प्राणी...एक जीव!

युवा लेख

युवा विवेक    04-Sep-2023   
Total Views |

 प्राणी...एक जीव!

"Until one has loved an animal, a part of one’s soul remains awakened" Anatole France नावाच्या एका फ्रेंच कवीचं हे वाक्य मी मध्यंतरी इंटरनेटवर वाचलं होतं. एक प्रसंग घडला आणि हे वाक्य किती खरं आहे सतत जाणवू लागलं. प्राणी... मग तो प्राणी म्हणजे आपल्याला पाहून होणारा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण पाहून दमू इतक्या उड्या मारणारा कुत्रा असो किंवा आपण तिला आवडणं म्हणजे आपलं नशीब जोरावर अशी मांजर असो! एकदा का तुमचा त्यांच्या विश्वात आणि त्यांचा तुमच्या विश्वात शिरकाव झाला म्हणजे आपण एकीकडे जबाबदार होऊन त्यांना मायेने सांभाळणं आणि दुसरीकडे आपल्यातल्या अल्लड पोराला जागं करून त्यांच्यासोबत तासनतास खेळणं. एरवी आपण ज्यांना घाबरत असतो किंवा "मला नाही आवडत बुवा हे असलं सोंग" असं म्हणत असतो त्यांचे माकडचाळे बघण्यात वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही. घरात "त्याला आत आणलं तर मी बाहेर" असं म्हणत असणारी व्यक्ती तिच्या लाडक्याला बाजूला बसून खायला घालू लागते.

सुखात ही आपली घरची शेंडेफळ आपल्यासोबत अजून उत्साही होऊ लागतात आणि दुःखात त्यांच्या करामतींनी आपल्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न. माणूस म्हणून जगताना आजकाल एक मात्र वाटतं, ज्याच्या आजूबाजूला प्राणी आहे तो भाग्यवान आणि मी म्हणेन तेवढाच मनाने सक्षम सुद्धा! त्यांना जपणं म्हणजे आपला जीव त्यात ओतण. त्यांना काही होणं जिव्हारी लागतं. एक दिवस जरी हे महाराज/राण्या घरी परत आल्या नाहीत, तरी जीव कासावीस होतो. त्यांच्या चेहऱ्यावर उदासिनता दिसली, वागण्यात बदल जाणवला तरी चटकन त्याला बिलगायला आपण पुढे होतो. ज्या पिल्लाला स्वतःच्या हाताने दूध पाजलं, जिला मृत्यूशी झगडून परत घेऊन आलो, ज्याने आपल्याला नको इतका लळा लावला त्याचं आपल्या आयुष्यातून निघून जाणं हे जो माणूस सहन करतो तो सक्षमच नाही का?

हे सारं झालं सहसा दिसणाऱ्या पाळीव प्राण्यांविषयी; पण इतरही प्राण्यांची अशीच तऱ्हा असणार नाही? रानमित्र वाचलं तेव्हा आपण ज्यांना जंगली म्हणतो ते तितके ही जंगली नसावेच असचं वाटून गेलं. आजकाल इंटरनेटवर अनेक व्हिडिओ दिसतात, ज्यात एखादं माकड माणसापेक्षा भावनात्मक वागत असतं, एखादा पक्षी सुद्धा माणसापेक्षा अधिक जबाबदार म्हणून दिसतो. अशा वेळी वाटून जातं की, माणूस म्हणून जन्माला येऊन या निरागस प्राण्यांना आपल्यापेक्षा कमी लेखून असं आपण काय सिद्ध करतो? आज झाडे जगवा म्हणताना प्राणी जगवा हा नारा सोबतीने का नाही दिला जात? त्यांच्या असण्याचा, त्यांचा आपल्या वसाहतीत येण्याचा आपण इतका गवगवा का करतो?

कुठेतरी प्राण्यांना प्राणी म्हणून पाहण्याऐवजी एक जीव म्हणून पाहणं महत्त्वाचं आहे, तेव्हाच आपल्या माणूस असण्यालाही अर्थ उरेल.

- मैत्रेयी सुंकले