_202410211520185557_H@@IGHT_350_W@@IDTH_807.png)
शीर्षक वाचून काय आठवलं? 'आमच्या पप्पांनी गंपती आणला' हे गाणं आठवलं नाही तर नवल! मागच्या वर्षी प्रसिद्ध झालेलं हे गाणं तेव्हाच सर्वश्रुत झालेलं आपण पाहिलं आहे. पण त्याचा पैस तेवढाच मर्यादित नाही.. ते गाणं याही वर्षीच्या गणपतीत तितकंच जोरदार साजरं झालं हे आपण पाहिलंय. एखादं गाणं प्रसिद्ध होतं त्यात तक्रार का आणि कशाची असावी? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
एकीकडे एक लहान मुलगा हे गाणं गातो, रेकॉर्ड करतो, ते समाज माध्यमांवर प्रकाशित होतं आणि अल्पावधीत त्याला इतकी प्रसिद्धी मिळते की ते गणपती मिरवणुकींमध्ये रस्त्यारस्त्यांवर वाजत राहतं, त्यावर हजारो रील्स होतात, इतकंच नाही तर त्या कलाकारांच्या मुलाखती होतात त्यांना अगदी टिव्ही कार्यक्रमांतही बोलवलं जातं. यातून समाज माध्यमांची ताकद दिसत असली, तरी त्यातलं काय उचलून धरावं याचा विवेक नसलेल्या वापरकर्त्यांचं दर्शन होतं हे नाकारता येत नाही. चांगल्या गोष्टी उचलून धरायला आणि सामूहिक पातळीवर उचलून धरायला बळ लागतं. आर्थिक नव्हे, तर वैचारिक, मानसिक बळ आणि आकर्षकातून सत्व जाणण्याचा विवेक लागतो. तो आज आपल्याकडे कसा नाही याचं प्रत्यंतर किती वेळा घेत आलो आहोत आपण! या गाण्याबद्दल कोणताच आकस वगैरे नाही, किंवा त्याच्या उत्तम अशा बालगायकाचा देखील विरोध नाही. पण गण्यातील भाषिक व्यवहाराचा विरोध आहे. तो आपण समाज म्हणून गंभीरपणे केव्हा घेणार आहोत? माहित नाही.
या गाण्यातील 'पप्पा' किंवा 'मम्मा' हे शब्द खटकणारे वाटू नयेत? आणि ते न वाटताना अभिजात भाषेचा अभिमान बाळगावा? हे परस्पर विरोधी नाही? मुळात उत्सवामधल्या वाढत्या उथळतेत असे प्रश्न गुलाली माणसांना पडावेत ही अपेक्षाच कशी करावी? पण तरीही समाजातील शहाण्या लोकांनी याबद्दल मौन पसंत करणं खेदाचं वाटतं. या सर्व गोष्टी अधिक प्रकर्षाने जाणवतात त्या मागे एक पार्श्वभूमी आहे. काहीच महिन्यांपूर्वी समाज माध्यमांवर एका व्यक्तीने एक पोस्ट केली ज्यामधे बालभारतीच्या इयत्ता पाहिलीच्या पाठ्यपुस्तकात एक कविता कशी अयोग्य आहे हे निदर्शनास आणून देण्याचं सत्कृत्य त्या गृहस्थांनी केलं होतं. 'शोर' आणि 'वन्समोअर' असली यमकं जुळवलेली कविता पाठ्यपुस्तक निवड समितीने निवडलीच कशी असे प्रश्न उपस्थित झाले. आजही जाऊन बघा, एकट्या फेसबुकवर याबद्दलच्या अक्षरशः हजारो पोस्ट्स दिसतील. प्रत्येकाने ती कविता कशी कविताच नाही, इंग्रजी शब्द असल्याने बालकविता नाही, तिची निवड कशी अयोग्य आहे किंवा अगदी चांगले मराठी यमक कोणते देता येईल असं सांगत टीकेसह काव्यदुरुस्तीचे प्रयत्न देखील केले होते. याबद्दल पुष्कळ चर्चा घडून आली. अर्थात, अशा पोस्ट करण्यामागे आपलं लेखकुपण (साहित्यातील विचक्षण वगैरे जाण, सुधारणेचे सल्ले देत) सिद्ध करण्याचे अनेक हौशी लेखकांचे हेतू काही लपलेले नाहीत.
