लडाख - गुर गुर चहा

युवा लेख

युवा विवेक    01-Sep-2023   
Total Views |

लडाख - गुर गुर चहा

नमस्कार लोकहो!

"चलो यार, लडाख चलते है" असं ऍडव्हेंचर वगैरे आवडणारे मित्रमंडळी म्हणतांना ऐकले असेल. ३ इडियट्स सिनेमात रँचोची शाळा लडाखमध्येच होती. इतकीच आपली लडाखची ओळख. लडाखचे खासदार जाम्यांग शेरिंग नामग्याल यांनी मात्र २०१९ मधील लोकसभेतील भाषणांनंतर हा समज मोडून काढला. कलम ३७० रद्द केल्यावर नामग्याल यांचे क्रांतिकारी भाषण कोणीच विसरू शकणार नाही. लडाख म्हटले की, तिथल्या डोंगर, दऱ्यांसोबत हे भाषणही माझ्यासाठी लडाखची ओळख झाली आहे. खरंतर दुर्दैवाने इतकीच माहिती या सुंदर प्रदेशाबद्दल बहुतांश भारतीयांना असेल. तिथले काही खाद्यपदार्थ आपल्याला माहीत असतील तर बहुतेक पदार्थांची नावेही ऐकली नसतील.

गुर गुर चहा हा काश्मिरच्या नून चहाचा भाऊ. पहाडी प्रदेशात थंडीसाठी चहा हवाच शिवाय त्यातून शक्तीही मिळायला हवी म्हणून यात लोणी असते. बुलेट कॉफी, किटो डायट प्रेमींना माहित असेल; पण हा बुलेट चहा नवीनच आहे! आपल्या पुण्यात चहाच्या दुकानांचे फक्त मॉल्स उघडायचे राहिले आहेत; पण तिथेही हा चहा मिळत असेल की नाही याची शंकाच आहे. असो! तर या चहाला गुर गुर का म्हणतात? याची एक गम्मत आहे. हा चहा एका लाकडी भांड्यात लोणी मिसळून कुटतात किंवा घुसळतात तेव्हा गुर गुर असा आवाज येतो. त्याचेच नाव चहाला दिले आहे. (आपण आपल्या चहाला त्या एका जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे सूर्रर्रर्र असं नाव ठेऊ शकतो.)

गुर गुर चहाची संकल्पना तिबेटमधून लडाखमध्ये आली. तिबेटमध्ये याकच्या दूध आणि लोण्यापासून हा चहा बनवतात; पण लडाखमध्ये गायीच्या दुधाचाही वापर होतो. या सगळ्या चहांसाठी जी भांडी वापरतात ना ती अतिशय सुंदर असतात, काश्मिरमध्ये असतात तशीच. या चहात चवीसाठी थोडे मीठही असते. लडाखमध्ये चहा हा पॅन किंवा पसरट भांड्यातही बनवतात. चहाची पूड आणि मसाले पाण्यात उकळून ठेवतात. तो चहा एका भांड्यात लोणी आणि दूध मिसळून घुसळतात (त्याच वेळी गुर गुर आवाज येतो) आणि गरमागरम प्यायला देतात. हा चहा पण गुलाबीसर असतो.

लडाखमध्येच नव्हे तर चीन, नेपाळ आणि आसपासच्या पहाडी देशांमध्येही हा चहा पितात. वेगवेगळ्या नावांनी हा चहा प्रसिद्ध आहे. मंडरीनमध्ये या पो चा म्हणतात. आपल्याकडे कसं गप्पा रंगल्या की २-३ कप चहा तरी रिचवला जातो तसाच लडाखमध्येही आहे. कोणी पाहुणे आले की, त्यांचे चहाचे कप रिकामे राहता कामा नये, ही एक आदरातिथ्याची पद्धत. अर्थात आपल्याकडील चहाप्रेमींनी असं सरसकट या प्रथेची नक्कल करणे योग्य नाही, ऍसिडिटी होईल. वाईन आणि डार्क चॉकलेटसारखीच या चवीची सवय व्हायला काहीसा वेळ लागतो. एकतर गोड ऐवजी खारी चव असते आणि बटरची वेगळी चव. हा चहा जरी चांगला असला तरी जास्त प्यायल्यास रक्तदाब वगैरे आजारांना आमंत्रण मिळू शकते.

या चहा व्यतिरिक्त अजून बरेच पेय आहेत. लडाखच्या थंडीत टिकण्यासाठी आणि पहाड चढतांना डिहायड्रेशन होऊ नये, म्हणून लोकांनी चहाचे एक कुटुंब होईल इतक्या प्रकारांचा शोध लावला आहे. या सगळ्याची माहिती आपण पुढील लेखात पाहू. तोपर्यंत चायोस किंवा तंदुरी किंवा आणखी कोणत्याही चहाच्या पार्लरमध्ये (हो, आईस्क्रीमचे नसतील इतके चहाचे प्रकार मिळतात आजकाल.) जाऊन चहा पियुन येऊ शकतो.

- सावनी