांना काय हवंय हे ओळखता येणे गरजेचे आहे.

राजामौलीच्या बाहुबलीमध्ये झाडांवरून किल्ल्यात प्रवेश करणारे सैन्य असो किंवा महेश कोठारेंच्या सिनेमातला 'अय्यायायाया' करणारा झगड्या रामोशी .... हे अतार्किक आहे हे माहीत असूनही आपण एन्जॉय करतो, तेव्हा इतर कलात्मक बाबी गौण ठरतात. मनमोहन देसाईने प्रेक्षकांची ही नाडी अचूक ओळखली होती.

'अमर अकबर अँथनी'मध्ये एकाच व्यक्तीच्या तीन मुलांना तीन धर्माच्या लोकांनी सांभाळणे, एकाच वेळी तीन जणांचे रक्त एकीला देणे, साईंच्या कृपेने डोळे परत येणे, असे अनेक अफलातून, अतर्क्य सीन त्यात होते, पण मनमोहन देसाई टचमुळे सिनेमा ऑल टाईम हिटच्या यादीत आहे.

धरम-वीरमधले हीमॅन टाईप स्कर्ट घातलेले योद्धे भारतात कोणत्या काळात होते?? हा प्रश्न कोणालाही पडला नाही.

सच्चा-झुटामध्ये कोर्टात ग्राह्य धरलेली कुत्र्याची साक्ष तितकीच अतर्क्य.!!

आजच्या काळात असेच अतर्क्य, अचाट कल्पनेचे सिनेमे देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची आणि मनमोहन देसाईची ती रिक्त जागा भरण्याची क्षमता कोणामध्ये असेल तर तो दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी! "सिंघम रिटर्न"मधील भूमिका स्वीकारताना करीना कपूरने तशी तुलना करत प्रत्यक्ष कबुलीदेखील दिली होती.

आज रोहित शेट्टीचे नाव बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शकांमध्ये घेतले जाते. दादा कोंडकेंचा सलग हिट सिनेमे देण्याचा विक्रम त्याने मोडला आहे, असे मानणारा एक समीक्षक वर्ग देखील आहे. दादा कोंडकेंच्या काळात चित्रपटाचे यश अपयश हे 'किती आठवडे चालला?' या परिमाणात मोजले जाई तर आज '१०० कोटी क्लब'मधील सिनेमांना हिट मानण्याचा निकष लावला जातोय.

पण रोहित शेट्टीचा आजवरचा प्रवास हा तितका सोपा नव्हता. त्याचे वडील एम.बी.शेट्टी हे बॉलिवूडमधील प्रख्यात स्टंटमॅन होते (डॉन सिनेमात अमिताभशी फाईट करणारा शाकाल आठवत असेल.). रोहित शेट्टीची आई रत्ना शेट्टीदेखील बऱ्याच हिंदी सिनेमात दुय्यम भूमिकेत झळकली होती. पुढे एम.बी.शेट्टीच्या अकाली निधनामुळे त्या कुटुंबावर बिकट आर्थिक परिस्थिती ओढवली होती. त्या खडतर काळात अमिताभ बच्चन, विरू देवगण अशा अनेकांनी शेट्टी कुटुंबीयांना सावरले.

लहान वयातच पैशाची किंमत कळल्याने आपल्या सिनेमासाठी तिकिटाचे पैसे खर्चून येणाऱ्या प्रेक्षकांना ते वसूल करून देण्याची जबाबदारी आपली आहे, अशी प्रांजल कबुली रोहित शेट्टीने एका इंटरव्ह्यूमध्ये दिली होती.

रोहितचे बॉलीवूडमध्ये पदार्पण वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी झाले. ‘फुल और कांटे’, ‘सुहाग’ ह्यांसारख्या सिनेमात त्याने बॉडी डबल आणि स्टंटमॅनचे काम केले.

त्याच्यासह अजय देवगण आणि अक्षयकुमार या दोन्ही अभिनेत्यांच्या कारकीर्दीचा सुरुवातीचा तो काळ होता.

त्यामुळे तिघांचीही वेव्हलेंग्थ जुळली ती तेव्हापासून.!!

प्रारंभीचा काळ ‘प्यार तो होना ही था’, ‘राजू चाचा’, ‘हिंदुस्थान की कसम’सारख्या सिनेमातून स्टंटमॅन ते साहाय्यक दिग्दर्शक असा करता करता अखेर २००३ सालच्या अजय देवगण आणि अभिषेक बच्चन अभिनित 'जमिन'मधून त्याची स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू झाली.

त्यानंतरची गेली २० वर्षे अपवाद वगळता त्याच्या प्रत्येक सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. एकीकडे ‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न’, ‘गोलमाल ३’ ही मालिका तुफान लोकप्रिय झाली. दुसरीकडे ‘बोलबच्चन’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘ऑल द बेस्ट’, ‘दिलवाले’, ‘सर्कस’, यांसारख्या चित्रपटांनीसुद्धा पैसा वसूल करून दिला. ‘सिंघम’, ‘सिंबा’, ‘सूर्यवंशीने कॉप युनिवर्स’ नावाचं नविन दालन बॉलीवूडमध्ये सुरू केलं आहे.

हे करत असतानाच ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘खतरोके खिलाडी’ सारख्या टिव्हीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून रोहित शेट्टी हे नाव घरोघरी पोहोचले होते.

डेव्हिड धवन, प्रियदर्शन ह्यांनी आखून दिलेल्या कॉमेडीच्या मार्गावर चालत असतानाच रोहितने ऍक्शन सिनेमाचा आपला हातखंडा असलेला फॉर्म्युलापण कायम राखला.

रोहितचे सिनेमे हे फार कलात्मक किंवा विचारप्रवण करायला लावतील असे कधीच नव्हते. "सिनेमागृहाबाहेर आपल डोकं ठेवून या आणि निश्चिंतपणे ३ तास निखळ करमणुकीचा आनंद घ्या" ह्याच भावनेतून त्याने चित्रपट केल्याचे दिसून येईल. महागड्या गाड्यांची तोडफोड, धुंवाधार गोळीबारी याची प्रचंड रेलचेल त्याच्या सिनेमात दिसून येते जी लहान मुलांनासुद्धा आवडते. हे करत असतानाच जुनी विनोदी मराठी नाटके किंवा गुलजार, बासू चॅटर्जी यांसारख्या मंडळींच्या हलक्याफुलक्या विनोदाचा त्यावर जास्त प्रभाव असल्याचे दिसून येतो. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत लोकप्रिय असणाऱ्या सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, वैदेही परशुरामी, सोनाली कुलकर्णी सारख्या अनेक अभिनेत्रींना आपल्या चित्रपटातून सातत्याने संधी देण्याच्या त्याच्या कार्यपद्धतीमुळे मराठी प्रेक्षकवर्गात देखील तो इतरांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय आहे.

प्रेक्षकांची नाडी ओळखत हिटचा फॉर्म्युला गवसलेल्या रोहित शेट्टीमुळे भविष्यात इतर निर्माते देखील म्हणतील की "एक एंगल रोहित शेट्टीकाभी लगाना तर त्यात नवल नसेल"

 

 
- सौरभ रत्नपारखी