माणसाला भूक का लागते?

युवा विवेक    22-Apr-2023   
Total Views |


माणसाला भूक का लागते?

मम्मी भूख लगी है, बस बेटा दो मिनट”. कोणाकोणाला आठवते ही जगप्रसिद्ध मॅगीची जाहिरात. शाळेतून आलेलं लेकरू भुकावलं असणार ही नेमकी गोष्ट त्यांनी यात पकडलीय आणि मार्केटिंगसाठी वापरलीय. आपलं सगळं जगच या भुकेभोवती फिरत असतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. साहित्यक्षेत्रही यातून सुटलेलं नाही. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली, भूक लागली! आपल्याला ही कविता माहिती आहे. भूक लागणं हे आपल्यासाठी अगदी नित्याचच. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, वेगवेगळ्या वेळी भूक लागतच असते. आमच्या आजीच्या भाषेत तिन्ही त्रिकाळ हा यज्ञ सुरूच राहतो आणि त्यात समिधाही पडत असतात. पण भूक लागते म्हणजे नेमकं होतं तरी काय?

माणसाच्या आणि प्राण्यांच्या काही आदिम प्रेरणा आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुन या त्या प्रेरणा. माणसाकडे अजून दोन प्रेरणा आहेत ज्या त्याला प्राण्यापासून वेगळे ठरवतात त्या म्हणजे विचार आणि विवेक. मुळात भूक लागणं म्हणजे काय ते समजून घेऊया. तुम्हाला अन्नाची गरज निर्माण झाली की पोटात खड्डा पडतो, तातडीने काहीतरी खाण्याची आवश्यकता भासते. माणसाला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे ठराविक अन्नाची आणि त्याद्वारे मिळणाऱ्या उष्मांकांची म्हणजेच कॅलरीजची गरज होते. तिची पूर्तता झाली नाही की त्याचे सूचन मेंदू देऊ लागतो म्हणजेच भूकेची भावना तयार होते. क्वचित प्रसंगी पोटात आग पडल्यासारखं वाटतं किंवा एनर्जी कमी झाल्यासारखं वाटतं आणि अन्न पोटात गेलं की भुकेचा अग्नीही शांत होतो आणि ताकदही येते. चयापचय प्रक्रियेद्वारे हे अन्न पचण्याची क्रिया होते व त्यातील जीवनरस शरिरात शोषले जातात. मैला बाहेर उत्सर्जित केला जातो व यानंतर पुन्हा भुकेची भावना तयार होते. पोटात विशिष्ट हालचाल तयार होते. जणू काही पोटात लाटा उठत आहेत अशी जाणीव होऊ लागते. काही न खाल्ल्यास काही वेळाने या भुकेच्या संवेदना अधिक तीव्र होतात व कठोर जाणीव करून देतात. काही वेळेस पोटातून ‘गुर्र, गुर्र’ असा आवाजही होतो. यालाच आपण ‘पोटात कावळे ओरडणं’ म्हणतो.

अन्न खाण्याच्या तीव्र इच्छेला भूक म्हणतात. अस्वस्थ करणारी ही भावना मेंदूच्या "हायपोथालामस" ह्या ग्रंथीतून उगम पावते व अन्न ग्रहण केल्यावर ती नष्ट होते. माणूस अन्नावाचून काही दिवस राहू शकतो. पण भूक सहन करण्याची शक्ती असेल तरच हे शक्य होतं. सर्वसाधारण माणसाला दिवसभराच्या शक्तीसाठी, एनर्जीसाठी १५०० ते १८०० कॅलरीजची गरज असते. हे प्रमाण व्यक्तीनुसार, परिसरानुसार व त्याच्या गरजेनुसार बदलतं. खेळाडू, मजूरवर्ग, कलाकार, वजन उचलण्याचं काम करणारे यांचं हे प्रमाण बदलू शकतं. मेंदूकडून भुकेची सूचना आली की आपल्याला खावंसं वाटतं. ते न केल्यास एनर्जी कमी पडणं, झापड येणं, चीडचीड होणं, क्वचित रडू येणं, विनाकारण रागावणं, विचारात-बोलण्यात गोंधळ उडणं, रक्तातील शर्करा वाढणं-कमी होणं असे प्रकार होऊ लागतात. त्यामुळे भुकेची भावना झाल्यास काही तरी खाणं-पिणं अत्यावश्यक असतं.

