कोरा कागद...!

युवा विवेक    18-Apr-2023
Total Views |

 
कोरा कागद

 
कोऱ्या कागदास एका

शाई एकदा म्हणाली,

दावे फोल सारे तुझे

आम्ही लावतो मशाली

मनोमन कागदाला

हसू आले क्षणभर

तरी लपवुनि त्यास

त्याचा स्वर कणखर

मग म्हणाला शाईला,

कोण देई तुला कौल?

माझ्याविना जगी तुझा

कधी असतो का डौल?

दोघे आपण चालतो,

मार्ग दाविता विचार

कधी करतो प्रहार

कधी हास्याचे तुषार

तुझे विविधांगी रुप

दिसे सर्वदा खिशाला

शब्दांचिया धनाविना

मोल नसते तयाला

कोरे असते आमुचे

सारे धवल जगत

होता शब्दांची पखरण

राहू स्वप्नांस जगत

 

-अजय कुलकर्णी