माणूस जाणून घेताना..

युवा विवेक    10-Jun-2023
Total Views |

माणूस जाणून घेताना..

माणसाला माणसाकडून काय हवं आणि काय नको, हे सांगणं मोठं कठीणच! माणसाच्या मनात केव्हा कुठला विचार येईल, हे सांगता येत नाही. आपण ज्याच्याशी बोलतोय त्याचं लक्ष आपल्याकडे आहे का? की तो त्याच्या मनाच्या निराळ्या विश्वात रमलाय? याचा पत्ता लागत नाही. इतकंच कशाला हल्ली घटस्फोट तरी किती वाढलेत, बघा ना! एका छताखाली राहणा-या दोन माणसांचं एकमेकांशी पटत नाही. सतत खटके उडतात. दोन माणसं एकत्र येऊनही एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत.

काहीवेळा सुरुवातीला एकमेकांचं खूप पटतं; पण कालांतराने संवादाचं गणित जमत नाही. आयुष्यातल्या या माणसाचं गणित चुकलं, असं समजून आपण नातं तुटू नये इतपत त्याच्याशी संबंध ठेवतो. पण मग हे वरवरचं नातं आपण का ठेवतोय? अशी स्वतःचीच मग चिडचिड होते, नको नको होतं. अशा माणसांचे विचारदेखील मनातून जा म्हटलं तरी जात नाहीत. काल हाकलून दिलेलं मांजर आज पुन्हा आपल्या पायापायाशी घुटमळावं तसं त्या विचारांचं होतं. विचार येणं हे आपल्या हातात नसलं तरी सारासार तो विचार करणं हे मात्र आपल्याच हातात असतं. याकरिता दोन माणसं जेव्हा प्रथम एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यात होणारा संवाद, मग त्यापुढील भेटीतला संवाद या साऱ्यांचं गणित जुळून येणं, म्हणजे नातं..

या धावपळीच्या जीवनात एकमेकांशी ओळख करून घेण्याची सुद्धा धावपळ असते. ही ओळख जितक्या लवकर होईल, तितकं नातं कंटाळवाणं होतं. कदाचित हे काही जणांना पटणार नाही. पण प्रत्यक्षात विचार केला किंवा याचा अनुभव घेतला तर काही प्रमाणात हे पटेल. समोरचा माणूस काय करतो? लग्न झालंय का? मुलं किती? कुठे राहतो? उत्पन्नाचं साधन, इ. अनेक प्रश्नोत्तरे आपण एकमेकांना शेअर करतो. हे शेअर करणं एखाद्या एक्सप्रेस रेल्वे सारखं सुफरफास्ट होतंय हल्ली! आपल्याला रेल्वेसारखं इच्छित स्थळी पोचायचं नाही, तर आयुष्याच्या प्रवासात लागणारी प्रत्येक स्टेशन्स आपल्याला जपायची आणि जोपासायची आहेत, याचा प्रथम विचार कोणतंही नातं जोडताना आपण करायला हवा...

खरंतर नातं जितकं अनोळखी तितकं ते टिकतं. एकमेकांच्या अनोळखी गोष्टी जाणून घेण्याची ओढ असणं हा खरा नात्याचा गाभा आहे. उपजिविका किंवा आयुष्यात आवश्यक असणा-या सर्व गोष्टी माणूस करत असतोच. त्यामुळे काही नात्यात उपजीविका, बायको-मुलं याबाबत माहिती एकमेकांशी शेअर करायलाच हवी किंवा सगळं एकदमच सांगायला हवं, असं काही नाही. नात्याच्या कलाकलानी, वळणावळणावर हे सारं हळूहळू शेअर करता येईलच की! नवरा बायकोचं नातं असलं म्हणजे हल्ली तीन-चार वर्षांत एकमेकांच्या इतक्या सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर केल्या जातात की, आता काय बोलावं हा प्रश्न उत्पन्न होतो. मग संवाद खुंटतो आणि त्याचा नात्यावर निश्चितच परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक नात्यात 'शेअर करणं' याच्या काही सीमा, काही मर्यादा ठरलेल्या असतात. त्या अलिखित असल्या तरी नातं म्हणून एकमेकांना स्वीकारताना त्या निसर्गतःच आपल्याला समजतात. अगदी साधं सोपं उदाहरण म्हणजे फोटोग्राफर किंवा अगदी तुमच्या-माझ्या मोबाईलवरचे फोटोच बघा ना! हल्ली कॅण्डिड फोटो नावाचा प्रकार भारी गाजतोय. कृत्रिम हावभावापेक्षा नैसर्गिक हावभाव किती छान वाटतात! लग्न समारंभात तर असे फोटो खूपदा काढले जातातच. जेव्हा एकमेकांकडे बघून माणूस हसतो तेव्हा देखील किती सुंदर भावना तो फोटो बघून आपल्या मनात निर्माण होते. नात्याचंही अगदी तसंच आहे की रोज किंवा नेहमीच एकमेकांशी सगळं बोलायला हवं किंवा शेअर करायलाच हवं असं नाही. एखादं हास्य देखील नात्यावर अलगद पाणी शिंपडून नातं टवटवीत ठेवतं.. हीच माणसाला जाणून घेतानाची नात्यातली गंमत!

नातं एखाद्या झाडासारखं किंवा फुलासारखं छान कलाकलानी उमलणारं असावं. नातं म्हणजे फूल आणि त्या नात्याचा अर्थ म्हणजे सुगंध.. फुलाला मी उमलतोय म्हणून सांगावं लागत नाही. अलवार येणा-या गंधातून ते आपल्याला समजतं आणि आपण त्या फुलाच्या दिशेने आपोआप जातो. वाटलं तर त्या फुलाला अलगद स्पर्श देखील करतो. तेव्हा ते फूल नकळत आपल्या हातावर सुगंध देतं. मग पहिल्यांदा दरवळलेला तो गंध आणि आता या फुलाचा सुगंध यांची आपल्या मनात छानशी गट्टी जमते आणि त्या फुलाशी सुद्धा आपलं नातं जुळतं. इतकं सहज नातं आपण जुळवणं शिकायला हवं. काही नात्यात संवाद, काही नात्यात डोळे, काही नात्यात स्पर्श हे एकमेकांना भेटतात. आता यातलं मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठल्या नात्यात काय असेल हे ज्याचं त्यालाच ठाऊक असतं. नकळत समजून घेणं, स्पर्शांचे अर्थ स्पर्शातून जाणून घेणं आपण शिकायला हवं. नातं निश्चितच गुलमोहरासारखं बहरेल, त्याचा सडा आयुष्याची वाट नक्की प्रसन्न करेल.

-
गौरव भिडे