साधारणपणे माणसाला तीन ते चार वेळा खाण्याची सवय असते. चटपटीत खाणं सगळ्यांनाच आवडतं पण दैनंदिन स्वरुपातला आपापल्या टाईमटेबलनुसार तीन ते चार वेळा घेतला जाणारा आहार हा स्वच्छ, घऱगुती आणि सात्त्विक असणं गरजेचं आहे. चमचमीत खायला आवडण्यात काहीच चूक नाही. ती वैयक्तिक आवडनिवड असू शकते. पण वारंवार तेलकट, मसालेदार, चमचमीत, अतिगोड खाण्याने पचनशक्तीवर आणि त्यामुळे भुकेवरही परिणाम होऊ शकतो. विशेषतः भरपूर तेल, भरपूर बटर, मैदा याचा दुष्परिणाम पचनावर होतो. त्याचप्रमाणे काही वेळेस स्थानिक पिकांपासून तयार होणारा नसतो. म्हणजे कोकणातल्या माणसाला भात सहज पचतो, गहू पचेलच असं नाही किंवा मका पचेलच असं नाही. त्यामुळे दैनंदिन आहार हा शक्यतो स्थानिक, सात्त्विक आणि आवश्यक तेवढाच मसालेदार असावा असं म्हटलं जातं. काही वेळा अपुऱ्या झोपेमुळेही भुकेवर परिणाम होतो. झोप पूर्ण झाली नाही की त्याचा परिणाम थेटपणे पचनावर होतो आणि त्यामुळे मग भुकेवरही त्याचा परिणाम होतो.

काही जणांना सवयीमुळे, मधुमेहासारख्या विकारांमुळे वरचेवर भूक लागते. ऍसिडिटी होण्याची सवय असेल तरीही वेळीअवेळी भूक लागू शकते. अशा वेळेस पचायला हलका पण पोट भरणारा आहार घेणं सोयीचं ठरतं. काही तज्ज्ञ असं म्हणतात की अनेकदा माणसाला खोटी भूक लागते. म्हणजे पोटाला गरज नसते पण तरीही ती भावना तयार होतो. काही वेळेस एखादा पदार्थ पाहिला की तोंडाला पाणी सुटतं. अशा वेळेस भान राखून आवश्यक तेवढाच आणि आरोग्यकारक आहार घेणं श्रेयस्कर असतं. काही वेळेस आपल्या मूड्सनुसार भुकांच्या वेळा आणि आवडीनिवडी बदलतात. काही जणांना तणावाखाली असताना खूप खाण्याची सवय असते. अशा वेळेस तुमच्याही नकळत वजन कसं वाढत जातं ते कळत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर उपाय शोधणं केव्हाही योग्य ठरतं. काहींना भूक लागण्याची तक्रार असते तर काहींना भूक कमी लागण्याची. कोणाला भरपूर खाल्लं तरी पोट भरत नाही तर कोणाला घासभर खाऊनही पोट भरून गेल्यासारखं वाटतं. अशांनी जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आवश्यक झोपेची पूर्तता आणि योग्य व्यायामानेही भुकेचं प्रमाण वाढतं. काहीवेळा तज्ज्ञांकडून औषधं घेऊनही ती वाढवता येते. आपल्या जीवनशैलीचाही परिणाम भुकेवर झालेला दिसून येतो. एका जागी बसून काम केल्याने भूक लागण्याच्या सवयीवर परिणाम होतो. अशा व्यक्तींना अधून मधून हालचाल करण्याचा, हलका व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

आपल्या एकूणच दिनचर्येत भुकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपलं सगळं काम, पैसे मिळवणं या भुकेच्या पूर्ततेसाठीच तर आहे. मग या भुकेची काळजी घेणं, त्यासाठी योग्य आहार-व्यायाम-झोप घेणं, आवश्यकता असल्यास डॉक्टरांचा, तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. सर सलामत तो पगडी पचास असं म्हटलं जातं. त्याच धर्तीवर 'भूख सलामत तो सेहत खास' असं म्हणू या. योग्य ती काळजी घेऊया म्हणजे मग "सारखं काय रे भूक भूक करतोस?" असं कुणीही तुम्हाला म्हणणार नाही.

- मृदुला राजवाडे