व्यवसाय आणि पेशा हे एकाच गटात बसणारे शब्द असले तरी त्या शब्दांच्या अर्थात, शब्दांच्या जाणीवेत बराच फरक आहे. पेशा आणि व्यवसाय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं मला वाटत नाही. किंबहुना, ही दोन वेगळी नाणी आहेत. त्या दोन्ही नाण्यांचे हेतू वेगवेगळे आहेत. समाजावर, जुन्या-नव्या पिढीवर त्याचा होणारा परिणाम अप्रत्यक्ष असला तरी अगदीच दुर्लक्षित करण्यासारखा असं म्हणता येणार नाही.
आता तुम्ही म्हणाल, हा विचार नेमका कुठून आला. त्याचं कारणही तसंच आहे. एखादा नवीन व्यवसाय सुरू करावा, असं मनात आलं. मनात प्रस्ताव नि ठराव यांच्यातलं अंतर चाचपण्याचं कार्य सुरू झालं. अर्थात तो विचार पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असणा-या नवीन वर्षाच्या संकल्पासारखा किंवा आश्वासनांसारखा तसाच राहिला; पण या विचाराने छान कल्पना दिल्या, नवनव्या गोष्टींची माहिती करुन दिली. खरंच माणसाच्या मनातले विचारसुध्दा किती बोलके असतात. एखाद्या रिकाम्या दिवशी त्यांच्याशी गप्पा मारल्या म्हणजे त्या गप्पातूनच खूप काही शिकायला मिळतं.
थोडीशी माहिती घ्यावी म्हणून पुण्यातल्या पेठांमधे सुरुवातीला फिरलो. पुणं बदलल्याची जाणीव झाली. अर्थात, ती दर दोन-चार दिवसांनी होतच असते; पण इथे विषय वेगळा होता. पूर्वी छानसे टुमदार वाडे होते, चाळी होत्या. पैशाची गरिबी असली तरी एकमेकांच्याविषयी आपुलकी होती. या वाड्यात पुढील भागातल्या खोल्यात दोन-चार दुकानं असायची. कुणी कपड्यांना रफू करुन द्यायचं, गोळ्या बिस्किटांचं दुकान असे, किराणा दुकान असे आणि हमखास असे ते म्हणजे अमृततुल्य! दिवसभर त्या शेगडीसमोर अमृत (चहा) तयार करणारा माणूस बसलेला असे आणि चार-दोन टेबलं असत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या गप्पा ते टेबल ऐकायचं. रफू करुन देणा-याकडे दहा मिनिटे टेकण्याइतपत सोफावजा खुर्ची असायची. अजूनही काही वाडे आहेत आणि तिथे ही आलिशान दुकाने सुध्दा! या दुकानांना मी पेशा म्हणतो. टोकन, ब्रँड आणि कागदी ग्लासमधून चहा विकणारे आता खूप आहेत. त्याला मी व्यवसाय म्हणतो. या दोघांच्या कार्यात तफावत नसली, तरी जाणवेल इतपत फरक निश्चितच आहे आणि तो म्हणजे पेशा व व्यवसाय...
पेशाचा हेतू मुळातच ग्राहकांचं समाधान करणं हा असतो. तिथे नफ्याचा विचार नसतो असं नाही; पण दुकानात येणारा माणूस हा नाराज होऊन परत जाता कामा नये हा पेशाचा हेतू असतो. व्यवसायाचा हेतू मुळातच नफा कमावणे हा असतो. इंजिनिअरिंग केलेला एखादी वस्तू दुरुस्त करेल तो अभ्यासावर आणि त्याची किंमत ठरवेल ती बुध्दीवर. एखादा अशिक्षित माणूस तीच वस्तू अनुभवाच्या जोरावर दुरुस्त करेल आणि पैसे घेईल ते मेहनतीचे... हा पेशातला आणि व्यवसायातला फरक...
एखादा लेखक आणि मालिका लेखक असाही एक फरक सांगता येईल. लेखक आपल्या मनातलं लिहितो आणि पुस्तक छापतं त्या विक्रीतून मिळेल ते उत्पन्न स्वीकारतो. कारण, पैसे कमावणे यापेक्षा सुद्धा लिहितं राहणे, असा त्याचा हेतू असतो. त्यामुळे तो काम स्वीकारतो ते लिहितं राहण्यासाठी... इथे पेशा म्हणता येईल. मालिका लेखकाला आपल्या मनासारखं लिहिता येईलच असं नाही. दिग्दर्शक किंवा निर्माता सांगेल तसे बदल त्याला करावे लागतात. कारण त्याचे ठरलेले विशिष्ट असे पैसे असतात. या क्षेत्रात सुरू असलेल्या स्पर्धेत टिकून राहणं त्याला क्रमप्राप्त असतं. तिथे व्यवसाय असतो.
थोडक्यात, व्यवसाय म्हटलं म्हणजे नियम आणि अटी या त्याला जोडलेल्या असतात. पेशाचा पाया अनुभव हा असतो. तिथे नियम आणि अटी नसतात असं नव्हे; पण तिथे अपवादही असतात. व्यवसाय म्हणजे संवाद आणि पेशा म्हणजे मौन! संवादात व्यक्त होणं आहे तर, मौनात जाणून घेणं. कुणाचा स्वभाव व्यक्त होण्याचा असतो तर कुणीतरी जाणून घेतं. व्यक्त होणं चूक किंवा जाणून घेणं बरोबर असं ठामपणे मत मांडताच येणार नाही. म्हणजेच, व्यवसाय किंवा पेशा हा अर्थातच प्रत्येकाचा स्वतंत्र प्रश्न आहे; पण तितकाच तो प्रश्न विचार करायला लावणाराही निश्चितच आहे. त्यामुळे, करिअर निवडताना काय, आयुष्यात उत्पन्न कमी-जास्त आहे म्हणून काय किंवा अगदी केव्हाही याचा विचार मात्र जरुर करावा...
यात इंजिनियर, चहाचे नवे ब्रँड किंवा कुणाचाही अवमान मला करण्याचा माझा हेतू नाही. कारण, ते इमाने-इतबारे व्यवसाय करत आहेत. आज इतकं क्षेत्र त्यांना मिळतंय याचा अर्थ त्यात जरुर काहीतरी छान असेल; पण मनातला पेशाचा कोपरा थोडासा हळवा झालाय... नव्या विचारांनी त्याला सावरलं... म्हणूनच मनातल्या व्यवसायाच्या विचाराला मला सांगावंसं वाटतं, मी तुझा हात नक्की धरीन; पण तूही पेशाचा हात सोडू नकोस... इतकंच!
- गौरव भिडे