चुरपी - लडाखी चीझ

युवा लेख

युवा विवेक    29-Sep-2023   
Total Views |

चुरपी - लडाखी चीझ

जगातले सर्वांत कडक चीज म्हणून या हिमालयातील चीझची ओळख आहे. हिमालयातील चीज यासाठी म्हणतेय कारण हे चीझ केवळ लडाख नव्हे तर नेपाळ, भूतानमध्येही प्रसिद्ध आहे. नेपाळमध्ये चॊगो याला तर भूतानमध्ये दुरखा म्हणतात. याकच्या दुधापासून बनवलेले चुरपी चीझ भारतात लडाख, सिक्कीम आणि जवळच्या राज्यात जास्त वापरले जाते. ज्यावेळी मांस उपलब्ध नसते त्यावेळी प्रोटीन आणि फॅट्स मिळावे म्हणून हे चीझ वाळवून साठवले जाते त्यामुळे याचे दोन प्रकार आहेत, मऊ आणि कडक चुरपी. थुकपा या प्रसिद्ध पदार्थात चुरपी असते किंवा कधीकधी बटर चहा मध्येही मिसळले जाते.

चुरपी बनवण्यासाठी दूध तापवून त्यातील साय वेगळी करतात. गरम दुधात आंबट दही किंवा सोअर क्रीम मिसळले जाते. व्हे वेगळे केल्यावर त्यानंतर सगळे मिश्रण २४ तास फर्मेंट होण्यासाठी ठेवले जाते. घट्ट दही लागल्यावर त्याचे चौकोनी किंवा आयताकृती तुकडे केले जातात. हे तुकडे आगीशेजारी ठेऊन वाळवले जाते. चुरपी इतके कडक असते कि पटकन दाताने तुटत नाही, शांतपणे चावून खावे लागते. अगीशेजारी वाळवल्यामुळे चुरपीला छान स्मोकी फ्लेवर असतो पण चव मात्र काहीशी गोड असते. मऊ चुरपी पनीरसारखे असते. त्याची भुर्जी बनवतात, मोमोजमध्ये सारण म्हणून वापरतात किंवा भाजी/भातासोबत खातात. चुरपी बनवल्यानंतर एका वर्षाच्या आत संपवावे लागते पण योग्य पद्धतीने साठवले तर २० वर्षांपर्यंतही टिकू शकते. वंशपरंपरेने चालत आलेली पाककृती लडाखी लोक बनवतात. हिमालयातील गवत आणि वेगवेगळ्या वनस्पती याकच्या आहारात असल्याने एक विशिष्ठ चव चुरपीला असते ती इतर कुठे येणे अवघड आहे.

मऊ चुरपीचे खूप पदार्थ सहज बनवता येतात पण कडक चुरपीचे वैशिष्ठ्य आहे. हळूहळू रवंथ केल्यासारखे हे चीझ खावे लागते. हिवाळ्याच्या दिवसात जेव्हा खूप भूक लागते तेव्हा एक स्नॅक म्हणून हे चीझ खातात. दिवसभर काम केल्यावर कामगार शांतपणे बसून ऊर्जा मिळवण्यासाठी चुरपीचा आस्वाद घेतात. दुधातील प्रोटिन्स आणि मिनरल्स चीझमध्ये असल्याने अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे. कॉटेज चीझ म्हणजे आपले पनीर इतकेच मला याआधी माहित होते पण भारतीय लोकांनी बनवलेले चीझ आहे आणि ते पहाडी लोकांसारखेच कठीण, चिवट आहे हे मला माहित नव्हते.

सहज कुतूहल म्हणून हा पदार्थ ऑनलाईन मिळतो का पाहिले तर चक्क मिळत होता. हिमालयन नेटिव्ज नावाच्या कंपनीचे चुरपी मिळते आहे. खूप महाग नाहीये. तुम्ही सगळेही मागवून पाहू शकता. अमूलने उंटाचे दूध बाजारात आणले पण चुरपी अजूनतरी लॉन्च केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. खरंतर टेस्ट ऑफ इंडिया या टॅगलाईनमध्ये हे मानाचे स्थान मिळवू शकते. बघू या, कदाचित काही वर्षांनी अमेरिकन लोकांनी चुरपीच्या गुणांची तारीफ केली तर आपला विश्वास बसून आपल्या किचनमध्ये या चीझला स्थान मिळेल!

- सावनी