फिल्मी शीर्षकांच्या गमतीजमती

युवा विवेक    03-Apr-2023   
Total Views |


फिल्मी शीर्षकांच्या गमतीजमती

भारतीय सिनेमाला जवळपास १०० वर्षांचा समृद्ध इतिहास आहे आणि त्यातल्या त्यात हिंदी सिनेमाची लोकप्रियता आणि विस्तार एवढा आहे की वर्षाला सर्वाधिक सिनेमे निर्माण करणारी इंडस्ट्री म्हणून जगभर तिचा नावलौकिक आहे, पण चित्रपट निर्मितीच्या या अफाट वेगामुळे अनेकदा बऱ्याचदा गमती, पुनरावृत्ती किंवा योगायोग म्हणावा अशा गोष्टी जुळून येतात. एकाच अभिनेत्याने एकाच नावाचे दोन चित्रपट करावेत किंवा एकाच अभिनेत्रीने एकाच घरातील दोन पिढ्यांच्या नायकांसोबत काम करावेत याची अनेक गमतीदार उदाहरणे सापडतात.

उदा., प्रख्यात विनोदी अभिनेता असरानीने जुन्या आणि नव्या दोन्ही हेराफेरीमध्ये काम केलं आहे. अमिताभ आणि विनोद खन्ना जोडगोळीच्या जुन्या हेराफेरीत तो खलनायकाचा हरवलेला मुलगा असतो तर अक्षयकुमार - सुनिल शेट्टीच्या हेराफेरीत वैतागलेला बँक मॅनेजर !

अशीच पुनरावृत्ती बॉबी देओल (बरसात), करीना कपूर (तलाश), अमरीश पुरी (हलचल), संजय दत्त (हथियार), अमिताभ बच्चन (दिवार) यांच्या बाबतीत झाली आहे त्यांनी एकाच नावाचे शीर्षक असलेले दोन दोन चित्रपट केले आहे.

“अंदाज" नावाच्या एकाच शीर्षकाच्या तीन वेगळ्या चित्रपटांत कपूर घराण्यातले तीन कपूर आहेतराज, शम्मी, करिष्मा !!! तर दुसरीकडे मिथुन चक्रवर्तीने एकट्यानेच गुरू' नावाचे तीन चित्रपट केले आहेत. अर्थात मिथुनची कारकीर्द आणि भूमिका स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

दिल्लगी' नावाचे दोन वेगवेगळे सिनेमे धर्मेंद्र सनी देओल या पिता-पुत्रांनी केले आहेत तर हंगामा' नावाचे दोन वेगवेगळे सिनेमे विनोद खन्ना - अक्षय खन्ना ह्यांनी केले आहेत.

जॅकी श्रॉफच्या कारकीर्दीचा शुभारंभ करणारा चित्रपट हिरो होता तर त्याच्या मुलाला म्हणजे टायगर श्रॉफला हिरोपंक्तीने बॉलिवूडमध्ये स्थान मिळवून दिले. थोड बारकाईने ऐकल तर दोन्ही सिनेमांचं थीम म्युजिक सारखं दिसून येईल.

नायकांप्रमाणेच नायिका पण यात मागे नाही, एक अजब योगायोग म्हणजे प्रियांका चोप्राने अमिताभ बच्चनच्या डॉन, अग्निपथ, जंजीर या तिन्ही सुपरहिट चित्रपटांच्या रिमेकमध्ये नायिकेची भूमिका साकारली आहे. त्या सिनेमात अनुक्रमे शाहरुख खान, हृतिक रोशन, रामचरण मुख्य भूमिकांत असले तरी नायिका होण्याचा बहुमान मात्र प्रियांका चोप्रा शिवाय इतरांना मिळाला नाही.

रामगोपाल वर्माने शोलेचा रिमेक करण्याचा एक गंडलेला प्रयत्न "रामगोपाल वर्मा की आग"मधून केला होता. त्यात जुन्या शोलेमधील अमिताभ बच्चन वगळता महागुरू सचिन पिळगावकर हे एकमेव रिपीट झालेले अभिनेते होते.

बहुचर्चित शाहिद' सिनेमात मुख्य भूमिकेत शाहिद कपूर शोभला असता, पण तिथे मुख्य भूमिकेत राजकुमार राव होता. तर याउलट गंमत म्हणजे 'R राजकुमार'मध्ये राजकुमार रावऐवजी मुख्य भूमिकेत शाहिद कपूर होता.

चित्रपटांची शीर्षके जशी रिपीट झाली तशी दोन पिढ्यांमध्ये रिपीट होणाऱ्या नायिका पण आहेत.

माधुरी दीक्षितने विनोद खन्नासोबत दयावान’मध्ये - अक्षय खन्नासोबत मोहब्बत’मध्ये दोघांच्या नायिकेची भूमिका केली आहे. डिंपल कपाडियाने देखील इंसाफ’मध्ये विनोद खन्नाची तर नंतर " दिल चाहता है "मध्ये अक्षय खन्नाची नायिका साकारली होती. ऋषी कपूरसोबत प्रेमग्रंथमध्ये काम केल्यानंतर 'यह जवानी है दिवानी'मध्ये त्याच्या मुलासोबत म्हणजे रणबीर कपूर सोबतपण एका आयटम साँगमध्ये (टिव्हीपे ब्रेकिंग न्युज हाय रे तेरा घागरा) धमाल उडवून दिली होती. हेमा मालिनी आपल्या पहिल्या सिनेमात म्हणजे सपनोका सौदागरमध्ये राज कपूरची नायिका होती, तर हाथकी सफाईमध्ये रणधीर कपूरची नायिका होती.!

याबाबतीत धर्मेंद्र आणि सनी देओल ही पिता-पुत्रांची जोडी दोन पिढ्यांमध्ये अधिक लोकप्रिय होती. डिंपल कपाडिया (दुश्मन देवता, नरसिंहा), जयाप्रदा (वीर, वीरता), श्रीदेवी (फरिश्ते, चालबाज), अमृता सिंग (सच्चाई की ताकत, बेताब) हे अनुक्रमे दोघांच्या नायिका असलेल्या चित्रपटांची नावे उदाहरण म्हणून सांगता येईल.

‘बुममधील कॅटरीना कैफ, पिंकमधील तापसी पन्नु किंवा ब्लॅकमधील राणी मुखर्जी या रूढार्थाने अमिताभ बच्चनच्या नायिकेच्या भूमिकेत नव्हत्या तरी चित्रपटातील मुख्य पात्रांपैकी एक होत्या पुढे तिघीनिही अभिषेक बच्चनसोबत अनुक्रमे सरकार’, मनमर्जिया’, युवा’ असे सिनेमे केले आहेत. याबाबतीत वहिदा रहमान आणि अमिताभ बच्चनच्या नावावर वेगळीच नोंद आहे. अदालतमध्ये ती अमिताभची प्रेयसी होती तर त्रिशूल’मध्ये त्याच्या आईच्या भूमिकेत होती, त्यामुळे हा पण वेगळाच योग जुळून आलेला दिसेल.

अशा नाना विविध रंजक कारनाम्यामुळे हिंदी सिनेमा पिढ्यानपिढ्या लोकप्रिय असेल तर त्यात नवल ते काय.!!

सौरभ रत्नपारखी