मावडी भाग - ५

युवा विवेक    10-Apr-2024
Total Views |


मावडी भाग - ५

प्रवीण अन् मावडीची माय आता पूर्ववत झाली होती. ती ही तिच्या मोडक्या तोडक्या संसाराला हातभार लागावा म्हणून आता लोकाच्या इथे रोजंदारीवर कामाला जात होती. मावडीसुद्धा माय बरोबर उकत्याच्या कामात माय बरोबर वाटा करून दिवसभर राबू लागली होती.

वर्षा मागून वर्ष सरू लागले होते. सगळं कसं गुण्यागोविंदाने सुरू होतं. गावात पोलीस भरतीच्या नादाला लागलेली पोरं दोन वर्ष सलग भरती न आल्याने भरतीचा नाद सोडून दुसऱ्या कामाला लागली होती. कोणी मिस्तरीच्या हाताखाली तर कुणी वीट भट्टीवर विटा थापायला, कुणी लोकांच्या शेतात रोजंदारीवर असं सगळी मुलं आता पांगली होती. दिवसभर सुरू असणारा त्यांचा अभ्यास आता मागे सुटला होता. अन् फक्त मैदानी चाचणीसाठी सध्या ही गावातली भरतीचे वेड असलेले पोरं पहाटे पहाटे गावचा रस्त्याला धावत होती.

मावडी दहावी होऊन दोन वर्ष सरले होते. ती ही अंगाने आता भरली होती, दिसायला नाकी डोळी सुंदर असल्यानं गावातील धनवान घरात जन्मलेल्या तरुणांची तिच्यावर सतत नजर असायची. ती चौकातून बायकांच्या समवेत कामाला निघाली की ही पोरं तिला बघून आडवे बोलायची. यामुळं सोबत असलेल्या बायकांची सुद्धा नाचक्की होत असायची म्हणून आता मावडी अन् तिच्या माय समवेत कुणी कामाला जात नव्हते.

त्या आपल्या त्यांच बायकांच्या मागून वेगळ्या वाटेनं लोकांच्या इथे कामाला जात असायच्या. गावच्या बांडगळ पोरांची समजूत काढायला जावे तर ती ऐकणारी नव्हती अन् समजून सांगितलं तरी आपल्याच नावाचा बोंभाटा होईल असं माय लेकीला वाटत होतं. अन् ते ही तितकं खरं होतं कारण किती केलंतरी गावासाठी, गावातील लोकांसाठी त्या दोघी परक्या गावाच्या अन् मांगखेड्यात पोट भरायला आलेल्या, गावच्या आश्रयाला आलेल्या मायलेकी होत्या.

येणारे दिवस निघून जात होते. आता तिघा मायलेकांचे चांगलेच बस्तान गावच्या एका अंगाला असलेल्या मांगवाड्यात बसले होते. तिघेही ढोर मेहनत करत पैक्याला पैका लावत काम धंदे करत होती. पहिल्यापेक्षा आता त्यांची परिस्थिती चांगली झाली होती. हळू हळू अजून थोडा पैका साठवू अन् मावडीचे एखादा सांजसुरता पोर अन् घरंदाज घराणे पाहून मावडीचे त्याच्याशी लग्न लाऊन असं प्रवीण अन् त्याची माय विचार करत होती.

तसं मावडीवर गावातल्या कित्येक चांगल्या लोकांच्या नजरा होत्या. पण; मावडीच्या मायने गावातल्या लोकांचं वागणं बघितलं होतं. अन् गावात लेक दिली तर तिचं लगीन टिकणार नाही याची तिला जाणीव होती. त्यामुळं लग्नाचं आजचं उद्यावर ढकलल्या जात होतं. घरात करूसौरू लागणारं मोठं कुणी नसल्याने मावडीसाठी सोयरीक बघणंही तितकं सोप्पं नव्हतं.

या सगळ्यात प्रवीणच्या सरकारी नोकरीचा हातभार त्यांना होईल असं त्यांना वाटत होतं. पण; दोन-तीन वर्ष झाली तशी पोलीस भरतीही काही निघना झाली होती. अन् सैन्य दलाच्या भरतीमध्ये आलेलं अपयश यामुळं प्रवीणही मनातल्या मनात खचत होता. लोकांच्या इथे मजुरीने पोट तर भरत होतं पण असं जगणं कधीपर्यंत आजच्या दिवसाची पोटापाण्याची सोय झाली पण उद्याचं काय आपल्या भविष्याचे काय हा प्रश्न प्रवीणला सतावत होता.

भविष्याच्या दृष्टीने काहीतरी खडतर पाऊल उचलायला हवं असं प्रवीणला वाटून गेलं. पण तसं काही घडून येईल असं त्याला दिसून येत नव्हतं. आशेचा किरण काही त्याच्या नजरी पडत नव्हता. तो आता ही इतर तरुण पोरांच्या प्रमाणे कधी एकदा पोलीस भरती येईल, कधी एकदा मीही माझं पोलीस भरतीच्या वेळी माझं नशीब मैदानात आजमावून पाहिल असं त्याला झालं होतं.

हळुहळु मांगवाड्याची वस्ती वाढून आता मांगवाडा वीस-पंचवीस घरांची वस्ती झाली होती. गावात आलेल्या सरकारी योजना मांगवाड्यात येऊन पोहचल्या होत्या. दिवसांच्या मागून दिवस जात होते. एक दिवस असच सांज सरली आणि प्रवीण लोकांच्या शेतात खत टाकायचे काम करून प्रवीण घरी म्हणेजच त्याच्या झोपडीला आला. त्याची माय अन् मावडीसुद्धा लोकांच्या इथून काम करून सांजेला झोपडीला आली.

जेवणं उरकली अन् प्रवीण मित्रांच्यात जाऊन बसला. मित्रांच्या गप्पात एकाकी गलका झाला, महाराष्ट्र गृहविभागाने अठरा हजार पदांची महा पोलीस भरती घेण्याचे ठरवले आहे. अन् त्यासाठी लवकरच वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यामुळे पुन्हा एकदा आज खूप दिवसांनी पारावर गप्पा रंगल्या होत्या गप्पा होत्या. उद्यापासून भरती तयारी करण्यासाठीच्या, मैदानी चाचणीसाठी तयारी कशी करायची, लेखी परीक्षेची तयारी कशी करायची या सगळ्या गोष्टींनी कट्टयावर बात रंगली होती.

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.