तुझ्याविन सखे

युवा विवेक    21-Apr-2023
Total Views |

तुझ्याविन सखे

तुझ्याविन सखे मी निराधार आहे

तुझी फक्त सोबत मला फार आहे

तुला बंद केलेच असते इथे पण

मनाच्या घराला कुठे दार आहे

सहज फार चिरतेस काळीज माझे

तुझ्या या जिभेला किती धार आहे

तुझे मौन माझा असा जीव घेते

जिताजागता पण तरी ठार आहे

तुझे राज्य या रोमरोमावरी अन्

हृदय हा तुझा भव्य दरबार आहे

दिला घाव होतास तू ही मनावर

अता शेर माझा पलटवार आहे

गरज ना मला कोणत्या औषधाची

तिचा स्पर्श होणेच उपचार आहे

नका सारखी जात माझी विचारू

कितीदा म्हणू मी कलाकार आहे