मोबाईल चुकीचा आधार होऊ लागलाय...

युवा लेख

युवा विवेक    21-Aug-2023   
Total Views |

मोबाईल चुकीचा आधार होऊ लागलाय...

आपल्यापैकी प्रत्येक जण जगताना कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा, अनुभवाचा, विचाराचा, शिकवणीचा आधार घेऊन जगत असतो. त्यांचा आधार घेत आपले निर्णय घेतो, स्वतःची समजूत घालतो. इतके वर्ष हा आधार अनेकांसाठी एखादी व्यक्तीच असायची पण आज मात्र मुख्यतः तरुण पिढीसाठी त्यांचा आधार म्हणजे त्यांच्या हातातला मोबाईल झाला आहे.

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर, कोणत्याही समस्येचा उपाय म्हणून मोबाईलकडे आपोआप नजर वळते आणि अपेक्षित उत्तर, उपाय आपल्याला मिळून सुद्धा जातात. आपले मत स्पष्ट करण्यासाठी मोबाईलवर शोधलेला एक प्रश्न पुरेसा असतो. आपण एकटे असताना हातात मोबाईल असल्यास निदान कोणाला काही कळवण्यासाठी, संपर्कासाठी तरी मोबाईलचा आधार असतो. पण अजून खोल विचार केल्यास जाणवू लागते ती गोष्ट म्हणजे मोबाईल आता फक्त अडीअडचणीचा आधार नाही तर जगण्याचा आधार होऊ लागला आहे. आज तरुणाईला इतरांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याऐवजी मोबाईल वरूनच रस्ते शोधणे, जेवण मागवणे, शिकणे सोईस्कर वाटू लागले आहे. समोर आपले कुटुंबीय, मित्रमैत्रिणी उभे असतानासुद्धा आज अनेकजण मोबाईलमध्ये गुंग दिसतात. यात मोबाईलद्वारे इतरांशी संवाद फार कमी जणांचा चालू असतो, अनेकदा मोबाईलचा वापर हा समाज माध्यमे किंवा तत्सम ॲप वरती काहीतरी पाहण्यात अथवा वाचण्यासाठीच केला जात असतो. अनेकांसाठी आपण पहात असलेले प्रत्येक दृश्य मनात, डोळ्यात, आठवणीं मध्ये साठवण्या ऐवजी मोबाईल मध्ये कैद करणे जास्त महत्वाचे असते.

आजच्या तरुणाईचा भाग म्हणून मी सुद्धा अनेकदा हेच करत असते आणि मग जाणवून जातं की मोबाईल माझा मानसिक आधार बनून गेलाय. समोर दिसणाऱ्या सत्य चित्रापासून मला दूर पळून जाता यावं यासाठीचा तो माझा आधार बनलाय. समोरच्याला मी काहीतरी फार महत्त्वाचं करते आहे अशा भ्रमात टाकण्यासाठी तो माझा आधार बनलाय. कोणत्याही व्यक्ती अथवा प्रसंगामध्ये मी स्वतःला अडकवून घेऊ नये यासाठी तो माझा आधार बनलाय. एक माणूस म्हणून जगताना मला माझ्या समाजामध्ये समाजाचा भाग म्हणून जगावं लागू नये यासाठी मोबाईल माझा आधार बनलाय. कारण मोबाईल वर मी जे पाहते, वाचते, ऐकते, लिहिते ते सारं अगदी मला हवं तसं असतं आणि नसलंच तर मी त्यात बदल करू शकते. एखादी गोष्ट पहायची नसेल तर बंद करू शकते, एखादी गोष्ट आवडत नसेल तर बदलू शकते.

हे सारं अगदी खोलात जाऊन पाहिलं की लक्षात येतं ते म्हणजे मुळात एक माणूस म्हणून, समाजाचा, कुटुंबाचा भाग म्हणून माझ्या असलेल्या कर्तव्यापासून मला लांब पळून जात यावं यासाठी मी मोबाईलचा जास्त आधार घेऊ लागले आहे. त्याचा वापर जेवढ्यास तेवढा करत होते तेव्हा माणूस म्हणून जगत होते आता कदाचित एक यंत्र वापरणारे दुसरे यंत्र म्हणून जगतेय.

मोबाईलचा चुकीचा आधार नक्कीच कोणाला स्व-खुशीने घ्यायचा नसतो. त्या पाठी अनेक कारणे असतात. काहींची अनेकदा झालेली निराशा असते, काहींची इतरांशी बोलण्याची भीती असते. पण मला असं वाटतं की मुळातच मनुष्य हा समाजप्रिय प्राणी म्हणून वावरत आला आहे. त्यामुळे जगण्यासाठी समाज म्हणजेच आपल्या आजूबाजूची माणसे सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत याची जाणीव आपल्या साऱ्यांना व्हायला हवी. आपल्यातली इतरांशी जमवून घेण्याची सहनशीलता वाढवायला हवी. इतरांप्रति असणारं प्रेम टिकवून ठेवायला हवं त्याशिवाय आपला मोबाईल दृष्टी आड झाल्यास मनाची होणारी घालमेल कमी होणार नाही आणि आपल्या माणूस म्हणून जगण्याला अर्थ येणार नाही.

मैत्रेयी सुंकले