सुगीचे दिस..! भाग - ९

दिवसभर पाटलांच्या वावरात ऊक्त्यात कांदे काढायचे काम करून मी थकून गेलो होतो.

युवा विवेक    07-Feb-2024   
Total Views |
 
सुगीचे दिस..! भाग - ९
सुगीचे दिस..! भाग - ९
दिवसभर पाटलांच्या वावरात ऊक्त्यात कांदे काढायचे काम करून मी थकून गेलो होतो. अस्ताला गेलेल्या सूर्या बरोबर मी घरी पोहचलो अन् बाहेर ठेवलेल्या रांजनातील गार झालेल्या पाण्याने मी हातपाय धुवून परसदारी असलेल्या आमच्या चुल्हीजवळ येऊन बसलो. अंगात हुडहुडी भरून आली होती, हवेत गारवा होता.
मायनं  माझ्या आधीच हातपाय धुतले होते अन् देव्हाऱ्यात दिवाबत्ती करून तिने बाहेर असलेल्या तुळशी वृंदावनात अगरबत्ती खोचली. अन् चुल्हीवर कोरा चहा करायला ठेवला, धगधगत्या आगीची झळ माझ्या बसल्यापर्यंत येत होती अन् दिवसभर काम करून अवघडून गेलेले शरीर या गरमगरम शखाने उजळून निघावे तसं हरकले होते.
चहा उकळत होती, तिचा मंद कोरा सुगंध नाकाशी दरवळत होता. आई अधूनमधून उकळ आलेल्या चहाला सांडशीत पकडुन हलवत होती अन् वाफाळलेला चहा मग अजूनच दरवळत होता. चहा उकळून पार काळाठीक्क झाला अन् मायने एका पेल्यात तो मला ओतून दिला, पिठाच्या डब्यातून तो बटर माझ्यासमोर धरले.
अनपेक्षित बटर समोर आल्याने मला आनंद झाला, मी चुल्हीच्या शखा मोहरे बसून पेल्यात ती बटर कोंबली अन् चमच्याने त्यांना खात बसलो. मायने बशीत चहा ओतला अन् नथीचा अंदाज घेत ती ही नथ सावरत चहा घेत बसली.
चहा घेऊन झाला तसं मी दहा-पाच मिनिटं चुल्हीजवळ बसून पुन्हा परसदारी असलेल्या आमच्या खाटेवर येऊन लोळत बसलो. अगरबत्तीचा दरवळ साऱ्या अंगणात घुमू लागला होता. सांजेला सुरू झालेला गावातील सावत्या माळ्याच्या देवळातील हरिपाठ आता संपला होता अन् गावची हरिपाठ म्हणणारी माझी माऊली ज्याच्या त्याच्या घराच्या वाटा जवळ कर होती.
थंडीचे दिवस सुरू असल्याने गावात जागोजागी शेकोट्या पेटल्या होत्या. गावातली तरणी पोरं चौकात शेकोटी पेटवून गावातल्या लोकांची मापे काढत बसली होती. तर गावातली म्हातारी लोकं देवळाजवळ असलेल्या पारावर शेकोटी पेटवून त्यांच्या भूतकाळातील आठवणींशी वर्तमान काळाचा अन् भविष्य काळाचा संबंध जोडून जुन्यानव्या गोष्टींचे अनुमान लावत गप्पा करत बसले होते.
आकाशात आभाळ दाटून आलं होतं, कदाचित वाऱ्याच्या सोसाट्यासह पाऊस बरसतो की काय असं झालं होतं अन् वाऱ्याच्या झोताने वातावरणात फार गारठाही निर्माण झाला होता. झाडांवर नव्याने फुटलेल्या अन् शिशिरात पानगळ झालेल्या पानांची सर्वत्र सळसळ परिसरात ऐकू येऊ लागली होती.
पावसाचा अंदाज येतो की काय असं वाटू लागल्याने गावातील लोकांची पुन्हा एकदा वावराच्या वाटा जवळ करायला लागतात की काय या विचाराने लोकं भयभीत होऊन आकाशाकडे बघत बसले होते. कोणी ताडपत्र्या घेऊन रात्रीची भाकर खाण्या आधीच आल्या रस्त्याने पुन्हा वावराच्या वाटेला लागले होते, सोसाट्याचा वारा मी म्हणत होता.
सावता माळ्याच्या देवळात असलेला सभामंडप वाऱ्याच्या झोताने पार उडून जातो की काय असं झालं होतं. सप्त्याची सारी मंडळी ज्याच्या त्याच्या घरी गेली होती, तितकी विनेकरी म्हातारी माणसं अन् टाळकरी माय माउली उधाणलेल्या वाऱ्याच्या झुळका बघत सावता माळ्याच्या देवळाच्या एका अंगाला असलेल्या अन् मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या खोलीत देवाचा धावा करत बसली होती. वाऱ्याचा झोत वाढला की खोलीवरचे पत्र मोडल्यासारखे कडकड वाजायची अन् आता जर वावधनाने पत्र उडून गेली तर गावात दरसाल सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाचे नियोजन बिघडेल असं सगळ्यांना वाटू लागलं होतं.
वावधनामुळे साऱ्या गावाची लईन गेली होती, सारा गाव एकाकीच एखाद्या भूकंपात किंवा काहीतरी मोठ्या नैसर्गिक आपत्तीत गुडूप होऊन कायमचा लुप्त व्हावा तसा अंधारात गुडूप झाला होता. वावधन आलं तसं काही लोकं बनिम झाकायला म्हणून वावरात निघून गेली अन् काही भाकर कुटका खाऊन चिमणीच्या अंधुक अंधुक उजेडात झोपी गेले.
वावधानाचा जोर काही केल्या ओसरत नव्हता मी ही आता आमच्या कुडाने शेकारलेल्या झोपडीत बाज टाकून निपचित सोसाट्याचा वारा शांत होण्याची वाट बघत बसलो होतो.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!