चराचरातील स्फूर्ती राम..

युवा विवेक    13-Apr-2024
Total Views |

चराचरातील स्फूर्ती राम..

रामराम मंडळी! तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप शुभेच्छा! गुढीपाडवा म्हणजे नव्या उत्साहाचा, नव्या कल्पनांचा उत्सव असतो. देवाची पूजा, पंचांगाचं पूजन, कडुलिंबाची चटणी, गगनाला स्पर्श करणारी गुढी, थोरामोठ्यांचे आशीर्वाद, एकमेकांना शुभेच्छा देणं, गोड पदार्थाचा आस्वाद घेणं असा तो मंगलमय दिवस असतो. श्लोक आणि स्तोत्रांचं पठण तर अविरत सुरुच असतं. गुढीपाडवा हा नववर्षाचा पहिला सण असतो. त्यानंतरचा सण म्हणजे श्रीरामनवमी. प्रभू श्रीरामांच्या भक्तीत न्हाण्याचा तो दिवस असतो. गुढीपाडव्यापासूनच अनेक ठिकाणी रामरक्षा स्तोत्राचं, मारुतीस्तोत्राचं रामनवमीपर्यंत रोज पठण होतं. सा-या विश्वातच रामनामाचं एक विलक्षण पावित्र्य जाणवतं. रामाचं अस्तित्वच किती विलक्षण आहे.

राम हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. पोटातल्या बाळाची चाहूल लागताच आई सुखावते. तिला आपला बाळ प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांसारखा असावा असंच वाटत असतं. श्रीराम योद्धा होताच. पण तोही माता कौसल्येचा पुत्रच… त्यामुळे निरागसता त्याच्या ठायी असणारच. हीच निरागसता प्रत्येक बाळाच्या अंगी असते. आपण आराम, विराम हे शब्द म्हणतो त्यातही राम आहेच. आराम आणि विराम शब्दांत '' आणि 'वि' हे धातू राम शब्दाशी जोडल्यावर त्यांना एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. आपल्या जीवनालाही अर्थ प्राप्त होतो तो रामामुळेच! जगण्यात आता राम राहिला नाही, असं काहीवेळा आपण म्हणतो. त्यातल्या राम या शब्दाचा अर्थ अर्थअसा आहे. म्हणजेच जीवनाचा अर्थ प्रत्यक्ष रामच आहे. राम नसेल त्या जगण्याला अर्थ नाही. आपण जगत आहोत याचाच अर्थ राम आहे. समर्थ रामदास स्वामींनी सा-या आयुष्यात वाचला आणि वेचला फक्त श्रीराम. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक रचले. याचाच अर्थ मनात राम आहे. जो राम आपल्या भोवताली आहे तोच राम आपल्या मनातही आहे. त्यामुळे शरीराचं बरचसं नियंत्रण मनातून होतं. म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटलं असावं, "प्रभातें मनी राम चिंतित जावा…" सकाळी जाग आल्यावर प्रथम मनातल्या रामाला आपण वंदन केलं तरच त्या दिवसाला अर्थ प्राप्त होणार आहे. तुलसीदास लिहितात, "श्रीरामचन्द्र कृपालु भजुमन हरण भवभय दारुणं।" जगण्याची आणि मरणाची भीती नाहीशी करणारं जर कुणी असेल तर ते प्रभू श्रीराम आहेत, असंच तुलसीदासांना यात म्हणायचं आहे. कारण, जगणं आणि मरण हे श्रीरामांनीच निर्माण केलेलं आहे. आपण कुणी माणूस गेल्यावर त्याचं शव वैकुंठाला नेताना देखील 'श्रीराम जयराम जय जय राम' असंच म्हणतो.

जन्म आणि मृत्यू यापलीकडेही एक राम आहे. राम माणसात, प्राण्यांमधे, सजीव-निर्जीवात आणि पंचमहाभूतांतही आहे. रामाची श्रीराम, राघव, रघुनंदन, सीतापति अशी असंख्य नावे आहेत. म्हणूनच, राम चराचरात आहे. बियाणे, त्याला फुटणारा निरागस अंकुर, त्याचं तयार होणारं इवलंसं रोपटं, रोपट्याचं होणारं झाड, झाडाला किंवा वेलीला येणारी फुले आणि फळे या सा-यात राम सामावलेला आहे. इतकंच काय तर त्या फळांच्या गोडव्यात नि फुलांच्या गंधातही राम आहे. म्हणूनच तर आपण त्या गंधाला सुगंध म्हणतो. साहित्य, संगीत, कला या सा-यांतही रामच आहे. शब्द, सूर, ताल आणि लय यांच्या मिलापातून तयार होणारा स्वर म्हणजे राम आहे. कलेला वर देणाराही रामच आहे. रामाचं वर्णन पुरुषोत्तम असं करण्यात आलेलं आहे. पण हा पुरुषोत्तम पत्नीपरायणही आहे. त्यामुळे ज्याला पुरुष व्हायचं आहे त्यानी आपल्या पत्नीशी एकनिष्ठ असायला हवं. तरच त्या पुरुषोत्तमाची उपासना आपल्याला करता येईल. शक्तीची देवता म्हणजे मारुती. स्वतःच्या अंगी इतकं बळ असूनही ज्या मारुतीला आपल्या ह्रदयी श्रीरामांचा वास असावासा वाटला तो राम किती श्रेष्ठ आहे याची कल्पनाही आपण करु शकत नाही.

रामरक्षा स्तोत्रात रामाचं सुरेख वर्णन केलेलं आहे. रामरक्षेस सुरुवात करताना आपण जेव्हा ध्यायेदाजानुबाहुं... पासून इति ध्यानम् पर्यंत जे ध्यान वाचतो किंवा म्हणतो ते वर्णन अगदी तंतोतंत आहे. गीतरामायणात गदिमांनी आपल्या शब्दांनी तर, बाबूजींनी आपल्या सूरांनी रामाला जणू अभिषेक घातला आहे. काही काही शब्द तर मनाला फार भावतात. माझ्या शाळेत धनुर्धारी रामाचं त्यावेळच्या मानाने प्रशस्त बांधलेलं देऊळ आहे. पुणे विद्यार्थी गृहात जवळजवळ रोजच मला त्या सुरेख मूर्तींचं म्हणजे जणू प्रत्यक्ष रामाचंच दर्शन झालेलं आहे. मनात वसलेली ती रामाची मूर्ती आठवली की मन सुखावतं. मी लिहितोय नि तुम्ही वाचताय ही आपली भेट घडविणारा रामच आहे. ती भेट कायमच त्याच्या कृपेने घडत राहणारच आहे. ज्यांना दु:खं न भोगता रामाकडे केवळ सुख मागायचं आहे त्यांनी प्रत्यक्ष देव असूनही राम आणि सीतेने साहलेला विरह आठवावा म्हणजे मग दु:खाची तीव्रता निश्चितच कमी होईल. राम हा सुखदायकच आहे, जगण्याचा आनंद नि स्फूर्ती देणारा रामच आहे. म्हणूनच, चराचरातील स्फूर्ती राम.

-
गौरव भिडे