वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग १०

युवा विवेक    14-Jun-2023   
Total Views |


वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग : ९

दुसऱ्या दिवशी पहाटेच कोंबड्याच्या बांगेसरशी संतू अण्णा तलाठी उठले. अंघोळपाणी करून गावातल्या आईच्या पिंपळ पारावर येऊन गावकऱ्यांची ख्यालीखुशाली ऐकत बसले. आज संतू अण्णा तलाठी यांची खऱ्या अर्थाने सेवा सुरू होणार होती, म्हणून साडेनऊ वाचताच रामा कुंडुर संतू अण्णा तलाठी यांचा सत्कार करावा म्हणून सरपंचाच्या सांगण्यावरून शाल, श्रीफळ, हार घेऊन गावात असलेल्या तलाठी हाफीसात आला. जगण्याने तोवर हाफीस झाडून काढले होते अन् हाफीसाच्या सभोवताली असलेल्या बागेला तो पाणी घालत होता.

दहाची वेळ गप्पात कशी झाली कळली नाही अन् पारावरच्या गप्पा आवरत्या घेत गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक अन् गावातली मानाची मंडळी संतू अण्णा तलाठी यांना घेऊन तलाठी कार्यालयाकडे निघाली.

तलाठी कार्यालयात संतू अण्णा तलाठी अन् बाकी मंडळी पोहोचली तोवर सर्व व्यवस्थित आवरसावर करून जगण्या अन् रामा कुंडुर या सगळ्या मंडळींची वाट बघत होती. गावाला नवीन तलाठी भेटला म्हणून सारा गाव संतू अण्णा तलाठी यांच्यावर खुश होता. त्यांच्या आडून गावच्या जुन्या तलाठीच्या नावाने बोटे मोडत, त्याला शिव्यांची लाखोली वाहत होते.

जितका गाव चांगला तितकाच वाईट होता. कारण गावात एकी होती अन् सरकारी कामात कुणी सरकारी अधिकारी दखलंदाजी करत असेल तर गावचे मान्यवर मंडळी त्याच्या विरोधात अर्ज देऊन त्याची बदली करून घेत असत. त्यामुळे वाभळेवाडीच्या विकासाला वाव नव्हता, गावचे संबंधित अधिकारी गावचा विकास कसा होईल हा विचार करून त्या दिशेनं प्रयत्न करत असायचे.

असो, तर गावातली मान्यवर मंडळी अन् काही सरकारी अधिकारी तलाठी कार्यालयात आली अन् नवीन शिकाऊ तलाठी म्हणून रुजू झालेल्या संतू अण्णा तलाठी यांचा सत्कार गावच्या परंपरेनुसार गावातले नुकतेच महिनाभरापूर्वी देशाची सेवा करून निवृत्त झालेले सुभेदार. कौशल धोंडू आगळे यांच्या हस्ते संतू अण्णा तलाठी यांचा शाल श्रीफळ देऊन, हार घालून सत्कार करण्यात आला. त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देत असताना सुभेदार. कौशल धोंडू आगळे यांनी सीमेवरच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.

व पुन्हा एकदा आपला गाव देशसेवेसाठी किती महत्त्वपूर्ण योगदान देत आहे याची जाणीव संतू अण्णा तलाठी यांना करून दिली. नंतर संतू अण्णा तलाठी यांनी केलेल्या भाषणात त्यांचा गरिबीतून सुरू झालेला प्रवास ते शून्यातून विश्व निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास संतू अण्णा तलाठी यांनी सांगितला. गावच्या प्रथेप्रमाणे गावच्या सरपंचानी गावच्या जनतेमार्फत शेवटचं भाषण केलं अन् संतू अण्णा तलाठी यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देत, आपले भाषण आवरते घेतले. सगळ्यांनी संतू अण्णा तलाठी यांना शुभेच्छा देत तलाठी कार्यालयातून काढता पाय घेतला आणि हळूहळू सगळे निघून गेले.

जगण्या अन् रामा कुंडूर मात्र अजून संतू अण्णा तलाठी यांच्या हाफीसात बसून होते अन् संतू अण्णा तलाठी यांना मिळणारा मान बघून ते हरखून गेले होते. संतू अण्णा तलाठी आपल्या कामात व्यस्त झाले तेव्हा रामा कुंडूर अन् जगण्या एकमेकांशी तंबाखूचा विडा हाताने मळीत संतू अण्णा तलाठी यांच्याबद्दल बोलत होते.

