फूड ब्लॉगिंग – ब्रॅण्डींगचा नवा मार्ग

युवा विवेक    30-Jun-2023   
Total Views |

फूड ब्लॉगिंग – ब्रॅण्डींगचा नवा मार्ग

देशा-परदेशात एखाद्या ठिकाणी गेल्यावर काय खायचं यासाठी पूर्वी अनुभवींकडे चौकशी करावी लागे. म्हणजे कुठे कोणता वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ मिळतो, कोणते हॉटेल परवडण्याजोगे आहे, त्या भागाची खाद्यसंस्कृती कशी आहे, स्वच्छ उपाहारगृह कोणते आहे, तेथील कोणता रोडसाईड पदार्थ सुप्रसिद्ध आहे या सगळ्याची माहिती आता एका क्लिकवर मिळते. गुगल करा, माहिती मिळवा. काही वर्षांपूर्वींपर्यंत गुगलवर मोजकी व नेमकी माहिती असायची. मात्र गेल्या काही वर्षांत फूड ब्लॉगर्स आणि व्लॉगर्समुळे विविधांगी माहिती आपल्याला उपलब्ध होते. फूड ब्लॉगिंग ही केवळ आवड राहिली नसून तो आता ब्रॅण्डींग आणि अर्थार्जनाचा मार्गही झाला आहे.

मला आठवतं रोजच्या परिचित खाद्यपदार्थांपेक्षा वेगळ्या खाद्यपदार्थांच्या माहितीसाठी लोकांना वृत्तपत्र, मासिकं अशी छापील माध्यमं किंवा खाना खजाना सारखे टीव्ही शोज यावर अवलंबून रहावे लागे. घरोघरी ओगले आजींचं रुचिरा मात्र आवर्जून असायचं. नवशिक्या गृहिणींसाठी तो केवढा मोठा आधार. माझ्या आजीने वापरलं, आईने वापरलं आणि आता मीही वापरते. पण आता काळ बदलला तसे हे पर्यायही बदलत चाललेत. खाना खजाना नावाचा एक फूड शो काही वर्षांपूर्वा एका खासगी वाहिनीवर चालवला जात असे. तो अतिशय प्रसिद्ध झाला होता. कारण पूर्णपणे खाद्यसंस्कृतीला वाहिलेला असा हा पहिलाच टिव्ही शो होता व मास्टरशेफ संजीव कपूर यांना या कार्यक्रमाने अमाप प्रसिद्धीही मिळवून दिली. आजचा जमाना फूड ब्लॉग किंवा व्लॉगचा आहे. गेल्या काही वर्षांत फूड ब्लॉगर्स, व्लॉगर्स यांच्या माध्यमातूनही पाकसंस्कृती जपली जात आहे व लोकांपर्यंत पोहोचत आहे. फूड ब्लॉगिंग-व्लॉगिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत.

१. पाककृती २. खाद्यपदार्थ वा रेस्टॉरंटचा परिचय ३. फूड ट्रॅव्हलिंग आणि ४. फूड फोटोग्राफी.

मुळात फूड ब्लॉगिंग म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. ज्याप्रमाणे आपण विविध विचार, मतं ब्लॉगच्या माध्यमातून मांडत असतो. अगदी तसंच विविध पाककृती, त्याचा इतिहास, रंजक माहिती, आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्तता, त्यासाठी आवश्यक असे आकर्षक फोटोज, काही हेल्थ टीप्स यांचा समावेश या ब्लॉगमध्ये केला जातो. गेल्या काही वर्षांत घरगुती आणि आरोग्यपूर्ण आहाराचं आकर्षण लोकांमध्ये वाढत आहे. त्यादृष्टीनेही कंटेंटची निर्मिती ब्लॉगच्या माध्यमातून केली जाते. हा ब्लॉग एकच व्यक्ती किंवा चमू असाही चालवता येतो. अनेकदा शेफ्स स्वतः आपला ब्लॉग चालवतात तर काही वेळा इनफ्लुएन्सर्सना ते हँडल करायला सांगितलं जातं. आपल्यापैकी कित्येक जण हे ब्लॉग वाचून किंवा रेसिपीजचा आधार घेत वेगवेगळ्या पाककृती करत असतात. रणवीर ब्रार हे नाव तर तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अनेक तरूण रणवीर ब्रारच्या रेसिपीज करून पाहताना दिसतात. मास्टरशेफ पंकज भदोरिया, अमृता रायचंद, निशा मधुलिका, कबिताज किचन, कुकिंग शुकिंग मराठीत मधुराज रेसिपीजच्या मधुरा बाचल असे अनेक सेलिब्रिटी शेफ आणि त्यांचे चॅनल्स आपल्या रेसिपीजच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत. यांच्यापैकी अनेकजण फेसबुक, युट्यूब, इनस्टाग्रामच्या माध्यमातून आपला कंटेंट शेअर करत असतात. लिखित रेसिपीसह, आकर्षक फोटोज, रील्स, व्हिडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांना वाचकांना मदत करत असतात. अर्चना हेब्बर हे नावही रेसिपी शोमध्ये महत्त्वाचे आहे. अत्यंत सुटसुटीत अशा शाकाहारी रेसिपीज हे हेब्बर्स किचनचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे चॅनल शाकाहारींचे अत्यंत आवडीचं आहे.

