बाईपण भारी देवा!

युवा लेख

युवा विवेक    07-Aug-2023   
Total Views |

बाईपण भारी देवा!

एका स्त्रीचे हक्क, तिची मतं, तिचे विचार यांवर जागतिक स्तरावर चर्चा चालू असताना तिच्या भावनांना, तिच्या गरजांना समजून घेत त्यांवर विचार करण्याची वेळ येते आणि त्याच वेळी एक असा चित्रपट येतो जो गावागावातील स्त्रियांना स्वतःचे हक्क, मत, विचार यांसोबतच भावना आणि गरजांना सुद्धा समजून घेण्यास आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी पाऊले उचलण्यासाठी भाग पाडतो.

स्त्री म्हणून स्वतःसाठी जगण्याचा दिवस फक्त ८ मार्च राहत नाही तर गावागावांतील स्त्रिया काही काळासाठी का होईना पण आठवड्यातील कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी स्वतःसाठी सजून मनमुराद जगू लागतात. या साऱ्याचं श्रेय जातं ते बाईपण भारी देवा या चित्रपटाला!

चित्रपटामध्ये काय आहे? या प्रश्नाचं उत्तर या चित्रपटाने काय केलं या प्रश्नाच्या उत्तरात शोधता येतं. चित्रपट पाहायला गेलेली प्रत्येक स्त्री डोळे भरून आले अगदी, असं म्हणत बाहेर पडते. तिच्या चार मैत्रिणींसोबत छान फोटो काढते. या साऱ्या गोष्टी का शक्य होतात? कारण हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला तिच्या असण्याच्या महत्त्वाची जाणीव करून देतो. तिच्या भावना समजून घेण्यास शिकवतो. न्यूनगंड, संमिश्र भावना, त्यातून उडणारा गोंधळ या साऱ्यांचा प्रत्येक स्त्री कधी ना कधी सामना करत असते. हे सारे होते, कारण त्यांची विचार करण्याची पद्धत! कायम समोरच्याला स्वतःच्या वरचे स्थान देणारी स्त्री इतरांना फार मुठीत धरण्याजोगी वाटते. यात कोणताही स्त्रीवादी दृष्टीकोन नाही तर खेडेगावापासून ते मोठ्या शहरांमधील ही सत्यकथा आहे; पण हीच स्त्री एकदा मनावर घेतल्यास काय काय करू शकते? याची झलक हा चित्रपट दाखवतो. आपल्या शब्दांमधील ताकद काय आहे याची होणारी जाणीव, स्त्रीचे दुसऱ्या स्त्रीसोबत असलेले नाते, त्यांच्यामध्ये उडणारे खटके, त्यांच्यामधील जिव्हाळा, तुटलेली नाती पुन्हा जोडली जाण्याची शक्यता या साऱ्या गोष्टींनी हा चित्रपट वास्तववादी बनतो अन् तरीही प्रत्येकाच्या हृदयाला कधी ना कधी स्पर्श करून जातो.

या चित्रपटाच्या लोकप्रियतेचं आणखी एक कारण सांगायचं तर या चित्रपटाचं शीर्षकगीत. ‘बाईपण भारी देवा’ या शब्दांभोवती फिरणारे हे गीत ऐकताना त्याच्या फास्ट बिट्समुळे खूप खेळीमेळीचे वाटते. त्यामुळे यातील भारी या शब्दाचा अर्थ सुरुवातीपासूनच सुंदर, श्रेष्ठ असा घेतला गेला. मात्र चित्रपट बघताना इंग्रजी भाषेतील त्याचा अनुवादाचा अर्थ मात्र बाईपण कठीण आहे असा दिसून येतो. यातून बाकी काही वाटण्यापेक्षा संगीतकारांचे कौतुक आणि अभिमान वाटतो की, त्यांनी बाईपणाचा, स्त्रीत्वाचा एक महत्त्वाचा पैलू यात दाखवलेला आहे. कारण कोणत्याही दुःखाला स्वीकारून, ते लपवून त्याला आनंदाची किनार स्वतःहून जोडत एक स्त्री जसं आयुष्य जगत राहते तसंच शब्दांमधले दुःख संगीत दिग्दर्शकांनी गाण्याला जलद ठेका देत आनंदाची, उत्साहाची किनार लावून लपवलेले दिसते.

थोडक्यात काय तर, बाईपण नेमकं काय असतं, हे बाईपण भारी देवा या चित्रपटाने खूप सुंदररित्या प्रत्येक पैलूमधून समोरच्या पर्यंत पोहचवलेले दिसते.

ही चित्रपटाची समिक्षा नक्कीच नाही; पण एक स्त्री म्हणून, अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील अनेक घडामोडींची साक्षीदार म्हणून हा चित्रपट पाहिल्यानंतर तो का भावला? हे लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न!

- मैत्रेयी मकरंद सुंकले