कुछ खास है ‘चॉकलेट’ में!

युवा लेख

युवा विवेक    07-Jul-2023   
Total Views |

कुछ खास है ‘चॉकलेट’ में!

जगात दोन प्रकारची माणसं आढळतात, चॉकलेट आवडणारी आणि न आवडणारी. ‘काय खाता रे ते कडू आणि मिट्ट गोड? दुसरी जमात असते ती चॉकलेटचा च उच्चारला तरी डोळे चमकणारी. अस्सल मासेखाऊ माणसाला जसं माशातला म उच्चारला की डोळे स्वाभाविकपणे चमकतात आणि तोंडाला पाणी सुटतं, तसंच काहीसं चॉकलेटप्रेमींचं आहे. आज ७ जुलै, म्हणजेच ‘जागतिक चॉकलेट दिन’. या निमित्ताने जाणून घेऊ या या चॉकलेटचा इतिहास आणि काही रंजक माहिती.

डेरीमिल्क, फाईव्हस्टार, अमूल, फरेरो रोशर, चॉको पाय ही काही फेवरीट चॉकलेट्स आहेत चॉकलेटप्रेमींची. यापुढे होममेड, पारंपरिक पद्धतीने केलेली चॉकलेट्स हा ही अनेकांच्या आवडीचा विषय. चॉकलेटच्या वड्यांपलीकडे जाऊन चॉकलेट फ्लेवरचे निरनिराळे पदार्थही अनेकांना आवडतात. केक, पेस्ट्रीज, आईस्क्रीम हे तर आहेतच. यात चॉकलेट पान, चॉकलेट डोसा, चॉकलेट सँडविच याचीही गेल्या काहीवर्षांत भर पडली आहे. या सगळ्याच पदार्थांना खवैये आवर्जून दाद देत असतात, त्यांची मागणी करत असतात. आपल्याकडे तर बालपणीच्या सुखाची कल्पनाच मुळी ‘अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला’ अशी केली आहे.

पण आहे तरी काय हे चॉकलेट? याची निर्मिती तरी कशी झाली? चॉकलेटचा इतिहास मोठा रंजक आहे. साधारण २००० वर्षांपूर्वी कोकोच्या वनस्पतीचा शोध अमेरिकेच्या रेनफॉरेस्टमध्ये लागला असं म्हटलं जातं. कोकोच्या फळांपासून, किंबहुना त्या फळातील बी पासून चॉकलेटची निर्मिती केली जाते. मॅक्सिको आणि मध्य अमेरिकेत चॉकलेटची सर्वप्रथम निर्मिती केली गेली. १५२८मध्ये स्पेनने मॅक्सिकोवर ताबा मिळवला आणि या काळात स्पेनचा राजा आपल्यासोबत चॉकलेट तयार करण्याचे यंत्र आणि भरपूर कोकोबिया सोबत घेऊन गेला. काही काळातच चॉकलेट हे स्पॅनिश लोकांचं आवडतं पेय झालं. पूर्वी चॉकलेट वड्यांच्या रुपात खाल्लं जात नसे तर ते द्रव स्वरुपात म्हणजेच पेयरुपात सेवन केलं जात असे. १८२८मध्ये डच केमिस्ट कॉनराड जोहान्स वान हॉटनने चॉकलेटच्या वड्या तयार करण्याचं यंत्र घडवलं व त्याला नाव दिलं कोको प्रेस. दूध, साखर आणि कोको बियांपासून त्याने पहिल्यांदा घनरुपात म्हणजे वडीच्या रुपात चॉकलेट तयार केलं. पुढे ते लोकप्रिय होतंच गेलं आणि लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होत गेलं. आज अगणित कंपन्या जगभरात चॉकलेटची निर्मिती करत आहेत. केवळ घनरूप चॉकलेट्स नव्हेत. तर चॉकलेट फ्लेवरचे अनेक पदार्थही लोकप्रिय होत आहेत. पंचतारांकित हॉटेलांपासून ते रोडसाईड खाद्यपदार्थांपर्यंत चॉकलेटने स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलंय. चॉकलेटने स्वतःचा स्वतंत्र बाजारपेठ आणि चाहतावर्ग निर्माण केलाय. उगीच नाही भारतात चॉकलेट पराठा, चॉकलेट पान आणि चॉकलेट डोसासारखा पदार्थ लोकप्रिय झाला. लोकांमधील त्याची अफाट लोकप्रियताच याला कारणीभूत आहे.