केवळ रेसिपी शोजच नव्हे तर फूड व्लॉगर्सच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या खाद्यपदार्थांची, खाद्यसंस्कृतीची माहितीदेखील आपल्यापर्यंत येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला कॅमेऱ्याचा फोन किंवा चांगला कॅमेरा आणि उत्तम संवाद साधण्याची कला या माफक भांडवलावर तुम्ही फूडव्लॉगर म्हणून करिअर करू शकता. फूड रेंजर, इंडियन फूड फ्रीक, दिल्ली फूड वॉक्स, दिलसे फूडी असे काही सुप्रसिद्ध ट्रॅव्हल फूड व्लॉगर्स आहेत. केवळ हौस म्हणून हे केलं जातं असं अजिबात नाही. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना हे काम करण्यासाठी म्हणजेच त्या हॉटेल किंवा खाद्यसेवा व्यावसायिकाचा नफा व्हावा, म्हणून त्याच्याकडील खाद्यपदार्थांची जाहिरात करण्याचे पैसेही मिळतात. इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावरील ऑडियन्सला या हॉटेलची माहिती देतो व त्याची प्रसिद्धी करतो. या प्रसिद्धीचा फायदा व्यावसायिकाला मिळतो. आज अनेक सेलिब्रिटीदेखील फॉड व्लॉग करून उत्पादनाची/हॉटेलची जाहिरात करतात. दुसरीकडे युट्यूबही तुमच्या फॉलोअर्स/सबस्क्रायबर्सच्या संख्येनुसार तुम्हाला जाहिराती देतं. त्यामुळे आज अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स फूड ब्लॉगिंग-व्लॉगिंग करताना दिसतात.

या फूड व्लॉगिंगमुळे अनेक नवे जुने पदार्थ, काळाच्या ओघात मागे पडलेल्या पाककृती पुन्हा लोकांना परिचित होत आहेत. खाद्यपदार्थांप्रमाणेच स्थानिक खाद्यसंस्कृती, पारंपरिक-आधुनिक पद्धतीची भांडी, सादरीकरणाचे निरनिराळे प्रकार या साऱ्यांचाही परिचय प्रेक्षकांना होतो. यात फूड फोटोग्राफीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश, चांगला कॅमेरा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तम सौंदर्यदृष्टी याचीही आवश्यकता असते. उत्तम दर्जाचे व्हिज्युअल्स किंवा छायाचित्रे प्रेक्षकाला चटकन स्वतःकडे आकर्षित करतात. पीआर एजन्सीच्या माध्यमातून, फ्रीलान्सर्सच्या माध्यमातूनही काही वेळेस फूड ब्लॉगिंग आणि फूड व्लॉगिंगच्या माध्यमातून प्रसिद्धीस मदत केली जाते. त्याचाही ग्राहकाला निश्चितच फायदा होतो.

तुम्हाला चांगलं लिहिता येत असेल किंवा उत्तम फोटोग्राफी करता येत असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फूडी असाल तर करिअरसाठी फूड ब्लॉगिंग/व्लॉगिंगच्या पर्यायाचा विचार करायला काहीच हरकत नाही.

मृदुला राजवाडे