मला बी जत्रंला येऊ द्या की

युवा विवेक    28-Apr-2023   
Total Views |

 
मला बी जत्रंला येऊ द्या की

तुम्ही कधी उत्सवात सहभागी होण्यासाठी नट्टा पट्टा करून मंदिरात गेलायत? कधी उत्सवाचा सुंठवडा खाल्लायत? कधी गावदेवीच्या वार्षिक उत्सवात चिंचा, बोरं खाल्लीयेत ? काचेच्या बांगड्या भरल्यायत आहेत? कधी छबिना नाचवलाय? पालखी उचलली आहे? गुलाल उधळलाय? उत्सवाच्या पंगतीत आग्रहाचं जेवलायत? ज्यांना हे अनुभवता आलं ते खरोखरच नशीबवान. कोकणात पावसचा श्रीराम नवमीचा उत्सव आणि आईच्या माहेरचा सातारा जिल्ह्यातील कुमठे गावातला हनुमानजयंतीचा उत्सव हे थेट आमच्या घरातलेच उत्सव. त्यामुळे या संस्कृतीचा अगदी जवळून आनंद घेता आला. तिथल्या ग्रामदेवतेच्या जत्रेचा अनुभव घेता आला.

अनेक गावांमध्ये दरवर्षी ग्रामदैवतांच्या, लोकदैवतांच्या जत्रा होत असतात. आत्ताचा सिझन हा खास जत्रांचा म्हणूनच ओळखला जातो. जत्रा म्हणजे केवळ देवाचा उत्सव नाही. जत्रा म्हणजे लोकांना एकत्र आणण्याचं, त्यांच्यातील सुखसंवादाचं एक निमित्त, या दिवसांच्या निमित्ताने आपल्या श्रद्धास्थानांचं स्मरण लोक करतात. जत्रा म्हणजे उत्साहाचं, आनंदाचं प्रतीक. साधारणतः पावसाळा संपला की नवरात्र, दिवाळीच्या आसपास कृषिवल हे आपल्या कामातून बऱ्यापैकी मोकळे झालेले असतात. घरात धनधान्य आलेलं असतं व पुढच्या पेरणीपर्यंतची तजवीज झालेली असते. त्यामुळे डिसेंबरपासून ते साधारण एप्रिल-मेच्या मध्यापर्यंत जत्रांचं आणि वार्षिकोत्सवांचं हे सत्र सुरूच असतं. कोकणात विशेषतः शिमग्याच्या, महाशिवरात्रीच्या काळात अनेक उत्सव पार पडतात. ग्रामदेवतेच्या उत्सवासह रामनवमी, दासनवमी, हनुमानजयंती याचेही उत्सव असतात. महाराष्ट्रात भराडी, मार्लेश्वर, कुणकेश्वर, जोतिबा, खंडोबा, निरनिराळ्या ठिकाणची चैत्री नवरात्र अशा अनेक जत्रा प्रसिद्ध आहेत.

अनेक गावांमध्ये ग्रामदेवतेच्या उत्सवाच्या निरनिराळ्या परंपरा असतात. गुढ्या, पताका, रांगोळ्या, तोरणांनी गावं सजतात. एकत्र येऊन महिलावर्ग निरनिराळे पदार्थ, साठवणीचे पदार्थ करतो. वर्षभर चुलीजवळ खपणाऱ्या गृहिणींना अनेक गावांमध्ये जत्रेच्या काळात स्वयंपाकातून सुट्टी मिळते व सामूहिक भोजनाचा बेत ठरतो. यासाठी गावातला पुरुषवर्ग, आचारीवर्ग कंबर कसून पुढे सरसावतो. शिजवण्यापासून वाढण्यापर्यंत महिला सन्मानाचा एक वेगळाच पैलू यात दिसून येतो. जत्रेचा निमित्ताने ग्रामस्थ नवीन कपडे खरेदी करतात, घर शाकारतात, सजावट करतात. जत्रेच्या दिवशी फेटेबिटे बांधून, स्त्रीवर्ग दागदागिने घालून उत्साहाने या जत्रेत सहभागी होतो. जत्रेच्या काळात गावाबाहेरून अनेक विक्रेते गावात येतात. यात खेळणीविक्रेते, कासार, विविध कलात्मक वस्तू बनवणारे, कापड विक्रेते, बर्फाचा गोळा-आईस्क्रिम विक्रेते, उसाचा रस विकणारे, गृहोपयोगी वस्तू विकणारे असे अनेक विक्रेते या जत्रेच्या निमित्ताने येतात आणि गावकऱ्यांना मनाप्रमाणे खरेदी करता येते, आनंद घेता येतो. फुटाणे, बत्तासे, कंदी पेढे, बुंदीचे लाडू, शेवगाठ्या, खडखडे लाडू, खाजे, शेवचिवडा, जिलेबी अशा वेगवेगळ्या पदार्थांची अक्षरशः लयलूट असते. यानिमित्ताने या विक्रेत्यांनाही योग्य गिऱ्हाईक मिळतं. हे विक्रेते गावोगावच्या जत्रांमध्ये फिरत असतात. या वस्तूंचं महत्त्व शहरातल्यांना जाणवणार नाही. पण अगदी दूरवर खेड्यात राहणाऱ्यांना यातूनच आनंद मिळतो असतो. जवळपास वर्षभर गावकरी या जत्रेतल्या बाजाराची वाट बघत असतात.