पोस्टकर्ते सगळेच लेखक नाहीत हे जितकं खरं, तितकंच पोस्ट करणाऱ्या सगळ्याच लेखकांचे हेतू प्रदर्शनाचे नाहीत हेही खरं. या सगळ्यातून जाणवलेली भाषेबद्दलची आस्था, तळमळ खूप आश्वासक आहे. पण ही चर्चा होणं, भाषाभान जागवत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरंतर, हिच गोष्ट 'आमच्या पप्पांनी गंपती आणला' या गाण्याबद्दल होऊ शकत होती, व्हायला हवी होती. पण तसं झाल्याचं काही दिसत नाही. का असेल असं? ते नाचायचे गाणे आहे, पाठ्यपुस्तकातील छापील कविता नाही म्हणून गंभीरपणे घेतलं गेलं नसेल? टीका केली गेली नसेल? पण असंही नसावं. कारण आजचा काळ बघता मुलांना परिक्षेपुरत्या पाठ केलेल्या मराठी कविता जितक्या लक्षात राहत नाहीत, तितकी गणपतीतली आवाजी गाणी लक्षात राहतात. हवंतर जवळच्या अनेक मुलांना विचारुन पहा. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील कवितेपेक्षा या गाण्यांचा प्रभाव अधिक आहे हे नाकारता येत नाही. गणपतीतील अशा कित्तीतरी आवाजी गाण्यांबद्दल बोलता येईल हे खरं, पण इथे प्रश्न लहान मुलांशी निगडित आहे. ते गाणं लहान मुलानेच गायल्याने मुलांना ते अधिक जवळचं वाटतं, त्यांच्याशी ते अगदी पटकन जोडलं जातं. अशाने खालावत चाललेलं भाषाभान मुलांमध्ये रुजत जात आहे.
एखादी गोष्ट उचलली गेली की मग ती अर्थहीन असली तरीही तिच्यातील अर्थ शोधण्याचे प्रयत्न बाजारपेठेकडून अव्याहतपणे सुरु असतातच. मग अगदी हे गाणं वेगवेगळ्या ठिकाणी वापरणं, रिमिक्स करणं, जाहिरातीत ते शब्द वापरणं, किंवा आणखी काहीही.. युट्यूबवर या गाण्याच्या एकाच व्हिडिओला पंचेचाळीस मिलियन म्हणजेच चाडेचार कोटी 'व्ह्युज' मिळतात ही बाब लक्षणीय आहे! इतकंच कशाला, हे बालगीत भजनाचे शब्द देणाऱ्या अनेक संकेतस्थळांवर अगदी हिंदी संकेतस्थळांवर सुद्धा उपलब्ध आहे हे नवल! त्याच्यामागचे आर्थिक हेतू स्पष्ट आहेतच.
पण या सगळ्यात लहान मुलांमध्ये रुजत जाणारं तण, त्याचं काय? तरीही याबद्दल कुणीच बोलू नये? समजतील मोठा उत्साही घटक त्यावर नाचाण्यात आनंद घेतोय म्हणून बोलू नये की छापील नाही म्हणून काहीही गोड मानून घ्यावं?
अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आता पुढे काय? वगैरे चर्चा करताना अशा अनेक गोष्टी आपण विसरुन चाललो आहोत का? त्या डोळसपणे बघत, सत्व शोधण्याचा आणि भाषाभान शक्य तितकं जागवण्याचा विवेक पुढील पिढ्यांमध्ये रुजवू या. हे किमान आपापल्या पातळीवर करण्याची बुद्धी आणि प्रेरणा सर्व मराठी भाषकांना लाभो हिच प्रार्थना.
- पार्थ जोशी