सावध ऐका ‘सायबर धोक्या’च्या हाका

युवा विवेक    07-Apr-2023   
Total Views |


सावध ऐका ‘सायबर धोक्या’च्या हाका

तुम्हाला मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मेसेजेस किंवा व्हॉट्सअप मेसेजेस येतायत का? कोणी वेगवेगळ्या ऑफरच्या लिंक पाठवतायत का? मेसेजबॉक्समध्ये एखादा महागडा मोबाईल अर्ध्या किमतीत देणारी स्कीम भुरळ घालतेय का? किंवा मेलवर अनपेक्षित इमेल ऍड्रेसवरून मेल येतायत का? तुम्हाला भरघोस रकमेचं बक्षीस मिळाल्याचं कोणी मेलवरून सांगतंय का? तुम्हाला इनबॉक्समध्ये संशयास्पद अकाऊंटवरून संवाद सुरू करण्यासाठी हाय हॅलो केलं जातंय का? हे असं होत असेल तर जपून बरं का. क्षणिक मोह वाटणं हे स्वाभाविक असलं, तरी एखाद्या मोठ्या सायबर फसवणुकीत अडकण्याची ही सुरुवात असू शकते.

समाजाला गुन्हेगारी प्रवृत्ती काही नवीन नाहीत. चोरी, दरोडेखोरी, फसवणूक हे असे प्रकार सर्व प्रकारच्या समाजात गेली अनेक वर्षे होतच आले आहेत. पण आधुनिक काळात सायबर गुन्हेगारी हा एक नवा प्रकार या क्षेत्रात सुरू झाला आहे व अनेक अशिक्षित-सुशिक्षित असे सर्व समाजघटक या फसवणुकीला बळी पडत आहेत. मुळात इंटरनेटचा विकास झाला, तेव्हा कर्त्यांना असं वाटलंही नसेल की या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग गुन्हेगारीसाठी केला जाईल. पण समाजात जशा सकारात्मक प्रवृत्ती असतात तशाच नकारात्मकही असतात त्यामुळे हे दुधारी शस्त्र कुणी कल्याणासाठी वापरलं तर कोणी विध्वंसासाठी. सायबर गुन्हेगारी हा त्यातलाच एक प्रकार. नवीन तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामाचं फलित म्हणून सायबर गुन्हेगारीकडे पहावं लागेल. महिला, किशोरवयीन मुलं आणि वयोवृद्ध व्यक्ती यांचं सायबर गुन्ह्यात फसवणूक होण्याचं प्रमाण अधिक आहे.

सायबर गुन्ह्यांचे अनेक प्रकार आपल्याकडे अस्तित्वात आहेत. इमेलद्वारे होणारा छळ, सायबर पोर्नोग्राफी, सायबर बदनामी, मॉर्फिंग(छायाचित्रांत फेरफार), इमेलद्वारे टिंगल, इंटरनेट दस्तावेजांमध्ये फेरफार, आक्षेपार्ह संदेश पाठवणे, संगणक स्रोत वापरून केलेली आर्थिक फसवणूक, अश्लील साहित्याचा प्रसार, देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणं अशा वेगवेगळ्या स्वरूपाची फसवणूक वा सायबर गुन्हे घडताना दिसतात. गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन्समुळे सायबर गुन्हे अगदी आपल्यापर्यंत थेट येऊन पोहोचलेत. आपले नंबर आणि इमेल ऍड्रेस अनेक मोबाईल ऍप्सशी संलग्न असतात. ऍप सुरू करण्यासाठी प्रोसिजरनुसार ते तसे जोडावेच लागतात. अशा वेळी ऍप डाऊनलोड करतानाच ते अधिकृत आहे का, ते अनोळखी कंपनीने सुरू केलेलं नाही ना ते आपण पाहणं अत्यंत आवश्यक असतं.

