यानंतर या पत्राच्या विश्वातला महत्त्वाचा घटक म्हणजे पोस्ट. तिथेच या पत्राचा प्रवास सुरू होतो. मला गमतीने असं वाटत आलंय, आपण एखाद्याला सोडायला स्टेशनवर जातो किंवा फारतर गाडीत बसवून देतो. पुढे त्याचा तो प्रवास करुन इच्छित स्थळी पोचतो. पत्राचंही तसंच नाही का! आपण पत्र लिहितो त्यावर तिकीट चिकटवतो आणि पत्रपेटीत ते पत्र टाकून निघून जातो: पण पत्राचा प्रवास आपल्या लेखी संपलेला नसतो. काही पत्रं संवेदनशील असतात. त्यात भावना गुंतलेल्या असतात. त्यामुळे, ते पत्र पोस्टाने वेळेवर बघून लवकरात लवकर इच्छित स्थळी पोचवावं असं आपल्याला वाटत असतं. पण काही खात्री देता येत नाही. पत्राची दखल घेतली जाईल का नाही? याची सुद्धा काहीवेळा खात्री नसते. अर्थात वर्षानुवर्षे चालत आलेल्या कारभाराबद्दल आपण काय बोलणार म्हणा!
पण एक मात्र खरं, आपल्या एकाही पत्रातल्या मजकूराशी पोस्टाला काहीही देणं-घेणं नसतं. जवळचा काय नि लांबचा काय, पोस्ट त्याच्याशी कुठलाही संबंध जोडत नाही. नातं जोडत नाही. यामुळेच पत्र सुरक्षित राहील की नाही याची खात्री देता येत नसली तरी त्यावरचा मजकूर हमखास सुरक्षित असतो. म्हणूनच या सोशल मीडियाच्या जगात मला पत्राचा आधार घ्यावासा वाटतो कधीकधी! सोशल मीडिया नावाच्या प्रांतात हळूच चोरुन मोबाईल बघणा-यांपासून पासवर्ड हॅक करणा-यांपर्यंत कितीतरी धोके असतात. आपण लिहिलेला मजकूर अगदी सहज प्रसिद्ध होऊ शकतो. अक्षर अन् अक्षर चोरीला जातं! पत्राचं तसं नसतं. मी पोस्टमनला दिवाळी देतो ते केवळ या मजकूर न वाचण्याच्या कामाबद्दलच!
यानंतर पत्राचा इच्छित स्थळी पोचण्याचा प्रवास सुरू होतो. रजिस्टर्ड एडीनी वगैरे पाठवलेल्या पत्राची आपल्याला पोचपावती मिळते. काहीवेळा तीही वेळेवर मिळत नाही. आपल्याला पोस्टात जाऊन ती पावती घ्यावी लागते! हे झालं औपचारिक किंवा कार्यालयीन कामकाजाच्या पत्रांचं. पण प्रत्येकच पत्रं काही रजिस्टर्ड एडी किंवा पोचपावती मिळण्याची सुविधा वापरुन पाठवता येत नाही. ती अनौपचारिकही असतात. त्यातला मजकूर इच्छित व्यक्तीपर्यंत पोहोचणं तितकंच महत्त्वाचं असतं. ते पत्रं त्याच्यापर्यंत पोहोचलं असेल का? त्यावर तो कसा व्यक्त झाला असेल? ते पत्रं त्यानी जपून ठेवलं असेल का? असे कितीतरी प्रश्न आपल्याला पडतात; पण यातला पहिला प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. त्याखेरीज पुढच्या प्रश्नांचा जन्मच होत नाही. ते पत्रं जर पोचलंच नसेल तर? अशा न पोचलेल्या पत्रांचं पुढे काय होत असेल...
मला वाटतं, न पोचलेली पत्रं तशीच पोस्टात पडून असतील. त्यांना लवकर स्टेशन गाठायचं असतं. पण त्या बिचा-यांना पाय कुठे असतात! एका पेटीतून दुस-या पेटीत नेणारा कुणीतरी असतोच. त्या नेणा-यानी नेलंच नाही तर ती पत्रं पोहोचणार तरी कशी... ती तशीच एखाद्या कप्प्यात, कुठल्याशा जुन्या गठ्ठ्यात वाट बघत बसलेली असतात. मला वाटतं अशी न पोचलेली दोन-तीन पत्रं एकाच गठ्ठ्यात असली की ती पोस्ट संध्याकाळी बंद झालं म्हणजे एकमेकांशी गप्पा मारत असतात. एकमेकांना आपली कथा किंवा व्यथा सांगतात. एखाद्या पत्रात रडगाणं असतं, एखाद्या पत्रात आपल्या प्रियकरासाठी प्रेयसीने केलेली सुंदर अक्षरातली गुलाबी कविता असते. ह्या न पोचलेल्या कवितेच्या कथेची आता व्यथा झालेली असते. त्या रडगाण्याला ती कविता आपली व्यथा ऐकवत असते. शेवटी ते ऐकणारं रडगाणंच ते! त्या व्यथेवर आपल्या सूरातच ते प्रतिक्रिया देतं. ह्या न पोचलेल्या पत्रांचा संवाद मला एकदा ऐकायचा आहे.
न पोचलेली पत्रं कधी कधी जीर्ण होतात. पण त्या पत्राची भावना जीर्ण होत असेल, असं मला वाटत नाही. ती तितकीच जीवंत असते. त्यातली उत्कंठा, आवेग न दिसणा-या श्वासासारखा अविरत असतो. हे पत्र ज्या हातानी, ज्या ह्रदयानी लिहिलंय त्याची होणारी घालमेल या न पोचलेल्या पत्रांना बोचत असते किंवा बोचत असावी... आता पत्र येईल, मग येईल म्हणत वाट पाहत असलेल्या जीवाची अवस्थाही ते पत्र जाणत असतं. अशा पत्रांना खरंच पाय किंवा पंख फुटायला हवेत. या पत्रांचे दोरी बांधून ठेवलेले गठ्ठेच्या गठ्ठे असतील. त्यावर जळमट आणि धुळीचं अगदी साम्राज्य असेलही. पण पत्र पोचवणा-यांनी एकदा याकडे बघावं. जळमट आणि धुळीचा थर हळूच बाजूला सारला तर नुकत्याच उमललेल्या पारिजातकासारखा त्याचा गंध येईल, सौंदर्य जाणवेल! तो गंध श्वासात भरुन घेतला आणि सौंदर्य खास दृष्टीने टिपलं तर एखादं तरी न पोचलेलं पत्र 'त्वरित पोचविणे' या गठ्ठ्यात नक्की जाईल... अर्थात तशी आशा तरी आपण बाळगायला हवी...
आता काही कामानिमित्त पोस्टात जाणं झालं की, या पत्रांचा मौनातला आवाज जरुर ऐका. त्यांना जाणून घेण्याचं तंत्र तुम्हाला अवगत झालं तर मला नक्की शिकवा. कारण, या न पोचलेल्या पत्रांचा गठ्ठा मला, तुम्हाला, आपल्या सा-यांनाच सारखा बोलावतोय...
- गौरव भिडे