कबीरांच्या प्रकाशात...

युवा विवेक    08-Jun-2023
Total Views |


कबीरांच्या प्रकाशात...

माणूस चालत असतो कितीतरी वाटा, विस्तिर्ण, रुंद, खुल्या, बंदिस्त, जाणिवेत, नेणिवेत, शोधात तो चालतो मात्र खरा; पण त्याला बहुतेक वेळा ठाऊक नसतो त्याचा मार्ग. नेमकं कुठे जायचं आणि नेमकं काय शोधायचं, काही माहीत नसतं त्याला. फक्त हातात असतं ते चालणं. आपल्यापरिने चालत राहतो माणूस, कधी शोधू पाहतो नव्या वाटा, मिळवू पाहतो काही तर कधी वाटा जातील तिथे पावलं टाकत राहतो. नुसता आपला चालत राहतो तो. त्याला कितीतरी वेळा भान राहत नाही चांगल्या-वाईटाचं, कितीतरीदा ठेच लागते, तो पडतो तसा स्वत:ला सावरतोही. कधी सावरू पाहतो आपल्या सारख्या इतरांना तर कधी स्वत:च अडकतो अदृश्य गुंत्यांमधे, अडकण्याचं दु:ख होतं तसं सुटण्याचं सुखही होतं. मात्र समाधान लांबच जात जातं. अंधाऱ्या वाटेवर दिसावा एखादा दिवा आणि त्याने फक्त वाटच नाही तर ध्येयही स्पष्ट दिसावं असं होतं कधीतरी, काहींसाठी. जे असतात भाग्यवान आणि तो दिवा असतो तो संतांचा. त्या दिव्याचं अस्तित्व कळायला मात्र भाग्यच लागतं असं म्हणता येईल....

संत कबीर म्हणजे असाच एक दिव्य, सतेज दिवा... ते दाखवत राहतात आपल्या प्रत्येकाला मार्ग त्यामुळे पाऊल टाकण्याची आशा आणि त्याची दिशा नक्कीच बदलत जाते. कबीरांचे दोहे हे शिंपल्यासारखे असतात. ते वाचताना सहज शिंपल्यातून मोती बाहेर यावा तसा शब्दांतून अर्थ तेजाळत जातो आणि अर्थात मिळत जातात आपल्याला नव्या वाटा. म्हंटलं तर चालल्या असतील त्या वाटा कित्येकांनी; पण तरी नव्या वाटाव्या अशाच असतील. त्या कारण त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नसलेले कितीतरी असतीलच की... या प्रकाशात वाटा दिसतात. मात्र फक्त त्यात रमून जाऊ नये, निदान प्रयत्न करावा त्या चालण्याचा. कारण त्या जातात दूरवर, नजरेच्या खरंतर सगळ्याच सीमांच्या पलीकडे जाणाऱ्या असाव्यात त्या वाटा. ह्या वाटांवर दिशा देणारं, चालण्याचं बळ देणारं सुतेज म्हणजे कबीरांचे दोहे, त्यांचा एक दोहा -

जो टोकू कांटा बुवे, ताहि बोय तू फूल ।

तोकू फूल के फूल है, बाकू है त्रिशूल ॥

कबीरजी आपल्या प्रत्येकाला सांगतात की, तू तुझ्या वाटेत काटे पेरणाऱ्याच्या वाटेत फुलं पेर, तुला भरपूर फुलं मिळतील आणि ज्याने काटे पेरले त्याला त्रिशूलासम दाह देणारे काटें मिळतील. तू चांगलं कर्म करत राहा. एवढं लक्षात ठेवलं तरी चालणं किती सोपं होतं, मिळतो एक आधार आणि वाट चालायला एक बळ, मार्ग सोपा होतो, पुढे नवी ध्येय शोधायची असतात, गाठायची असतात, चालायचं असतं ते पुढच्या नव्या शोधांसाठी, त्यांच्या कृपेच्या छ्त्राखाली....

दान दिए धन ना घटे, नदी न घटे नीर ।

अपनी आँखों देख लो, यों क्या कहे कबीर ॥

कबीरजी म्हणतात की, ज्याप्रमाणे नदीचं पाणी पिऊनही ते पाणी कमी होत नाही. त्याप्रमाणे दान दिल्याने धन कमी होत नाही. इथे कबीरजींची उदाहरण देऊन सांगण्याची ही पद्धत आपल्याला त्यातला उपदेश पटवून देते. किंबहुना तो आचरणात आणण्यासाठी सुयोग्य मार्ग देते.

तीरथ गए थे एक फल, संत मिले फल चार ।

सतगुरु मिले अनेक फल, कहें कबीर विचार ॥

कबीरजी म्हणतात की, कोणत्या तीर्थ स्थानी गेलं तर एक फळ मिळतं. संत महात्म्यांकडून चार फळं मिळतात. मात्र सद्गुरू मिळाले तर सगळे पदार्थ मिळतात. कशाचीही चिंता उरत नाही. इथे फळांच्या गणनेने सद्गुरू प्राप्तीचं महत्त्व ठळकपणे आपल्यासमोर येतं आणि किती सहजतेने सद्गुरूचं महत्त्व कळतं.....

कामी, क्रोधी, लालची इनसे भक्ति न होय ।

भक्ति करे कोई सूरमा, जाति, वरन, कुल खोय ॥

कबीरजी म्हणतात, कामी, क्रोधी, लोभी यांच्याकडून भक्ती होऊ शकत नाही. भक्ती कोणी शूरच करु शकतो. ज्याने जात, वर्ण आणि कुळाचा त्याग केला आहे. इथे भक्तीचं थोरपण आपल्याला कबीरजी दाखवतात.

सब धरती कागज करूँ, लेखनी सब वनराय ।

सात समुद्र की मसि करूँ, गुरुगुन लिखा न जाय ।।

कबीरजी सांगतात, सगळ्या पृथ्वीचा कागद केला, जंगलातल्या झाडांची लेखणी केली आणि सातही समुद्रांची शाई केली तरीही सद्गुरुचे गुण लिहिले जाऊ शकत नाहीत. सद्गुरूगुणांची व्यापकता किती कमी शब्दांत कबीरजी आपल्याला दाखवून देतात...

कबीरजी किती कमी शब्दांत आपल्याला खूप काही सांगत राहतात, नव्या वाटा दाखवतात त्यांच्या प्रकाशाच्या, दोह्यांच्या माध्यमातून मात्र आपल्या हातात असतं त्यांना समजून घेणं! वाट दिसण्यापेक्षा वाट चालणं कदाचित जास्त अवघड असतं...

- अनिश जोशी