जगण्या राम्याला बोलू लागला, “काय भाऊ मज्जा असं संतू अण्णांना, काय सत्कार होई राहना काय भाषणं होई राहना अन् आपण देखले आपल्याला गावमा कुत्रा भी विचारस ना.”

हे ऐकून रामा बोलता झाला, “जगण्या अण्णा ऊ सरकारी जावईसत उन्हा चलती असत. अन् संतू अण्णा तलाठीबी आपणासारखा गरीब असत पण शिकीसवरी गया, रातना दीन करी लिया, अभ्यास किया अन् उन्हं कष्टाला फळ मिळस अन् ऊ हुई गया थ संतू अण्णा तलाठी.”

भिल्ल बोलीतील हा जगण्या अन् रामा यांच्यातील संवाद संतू अण्णा तलाठी यांना गमतीशीर वाटला अन् त्यांना हे सगळं बोलणंही कळून चुकलं होतं. कारण त्यांचं बालपण अन् आजही त्यांचे अनेक मित्र या बोलीमध्ये बोलत असल्यानं त्यांना या बोलीभाषेचं जग ओळखीचं होतं.

रामा अन् जगण्या संतू अण्णा तलाठी बसलेल्या खुर्चीसमोर ठेवलेल्या बाकड्यावर बसून उद्या काय करायचं, आज काय करायचं आजचा पहिला दिवस असल्यानं गावात चालू असलेल्या विकास कामांना भेट देण्याचं संतू अण्णा तलाठी रामा अन् जगण्याला बोलले.

गावच्या शिवना मायच्या थडीला चालू असलेलं केटीचं काम बघायचं म्हणून संतू अण्णा तलाठी दोघांना घेऊन गेले. काम कितपत दर्जेदार अन् व्यवस्थित चालू आहे यांची पाहणी करून संतू अण्णा तलाठी यांनी गावातल्या सभोवताली असलेल्या शेत शिवाराला भेट दिली. पाऊसाची कृपा असल्यानं यंदा गावात नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ होती. गावात मोठ्या प्रमाणात हंगामी पिके घेण्यापेक्षा भाजीपाला करण्याकडे गावाचा कल दिसत होता अन् या कारणामुळे गावचा विकास होत होता. सभोवतालच्या पंचकृषीत गावाला मान होता.

हे सगळं बघत असतांना पार सायंकाळकडे कसा वळला कळलं नाही अन् संतू अण्णा तलाठी रामा अन् जगण्याला घेऊन हाफीसात आले. हाफीसात रोजच्या नोंदी करून त्यांनी हाफीस बंद केलं अन् संतू अण्णा तलाठी आपल्या खोलीकडे निघाले. रामा अन् जगण्यासुद्धा संतू अण्णा यांना निरोप देऊन आपापल्या घरी निघाले.

संतू अण्णा तलाठी रूमवर आले हातपाय धुवून ते चहा घेत आजच्या कामाचा आढावा घेत होते. एकूण नोकरीचा पहिला दिवस खूप छान अन् सदैव आठवणीत राहील असा होता. नव्या गावचं नवंपण, ख्यालीखुशाली घरच्यांना कळवावी म्हणून संतू अण्णा बाकावर बसून पत्र लिहू लागले.

पत्र लिहत असतांना त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला अन् आता कसं सर्व आलबेल आहे नव्यानं नियुक्ती झालेल्या गावात संतू अण्णा तलाठी यांना कसा मान मिळत आहे, हे सगळं संतू अण्णा तलाठी पत्रात लिहत होते.

खऱ्या अर्थाने आज संतू अण्णा तलाठी यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं होतं, खऱ्या अर्थाने आज त्यांचा दुसरा जन्मच झाला होता. पत्र लिहून झाले त्याला एकवार वाचून संतू अण्णा तलाठी यांनी लिफाफ्यात पॅक केले अन् संतू अण्णा तलाठी पलंगावर पडून उद्याच्या सुखी आयुष्याबद्दल, गावच्या विकासाबद्दल विचार करू लागले होते.

समाप्त.

- भारत लक्ष्मण सोनवणे.