वाभळेवाडीचा तलाठी आण्णा..! भाग - २

युवा विवेक    19-Apr-2023   
Total Views |

 
वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग-तीन

रातीचा नवाचा पार कलला अन् संतू अण्णा तलाठी, रामा कुंडुर अन् त्याचा दोस्त जगण्या लक्षी आईच्या पिंपळ पारावर गावकुसाच्या गावातल्या मालदार, गरीब, डांबरट लोकांच्या आठवणी काढत गप्पा करू लागले होते. रामा कुंडुर पारावर उकीडवा बसून संतू अण्णा तलाठीला अन् जगण्याला गावातल्या एक एक हकीकती सांगत होता. जगण्याही त्याच्या या हकीकतींना हो ला हावजी अन् हातवारे करीत बोलत होता.

संतू आण्णा तलाठी लक्षी आईच्या पिंपळ पारावर आपलं कपड्यांचं पेंडकं उश्याला घेऊन एक पायाची टांग एका गुडघ्यावर ठेवून, या सगळ्या गप्पा गोडीने ऐकत बसले होते. अधूनमधून समशानातील कुत्री त्या काल मेलेल्या गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचउंच आवाजात इवळायची. त्यांचा आवाज यांच्या बसल्या जागेवर येत म्हणून ती समशानाकडे बघायची.

एखादं कोल्ह मोठ्यानं कोल्हेकूई मारत इवळायला लागलं की अंगावर काटा येऊन जायचा. अन् समशानात असणाऱ्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्याची आग समशानात असलेल्या येड्या बाभळीला तिच्या कवेत घेती की काय असे त्या आगीचे लोट लक्षी आईच्या पिंपळ पारावरून दिसत असायचे.

गावच्या लोकांना हे सगळं ओळखीचं होतं पण गावात कुणी नवखं माणूस आलं की रातच्याला हे असं काही इपरीत बघितलं त्या माणसाचा जीव अर्धा अर्धा व्हायचा. तसं काही संतू अण्णा तलाठी यांच्या संगत आता व्हायला लागलं होतं, अन् संतू अण्णा तलाठी जरा बिचकतच हो ला हो करत या दोघांच्या गावकुसाच्या गप्पा ऐकत होते.

रातीचे दहा कधी सरले हे हलक्या फुलक्या गप्पात त्यांना कळलं नाही. संतू अण्णा तलाठीनं आपल्या एका पिशित आणलेलं भाकरीचं पेंडकं अन् लसणाचा ठेसा काढून ते जेवायला म्हणून बसले.

तितक्यात रामा कुंडूर बोलू लागला:

तलाठी अण्णा जेवायचं थांबा की व मी घरून कोड्यास भाकर घेऊन येतूसा. असं म्हणून रामा कुंडूर हातातलं टमरेल घेऊन धावतच दोन गल्ल्या पल्याड असलेल्या त्याच्या घरी गेला अन् टोपल्यात उरलेली तीन चतकुर भाकर अन् शेंगदाण्याचं पातळ कालवण तो एका गिल्लासात घेऊन आला.

जगण्या चड्डी सावरीत, डोक्यावरली गांधी टोपी सावरीत एका डेचकीत पाणी अन् एक लोटा घेऊन आला. लक्षी आईच्या पिंपळ पारावर मस्त एक फडकं अंथरूण त्यांनी संतू अण्णा तलाठी यांची जेवायची सोय केली.

लोकांची रात्रीची जेवणं झाली म्हणून गावातली लोकं गप्पा झोडायला म्हणून लक्षी आईच्या पिंपळ पारावर एक एक करून येऊन बसू लागली होती. हळू हळू साऱ्या गावात गावासाठी नव्यानं शिकावू तलाठी अण्णा आल्याची बातमी साऱ्या गावात तोंडोतोंड मिरवल्या गेली.

गावची लोकं तशी चांगली होती. त्यामुळं संतू अण्णा तलाठी यांना गावकुसाच्या सतरा गप्पात गावातल्या लोकांनी सहज सामावून घेतलं, गप्पा चालू झाल्या. संतू अण्णा गरिबीतून वर आलेला, शून्यातून विश्व निर्माण करू बघणारा सरकारी नोकर होता. त्यामुळं गावातल्या या गरीब लोकांवर तो आधिकच खूश होता, जेवताजेवता भरघोस गप्पा चालू होत्या व गावाचा नवा शिकावू तलाठी बघायला गावातली मंडळी येत होती.

त्या निमित्ताने आज लक्षी आईच्या पिंपळ पारावर बाजार भरावा तशी गर्दी झाली होती. इतक्या लहान वयात हे पोर तलाठी झालं, त्याची नेमणूक आपल्या गावाला झाली. यामुळं गावातल्या म्हाताऱ्या माणसांनासुद्धा संतू अण्णा तलाठी यांचं अप्रूप वाटत होतं.

संतू अण्णाचं जेवून झालं अन् ते हात धुवायला पाराच्या खाली गेले, तर जगण्या त्यांच्या हातावर पाणी टाकू लागला. हे बघून पारवरली सारी मंडळी त्याला हसू लागली की आता जगण्याची विहिरीचं अडकून पडलेलं सरकारी काम उद्याच होत्तया.

गप्पा टप्पा झाल्या अन् गावातली लोकं त्यांच्या घराला निघून गेली. अर्धा अधिक गाव बरसदीचे दिस असल्यानं कधीच पहुडला होता हे लिंबाच्या पारावर गप्पा झोडीत बसलेल्या रामा कुंडूर, जगण्या अन् नव्यानं शिकावू तलाठी म्हणून आलेल्या संतू आण्णा तलाठी यांना कळलेच नाही.

संतू आण्णा पारावरच आपली कागदपत्राची, ऑफिस कामाची कागदं असलेली सुटकेस उश्याला घेऊन अन् कपड्याच्या पिशीची वळकटी करून चालून-चालून पिंडय्रा अन् खालपर्यंत पाय दुखायला लागल्यामुळे ती तळपायाच्या खाली घेऊन रामा कुंडूर अन् जगण्याच्या गप्पा ऐकत आता मात्र निवांत पहुडला होता. तिशीचा आसपास असलेला संतू आण्णा तलाठी गावच्या गप्पामध्ये रमून गेला होता..!

- भारत लक्ष्मण सोनवणे