तरुण मुलं अनेकदा आपल्या स्मार्टफोन्सवर निरनिराळे ऑनलाईन गेम्स खेळत असतात. ते गेम्स कोणते आहेत, त्याची निर्मिती करणारी संस्था कोणती आहे, त्या खेळांचं स्वरूप काय आहे याबाबत दक्षता बाळगणं अत्यावश्यक असतं. त्या खेळाचं ऍप डाऊनलोड केल्यानंतर चित्रविचित्र मेसेजेस येत असतील, तुम्हाला खेळात गुंतवून ठेवण्यासाठी निरनिराळी प्रलोभनं दिली जात असतील तर ही स्थिती अत्यंत धोकादायक. यासाठी अनेकदा तुमच्याही नकळत तुम्ही पैसे भरत जाता आणि आकडा मोठा झाल्यावरच भानावर येता. काही वेळा पॉप अप मेसेजेसद्वारे अश्लील संदेश किंवा अश्लील व्हिडिओज पाठवले जाऊ शकतात. असं घडत असेल तर तातडीने ते ऍप डीलीट केलं पाहिजे व आपल्या कुटुंबियांना त्याची माहिती दिली पाहिजे. पण या वयात लैंगिक भावना विकसित होत असतात त्यामुळे या प्रकारात तरुण(अनेकदा अन्य वयोगटातीलही) वाहावत जाण्याची शक्यता अधिक असते. याबाबत पालकांनी आपल्या मुलांना सावध करणं व त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधणं अत्यंत गरजेचं असतं. अनेकदा सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सपअप सारख्या माध्यमातून अनपेक्षित व्हिडिओ कॉल येतो आणि नकळतपणे/किंवा जाणीवपूर्वक तो उचलला जातो. त्या कॉलवर अश्लील संवाद साधणं तसेच अश्लील अंगविक्षेप असे प्रकार दिसून येतात व तो कॉल रेकॉर्ड करून बदनामीची धमकी देत पैसे उकळले जातात. वृत्तपत्रांतून आपण अशा अनेक बातम्या वाचत असतो. असं घडलं तर बदनामीच्या भीतीने गप्प बसण्यापेक्षा घरच्यांना ते सांगणं व वेळीच सायबर पोलिसांना त्याची माहिती देणं आवश्यक असतं. आज घरात बसून कोणालाही न समजता वेबसाईटच्या माध्यमातून पोर्न क्लिप्स किंवा सिनेमे सहजपणे बघता येऊ शकतात. यासाठी त्यांना प्रत्यक्षपणे कोठे जाण्याची गरज उरलेली नाही. लहान मुलांसंबंधित पोर्नोग्राफी जी जागतिक पातळीवर अयोग्य मानली जाते, अशा प्रकारची पोर्नोग्राफी पसरविणे किंवा लपवून ठेवणे हे इंटरनेटमुळे गुन्हेगारांना अगदीच सोपं झालंय. त्याचप्रमाणे किशोरवयीन किंवा त्यापेक्षाही लहान वयाच्या मुलांच्या समोर या फिल्म्स अत्यंत सहजपणे येऊ लागल्या आहेत. त्याचप्रमाणे तरुण तरुणींना मोहात अडकवून, त्यांचे अश्लील चित्रिकरण करून, व्हिडिओ कॉलवर चित्रिकरण करून बदनामी करण्याची भीती दाखवून शोषण केल्याच्या, पैसे उकळल्याच्या घटनाही झाल्याचं आपल्या वाचनात येतं. ड्रग ट्रॅफिकिंगसारखे गुन्हेदेखील सायबर माध्यमातून केले जातात.

सायबर गुन्ह्यांतर्गत होणारी आर्थिक फसवणूक हा आणखी एक नवा प्रकार गेल्या काही वर्षांत वाढू लागला आहे. क्यू आर कोड स्कॅन करून पैसे खात्यातून वळते करणं, महागडी भेट पाठवत असल्याचं भासवून त्यासाठी ट्रान्सपोर्ट चार्ज भरायला सांगणं हे प्रकार सर्रास होताना दिसतात. बँकेच्या वेबसाईट हॅक करून पैशांची अफरातफर, डेबिट-क्रेडिट कार्ड फ्रॉड, डिजिटल पेमेंट फ्रॉडही केले जातात. या सगळ्या पलिकडे देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करत, राष्ट्रद्रोह स्वरुपातील सायबर गुन्हेही घडतात. वायरस हल्ला करून वेबसाईट हँक करून गोपनीय माहिती चोरणं, देशातील अत्यंत गोपनीय माहिती विकणं असे गुन्हे यात घडतात. यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला, सुरक्षेला, अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत भारतातील सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायदे अधिकाधिक कडक करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे गुन्ह्याच्या स्वरुपानुसार शिक्षाही कडक करण्यात आल्या आहेत.

अश्लील मजकूर, जातीय तेढ निर्माण करणारा मजकूर, समाजाबाबदल निंदा करणारा मजकूर यावर आयटी सेलचं बारीक लक्ष असतं. पण एक नागरिक म्हणून आपणही सजग राहणं तितकंच आवश्यक आहे. असा कोणताही संशयास्पद मेसेज येत असेल, गरज नसतानाही पैसे भरण्याची विनंती येत असेल, अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉलसाठी रिक्सेस्ट येत असेल तर खूप सावधपणे पावलं उचलणं गरजेचं आहे. अशा कॉलना उत्तर देऊ नये, दिल्यास व समोरच्याकडून अश्लील वर्तन होत असल्यास ताबडतोब खोन बंद करुन घडलेल्या घटनेची माहिती आपल्या घरातल्यांना व पोलिसांना देणं आवश्यक आहे. पोर्नोग्राफीपासून दूर राहणं, जातीय तेढ वाढवणाऱ्या समुहांपासून स्वतःला दूर ठेवणं हे केव्हाही चांगलं. तंत्रज्ञानाची प्रगती स्वागतार्ह असली तरी तिचा वापर विवेकानेच करायला हवा. यात वावरताना कोणता क्षण आपल्यासाठी संकट म्हणून समोर उभा राहील ते सांगता येत नाही. म्हणून सावध राहणं हेच खरं शहाणपण.

- मृदुला राजवाडे