या जत्रांमध्ये लोककलाकारांनाही सादरीकरणाची संधी मिळते. मेळे असतात, तमाशा, लावणी कलाकार आपली कला सादर करतात. त्यानिमित्ताने लोकांचं मनोरंजन होतं. काही ठिकाणी कुस्तीचे फड लावले जातात. या स्पर्धा जिंकणाऱ्यांसाठी रोख रकमा, चांदीच्या गदा, फिरते चषक अशी मोठमोठी बक्षिसंही ठेवलेली असतात. जिंकणाऱ्या पैलवानांना गौरवले जाते. काही गावांमध्ये बैलांच्या शर्यती असतात. कधी कोंबड्यांच्या झुंजी असतात, तर कधी गोवंशांचे बाजार भरतात, खरेदी-विक्री होते. सहा सहा महिने या जत्रांची तयारी होत असते. अनेक जण पूर्वतयारीत तर काही प्रत्यक्ष जत्रेच्या काळात घरदार विसरून तन्मयतेने काम करत असतात.

आपल्याकडे मंदिर अर्थशास्त्र हा एक अभ्यासाचा विषय आहे. एक मंदिर हे अनेकांना रोजगार देत असतं. पुजारी, देखरेख करणारे, साफसफाई करणारे कामगार, फूलविक्रेते, सजावट करणारे, देवांचे फोटो-मूर्ती विकणारे, पूजासाहित्य विकणारे, ओटीसाठी साड्या-नारळ असं सामान विकणारे, परिसरातील हॉटेलमालक, वाहनचालक, अकाऊंटंट, सुरक्षाव्यवस्था पाहणारे अशा कित्येकांना यातून रोजगार मिळतो. मंदिर परिसरात भरवल्या जाणाऱ्या या जत्रादेखील या मंदिर अर्थशास्त्राचाच एक भाग असतात. येथील परंपरांच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, पूजा करतात, नवे कपडे विकत घेतात, फुलंफळं विकत घेतात, वर्षभराची आनंदाची खरेदी करतात, तमाशा पाहतात, खाद्यपदार्थ विकत घेतात, कुस्ती पाहतात, कुस्तिगिराला बक्षीसं देतात, लहान मुलांसाठी खाऊ घेतात अशी बरीच मोठी देवघेव, खरेदीविक्री या जत्रांच्या काळात होत असते. यामुळे उत्पादकांना, कलावंतांना, सर्वसामान्य विक्रेत्यांना रोजगारही मिळतो. अनेक गावागावांतून या काळात स्थानिक नाट्यकलाकारांचे प्रयोग आयोजित केले जातात, गाण्याचे कार्यक्रम होतात. काही गावांत शहरातून नाटकं बोलावली जातात. ज्यांची केवळ नावं ऐकली अशा कलाकारांचं सादरीकरण ग्रामस्थांना पाहता येतं. तेवढा काळ स्वतःची दुःख विवंचना दूर ठेवून निखळ मनोरंजनाचा आनंद घेता येतो. कोरोनाच्या काळात मंदिरं बंद असल्यामुळे, जत्रांवर बंदी आल्यामुळे या विक्रेत्यांचं, लोककलाकारांचं, नाट्य-संगीत कलाकार, स्थानिक उत्पादकांचं किती नुकसान झालं असेल याची कल्पना आपण करू शकतो.

आजही खरा उत्सवप्रेमी चाकरमानी आपल्या गावच्या उत्सवांना सुट्टी घेऊन आवर्जून हजेरी लावतो. वाट्टेल ते होवो तो गावच्या जत्रेला जाणारच म्हणजे जाणारच. पण गेल्या काही वर्षांत, विशेषतः आज पंचविशी तिशीत असणाऱ्या तरुणाईचं हे प्रमाण कमी झालंय. याचं कारण शहरातील व्यग्र वेळापत्रक आणि एकूणच गावाची कमी होत चाललेली ओढ. ज्यांचे आजीआजोबा किंवा पणजोबा शहरात येऊन स्थिरावले अशा अनेकांना तर गावच उरलेलं नाही. त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढलेय. अन्यथा ही संस्कृती, नातेसंबंध, ही अकृत्रिमता, साध्या साध्या क्षणातून मिळवलेला आनंद हे सारं आपण हरवून बसू. जत्रा, उत्सव हे केवळ एक निमित्त असतं. गाव जागतं ठेवण्याचं, तेथील परंपरा-संस्कृती जपण्याचं, भेदाभेद विसरून आनंद घेण्याचं. अशा या उत्सव आणि जत्रांमुळे मनाने दूर गेलेले एकत्र येतात, माणसामाणसातील वाद मिटण्यास मदत होते, गावात एकता नांदते. त्या ठराविक काळापुरतं पण गावातील वातावरण उत्साहपूर्ण, आनंदाने भारलेलं असतं. या अशा संस्कृतीच माणसाची जीवनेच्छा अधिक प्रबळ करतात.

गावागावातील हे उत्सव वा जत्रा म्हणजे श्रद्धाळूंसाठी हा आपल्या श्रद्धास्थानाप्रती समर्पित होण्याचा काळ. पण या जत्रा म्हणजे केवळ देवाचं स्मरण करण्याचं निमित्त नव्हे. माणसांना जोडणारं ते एक निमित्त असतं. ही निमित्त आपण टिकवायला हवीत. मला बी जत्रंला येऊ द्या की असं म्हणून आपणंही यात सहभागी व्हायला हवं.

 
-मृदुला राजवाडे