कुमोनी थाली - मडुयेकी रोटी, बिच्छू बुटी का साग

गढवाली पदार्थ आपण पाहिले आता उत्तराखंडचा दुसऱ्या भागातील पदार्थांबद्दल जाणून घेऊ या. कुमाऊ भागातही पहाडी पदार्थ बनतात पण थोडा फरक असतो. पहाडातील पदार्थ उष्ण असतात, तिकडच्या थंडीच्या हिशोबाने.

युवा विवेक    01-Mar-2024
Total Views |

कुमोनी थाली - मडुयेकी रोटी, बिच्छू बुटी का साग 
कुमोनी थाली - मडुयेकी रोटी, बिच्छू बुटी का साग
   गढवाली पदार्थ आपण पाहिले आता उत्तराखंडचा दुसऱ्या भागातील पदार्थांबद्दल जाणून घेऊ या. कुमाऊ भागातही पहाडी पदार्थ बनतात पण थोडा फरक असतो. पहाडातील पदार्थ उष्ण असतात, तिकडच्या थंडीच्या हिशोबाने.
   मडूये की रोटी - बाजरीच्या भाकरीसारखी दिसणारी ही रोटी पण नाचणीची असते. जास्त फायबर असणारी रोटी शेवटी थोडीशी कडसर लागते पण तिकडच्या भाज्यांसोबत मॅच होते. नाचणीला उत्तराखंडमध्ये मडूआ म्हणतात. नाचणीचे फायदे मी काही वेगळे सांगायला नको.
बिच्चू बुटी का साग - नेटल लिफ म्हणजे बिच्चू बुटीची भाजी. या वनस्पतीला हात लावला तर दहा विंचू चावल्याइतक्या वेदना होतात. पण गरमागरम नाचणी रोटी, तूप सोबत खूपच छान लागते. मक्केकी रोटी आणि सरसोका साग चे उत्तराखंडातील रूप! ही भाजी शेतात पेरत नाही तर आसपास जंगली वनस्पतींसारखी उगवते. या वनस्पतीवर काटे असतात, त्यांना हात लावला तर प्रचंड वेदना होतात. त्यामुळे पाने तोडतांना काळजीपुर्वक चिमट्याने तोडावी लागतात. पानांवरचे लहान काटे तोडल्यावर काही वेळाने मलूल होतात आणि त्यानंतर भाजी बनवता येते. लहान मुलांना या झाडाची धमकीही दिली जाते. “बिच्चू बुटीच्या काट्यांनी मारेल फटका” अशी धमकी एखाद्या पहाडी घरात ऐकू येऊ शकते. साग बनवतांना यासोबत अजून दोन-तीन पालेभाज्याही मिसळता येतात. काही मोठ्या पानांवर जे काटे असतात ते आगीवर फिरवून जाळून टाकतात. गरम पाण्यात ही पाने धुतल्यावर पाट्यावर वाटली जातात. लोखंडाच्या कढईत मोहरीच्या तेलात किंवा तुपात कोरडी लाल मिर्ची, मेथ्यांचे दाणे, लोकल मसाले, मोहरी आणि वाटलेली पाने घालून परततात. मीठ टाकून, पाणी शिंपडून शिजवली जाते. भातासोबत खातांना पातळसर बनवतात. दोन मिनिटात भाजी तयार! इतक्या डेंजरस पानांची भाजी खाऊन पचवण्याची कल्पना पहाडी लोकांनाच सुचू शकते. पालकाची भाजी मी अशी साध्या पद्धतीने करून पाहणार आहे! खिरे का रायता - पहाडी काकडीपासून बडी बनवतात तसंच रायताही बनवतात. काकडी किसून हा रायता बनवतात. या तीन पदार्थांचे कॅाम्बिनेशन अतिशय चविष्ट लागते. कुमाऊ लोक अजून काय काय डेंजरस पदार्थांची भाजी बनवतात हे पुढच्या लेखात जाणून घेऊ!