कुमोनी थाली - भट के डुबके, भट की चुडकानी

भट म्हणजे एक प्रकारची दाळ आहे. जी काळ्या सोयाबीनसारखी दिसते. सोयाबीनचीच एक व्हरायटी आहे.

युवा विवेक    08-Mar-2024   
Total Views |
 
कुमोनी थाली - भट के डुबके, भट की चुडकानी
कुमोनी थाली - भट के डुबके, भट की चुडकानी

   तुम्ही कधी डुबूकवड्यांची आमटी खाल्ली आहे? माझी आई सांगायची याबद्दल. तिच्या लहानपणी दोन-तीन महिन्यातून एकदा अशी मसालेदार आमटी बनायची आणि त्यात वाळवलेले डाळींचे वडे असायचे. ती आमटी म्हणजे डुबूकवडे! भट के डुबके ऐकल्यावर मला एकदम ही आमटी आठवली.

   भट म्हणजे एक प्रकारची डाळ आहे. जी काळ्या सोयाबीनसारखी दिसते. सोयाबीनचीच एक व्हरायटी आहे. एक वाटी भट की दाल १-२ चमचे तांदूळासोबत रात्रभर पाण्यात भिजवतात आणि अरडबरड वाटून घेतात. कढईत मोहरीचे तेलात हिंग आणि वाटण टाकून परततात. थोडे पाणी मिसळून शिजवल्यावर त्यात मसाले म्हणजे हळद, तिखट आणि धणे पावडर टाकतात. हवे तितके पाणी घातले जाते. शेवटी पाणी टाकल्यावर डुबूक आवाज येतो म्हणून हे नाव दिले गेले आहे. ही डाळ शिजायला साधारण ४० मिनिटे लागतात. उत्तराखंडचे पिठले आहे जे भातासोबत खातात! भट की दालला ब्लॅक सोयाबीन म्हणतात आणि हे ॲानलाईन मिळू शकते. प्रोटिन भरपूर असलेली ही पाककृती अगदी कमी तेलात होते. डायटसाठी चांगली! पहाडी जेम्समधे नक्की समाविष्ट करता येईल.

   कुमोनी लोकांचे बरेच पदार्थ हे कंफर्ट फूड कॅटेगरीत येतात. साधे, सोपे आयुष्य जगणारी ही माणसे, साधी सोपी भाषा बोलतात आणि याचे पदार्थही सोपे! रोजरोज इतका पहाड चढल्यावर आणि चालल्यावर शक्ती तर हवी ना कठीण पाककृती बनवण्यासाठी! त्यापेक्षा पटापट भट के डुबके आणि भात खाऊन गुडूप झोपी जायचे. का कोण जाणे पण हा पदार्थ खाल्यावर पोंगल खाऊन येते तशी गाढ झोप येत असणार असे मला वाटतेय. ते कळण्यासाठी एखाद्या रविवारी दुपारी भट के डुबके करून पहायला हवे!

   भट की चुडकानी - काली दाल खाल्ली असेल ना, त्यासारखीच ही दाल दिसते. भट की दाल म्हणजे ब्लॅक सोयाबीन पाण्यात धुवून कापडावर वाळवले जातात. धणे, लसूण, हिरव्या मिरच्या यांची पेस्ट बनवून त्यात हळद, तिखट, धणे पावडर टाकून थोडे पाणी टाकून बाजूला ठेवतात. कढईत तूप किंवा मोहरीचे तेल टाकून त्यात डाळ टाकून परततात. डाळ तडकल्याचा आवाज आला म्हणजे तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात. मंद आचेवर ही डाळ पॅापकॅार्नसारखी फोडल्यावर त्यात ३-४ चमचे गव्हाचे पीठ टाकून खरपूस भाजतात. हे मिश्रण थंड करायला ठेवले की दुसऱ्या कढईत. मोहरी तेलात कांदा परतून त्यात मसाल्याची पेस्ट टाकतात. मसाला छान परतल्यावर डाळ टाकून त्यात हळूहळू पाणी टाकायचे. गाठी होता कामा नये. भरपूर पाण्यात ही डाळ मऊसर शिजवल्यावर भट की दाल तयार.

   ही डाळ पातळसरच असते आणि भातासोबत खाल्ली जाते. ही अतिशय वेगळी डाळ आहे. मी भट की डाळ खाल्ली नाहीये आणि गव्हाचे पीठही कोणत्या वरणात टाकले नाही. डाळ कढईत तडातड भाजतात म्हणूनच चुडकानी असे नाव ठेवले असावे हा माझा आपला अंदाज! मी सर्च केले तर दिसले की ब्लॅक सोयाबीनमध्येही जवळपास सोयाबीनइतकेच प्रोटीन असते! ही तर लॅाटरीच की. जर ही डाळ चवीला छान लागत असेल तर आपण पटकन खायला सुरवात केली पाहिजे!

   अजून एक पहाडी जेम! आपली साधी उसळ किंवा डाळ अशी बनवता येईल का? एखादी डाळ तरी मला अशी तेलात फोडून बनवायची आहे. प्रयोग करावे लागतील पण ठीक आहे. किंबहूना सोयाबीनही असे बनवून पाहता येईल ना? निदान असा मसाला टाकून तरी एखादे वरण किंवा उसळ बनवायला हवी. उत्तराखंडचे पदार्थ मला वाटले होते त्यापेक्षा कितीतरी वेगळे निघाले! वरण भात, भाजी, पोळीच खातात तर असे काय वेगळे बनवणार हा माझा समज दूर झाला.
--
Regards,
Sanika Bhokarikar