ब्लॉकचा ऑप्शन.....

युवा विवेक    25-Apr-2023
Total Views |


ब्लॉकचाऑप्शन.....

मनाला ही ब्लॉकचा ऑप्शन असता तर...!

कित्ती बरं झालं असतं ना! बॅकस्पेसचं बटण ही चाललंच असतं आणि रिमूव्ह फॉर एव्हरीवनमध्ये तर काय जादू असते ना..

या बटणात... पाठवलेला निरोप नको असेल पोहोचायला तर तीन मिनिटाच्या आत रिमूव्ह करायचा... आता काही काळ वाढवल्याने तर अजूनच सोयीचं!

लिहिलेलं पुसलंय हे जरी समोरच्याला कळलं तरी काय लिहिलं होतं... काही मेळ लागत नाही. समोरचाही शांत आणि आपणही निर्धास्त.. असं आपल्या माणसात पण असायला हवं होतं... हो खरच हवं होतं

उगाच कुणी दुखावले जायला नको, उगा वाईट वाटायला नको आणि शब्दांचा किस तर पडायलाच नको. मेंदूतला की मनातला कुणास ठाऊक, पण या दोहोपैकी आपल्याला हवा तो डेटा क्लिअर अगदी रिसायकल बिनसुद्धा क्लीन चॅट करता आली पाहिजे. एखाद्या नंबर सारखं एकदा ब्लॉक केलं की संपलं या नंबरचं त्या नंबरमधलं नातं कधीच अस्तित्वात नसल्यासारखं, एकमेकांच्या परिघातून शंभर टक्के हद्दपार...

एखाद्या कृतीचं ना वाईट वाटणं ना वाईट वाटवणं अगदी परग्रहावर असल्यासारखे एकमेकांना अनभिज्ञ..

हे असं काहीतरी भन्नाट आपल्याही आयुष्यात घडायला हवं... आणि हृदयात मेंदूत जिथं कुठं आठवणी, संवेदनांचा कप्पा आहे ना... तो तर असायलाच नको आणि असला तरी डिलीटचा ऑप्शन आहेच ना..

किंवा क्लिअर चाट आहेच की..

आणि तसंही

विज्ञान सांगतं ना वापरात नसलेले अवयव हळूहळू नामशेष होत जातात त्याची उदाहरणंही आहेतच की आपल्याकडे; अक्कलदाढ, शेपूट आणि अजून बरेच, तसे मला हल्ली वाटायला लागलेय की काय उपयोग या मानवी मनाचा नि संवेदनचा आणि असला तरी त्याचा वापर आपण करतो का..? नाही ना... मग हव्यात कशाला या भावना.. वेदना संवेदना, मन, माणूसपण, बिइंग ह्यूमन वगैरे सारखं काहीतरी....

होऊन जाऊच दे एकदाचं नामशेष हे सारं!

जगूया रोबॉटसारखं... आखीवरेखीव चौकटीत आखल्यासारखं चौकोनी होऊन, वळण नकोच कसलं अन वळणावळणाचं नागमोडी तर नकोच नको...

मन बोथड होतं चाललंय का? की मेंदू दुर्लक्ष करतोय मनाकडे!

की आपल्याही नकळत निर्माण झालाय आपल्यात एक ब्लॉकचा ऑप्शन?

इथे माझ्या घरासमोर नीलमोहर टच्च डवरलाय.. निळाई अक्षरशः उधळू पाहतोय त्याचा देह.. नि अव्याहत चालणारं कोकिळ कुजन

डोळ्यांच नि कानांच पारणं फेडणारे हे वासंतिक क्षण जगता, अनुभवता आणि स्वतःत साठवून झिरपवून घेता आले पाहिजेत..

पण जाता येता साधं लक्षसुद्धा जात नाही हल्लीं कुणाचं...

माणसं जात आसतात येत असतात.. वर्दळ चालूच असते .

वर्दळीत माणसाच्या आकृतीतले मनं नसलेले देह नावाचे सापळे धावत असतात आपल्याच तंद्रीत, गतीत, तालात.. की असंवेदनशिल बेशुधीत ..

कुणास ठावूक?

- अ- अमिता पेठे पैठणकर