बाडी आणि पतोडे

बाडी शब्द ऐकल्यावर हा वडी चा अपभ्रंश आहे असं मला वाटलं. विदर्भात मुगाच्या डाळीचे वडे सुकवून त्याची नंतर आमटी किंवा भाजी करतात. त्याला वड्यांची भाजी म्हणतात. बाडी म्हणजे असंच काहीसं असावं हे मला वाटत होते आणि अगदी अशीच ही रेसिपी आहे.

युवा विवेक    21-Jan-2024   
Total Views |
 
  बाडी आणि पतोडे
बाडी आणि पतोडे

बाडी शब्द ऐकल्यावर हा वडी चा अपभ्रंश आहे असं मला वाटलं. विदर्भात मुगाच्या डाळीचे वडे सुकवून त्याची नंतर आमटी किंवा भाजी करतात. त्याला वड्यांची भाजी म्हणतात. बाडी म्हणजे असंच काहीसं असावं हे मला वाटत होते आणि अगदी अशीच ही रेसिपी आहे.

उत्तराखंड मध्ये पहाडी काकडी मिळते. भलीमोठी, लांब काकडीचे साल पिवळसर रंगाचे असते. उडदाच्या डाळीला भिजवून वाटले जाते. त्याला मास म्हणतात. त्यात हि पहाडी काकडी किसून मिसळतात. या मिश्रणात मीठ, हिंग, मिरची आणि मसाले घालून त्याचे छोटे छोटे वडे बनवून उन्हात वाळवतात. वाळवलेल्या बडी पाण्यात भिजवतात आणि तेलात तळतात. तेलात लसूण, मसाले, कांदा टाकून परततात. भाजीला घट्टपणा येण्यासाठी मोहरीच्या तेलात परतलेली कणिक किंवा तांदुळाचे पीठ या मिश्रणात टाकतात. तेल सुटेपर्यंत परतल्यावर त्यात बडी टाकून उकळतात. चमचमीत बाडी तयार! नाचणीच्या पिठाची उकडही पहाडी भागात खातात आणि त्यालाही बाडी म्हणतात. हा पदार्थ तामिळनाडूमधील नाचणी बॉल्स किंवा रागी मुद्दे यासारखा आहे.

पतोडे म्हणजे पाटोड्यांची आमटी असावी असे वाटू शकेल पण तसं नाहीये. तरीही या पदार्थाची कृती वाचल्यावर लक्षात येईल कि हा अस्सल मराठमोळा पदार्थ आहे. पतोडे बनवण्यासाठी बेसन, हळद, मिरची आणि मसाले यांचे पाण्यात पातळसर मिश्रण बनवतात. अळूच्या पानावर या मिश्रणाचा पातळ थर थापला जातो. एकावर एक अळूच्या पानांचे ठार आणि त्यात सॅन्डविचसारखा बेसनाचा थर. या सगळ्या पानांना बांधून वाफवतात. वाफल्यावर त्याच्या चौकोनी वड्या कापून तेलात तळतात कि पतोडे तयार. उत्तराखंडमध्ये सिंग संक्रांती किंवा घी संक्रांती नावाचा सण साजरा करतात. या दिवसापासून पतोडे खायला सुरवात करतात. या दिवशी तुपात बनवलेले जेवण खाल्ले नाही तर पुढचा जन्म गोगलगायीचा मिळतो असे म्हणतात. उन्हाळ्यात आपण जास्त हेवी जेवण खाऊ शकत नाही म्हणून लोकांनी तसे सांगणे सुरु केले असावे. ऋतुमानानुसार कसे खावे याचा धडा लोकांना मिळावा म्हणून अशा धमक्या दिल्या जातात. नववधूला पटोडे बनवायचा आग्रह केला जातो. त्यावरून तिच्या सुग्रणपणाची परीक्षा तर होतेच पण जसं पानांना नीट बांधून ठेवतात तशी तिने कुटुंब आणि नाती बांधून ठेवावी अशी जबाबदारीही तिच्यावर टाकली जाते.

पतोडे भांगकी चटणीसोबत खातात. भांगकी चटणी बनवण्यासाठी भांगच्या बिया मिळतात. या धण्यासारख्या दिसतात. या बिया लाल मिरचीसोबत भाजतात. भाजून झाल्यावर पुदिना, मीठ यासोबत या बिया वरवंट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटतात. त्यावर लिंबू पिळला कि चटणी तयार. जवळपास रोज ही चटणी लोक खातात.

पहाडी भागात थंडी सुरु झाली कि भाज्या कमी मिळतात आणि आपल्या विदर्भात अशीच परिस्थिती उन्हाळ्यात असते. अशा वेळी दोन्ही लोकांनी डाळी भिजवून, वाळवून त्यांच्या वड्यांची भाजी बनवणे सुरु केले. आत या दोन्ही प्रांतात शेकडो मैलांचे अंतर आहे, वातावरण अगदी विरुद्ध पण विचार अगदी सुसंगत आणि सारखे! हे केवळ भारतातच होऊ शकते. जसं विदर्भातील लोक डाळ जास्त खातात तसाच उत्तराखंडमध्ये आहे कारण एकाच शक्ती मिळते आणि बाकी भाज्यांची कमतरता. उत्तराखंडमध्ये सगळ्या राज्यांमधून एक एक पदार्थ आणून त्याचे पहाडी व्हर्जन बनवले आहे कि काय अशी मला शंका आहे आणि त्याचा उलगडा पुढील भागात होईलच.

पतोडे पाटोड्यांच्या आमटीचा भाऊ असावा असेल मला वाटत होते पण आपल्या अळूच्या वाडीच्या कुटुंबातील निघाला. गुजराती पात्रा, मराठी अळूवडी आणि उत्तराखंडी पतोडे सारखेच आहेत. मराठी अळुवडीत चिंच-गुळ असतो तो मात्र यात नाही. पहिल्याच लेखात हे समजले कि, उद्या मराठी लोकांना उत्तराखंड मध्ये जाऊन राहावेसे वाटले तर खाण्याचा प्रश्न येणार नाही इतके खरे!