२००९ साली सर्वप्रथम जागतिक चॉकलेट दिन साजरा करण्यात आला. कारण याच दिवशी चॉकलेट युरोपात आलं म्हणे. (अर्थात या व्यतिरिक्त वेगवेगळ्या भागात वेगवेगळा दिवसही चॉकलेट दिन म्हणून साजरा केला जातोच.) आज चॉकलेट हा केवळ खाद्यपदार्थ राहिलेला नसून त्याला ग्लॅमरही आलं आहे आणि ते सेलिब्रेशनचाही एक भाग झालं आहे. पाश्चात्य जगात चॉकलेट्स हे आनंद व्यक्त करण्याचं माध्यम मानलं जातं. प्रिय व्यक्तीकडे मनातलं मांडण्यासाठी, एखाद्याचं मन दुखावलं असेल तर सॉरी म्हणण्यासाठी, कोणाचं कौतुक करण्यासाठी तर कोणाला अपयश आलं असेल तर त्याला उभारी देण्यासाठी, आठवणींना उजाळा देण्यासाठी चॉकलेट्स देण्याची-खाण्याची पद्धत रूढ झाली आहे. याच चॉकलेटने अनेकांना व्यवसायही मिळवून दिलाय. फक्त नेमकी चव जमली पाहिजे. घरगुती स्तरावरही चॉकलेट अनेकजण तयार करतात व त्यांना मागणीही असते. चॉकलेटची चव वृद्धिंगत करण्यासाठी त्यात मिंट, ऑरेंज, व्हॅनिला असे वेगवेगळे फ्लेवर्सही ऍड केले जातात. त्यांनाही मागणी असते.

वरती म्हटल्याप्रमाणे आज चॉकलेट ही एक स्वतंत्र बजारपेठ आहे. यात करिअर करणारे ही अनेक आहेत. चॉकलेट स्कल्प्चरिंग (शिल्प), चॉकलेट मेकिंग, चॉकलेट टेस्टर, चॉकलेट शेफ आणि चॉकलेट संशोधक किंवा शास्त्रज्ञ अशा वेगवेगळ्या माध्यमात करिअर करता येतं. चॉकलेट हे आपल्या मानसिकतेशीही जोडलेलं असतं असं म्हणतात. चॉकलेटला स्ट्रेस बस्टर म्हणतात. खूप तणावात असताना चॉकलेटचा एक तुकडा आपल्याला थोडं रिलॅक्स करतो. चॉकलेटचा गडद सुवास, साखरेचा गोडपणा आणि जिभेवर घोळणारं क्रिमी टेक्स्टर आपला ताण हलका करतं. अर्थात हेही तितकंच खरं आहे की चॉकलेटमध्ये घातले जाणारे साखर, बटर, फॅट्स हे शरीराला हानिकारकच असतात. त्यामुळे चॉकलेट सेवन एका मर्यादेपलीकडे घातकच असतं. चॉकलेट हे तात्काळ ऊर्जा देत असल्यामुळे या चॉकलेटची व्यसनही लागू शकतं. त्यामुळे ते बेतानेच खायला हवं, हेही तितकंच खरं.

चॉकलेट या पदार्थाने आज स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित केलंय. केवळ लहान मुलंच नव्हे तर सर्वच आबालवृद्धांमध्ये चॉकलेट हा आवडता पदार्थ वा फ्लेव्हर आहे. काय ते खात असता कडूकडू असं कोणी कितीही म्हटलं तर खाणारा ते खात राहील, आनंद घेत राहील. काहीतरी जादू या पदार्थात नक्कीच आहे. लोकांना मोहवणारा, खाण्यासह-भेटवस्तूंमध्ये स्थान मिळवणारा, स्ट्रेस बस्टर असणारा, अनेकांच्या उत्पन्नाचं साधन असणारा हा पदार्थ आहे. जागतिक चॉकलेटदिनाच्या निमित्ताने चला आपणही आज एकेक चॉकलेट खाऊन हा दिवस साजरा करू या.

मृदुला राजवाडे

मुक्त पत्रकार, तत्पूर्वी नऊ वर्षे हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र, ईशान्य वार्ता अशा ठिकाणी वार्ताहर, उपसंपादक, वृत्त समन्वयक, सोशल मिडिया मॅनेजर म्हणून कार्यरत. त्याचबरोबर साप्ताहिक सकाळ, वयम, शिक्षण विवेक, ज्येष्ठपर्व आदी नियतकालिकांसाठी लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिटयूटमध्ये पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमासाठी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत.