मावडी..! भाग- ६

युवा विवेक    17-Apr-2024
Total Views |


कागद  

गावच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलेल्या स्मारकाच्या पारावर गप्पा रंगल्या होत्या. ठीक ठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. आज गावच्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पोरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अन् सगळे आता आनंदात उद्यापासूनचे अभ्यासाचे अन् मैदानी चाचणीसाठी तयारी करण्याचे नियोजन करायचे म्हणून पारावर गप्पा हाणत बसले होते.

हळूहळू शेकारलेल्या शेकोट्या शांत शांत होत होत्या अन् पारावर असलेल्या माणसांची गर्दी ओसरू लागली होती. गाव शांत चिडीचूप झोपी गेलं होतं. गावच्या तरुण पोरांना आज रात्रभर झोप येणार नव्हती. उद्या पहाटेच भवानी आईच्या डोंगरावर सगळ्यांनी धावण्याचा सराव करायचं ठरलं होतं. कुणी मांगखेडा रस्त्याने गावच्या फाट्यावर धावायला जाणार होतं.

झुंजूमंजु झालं. पहाट जशी झाली, तसं कोंबड्याच्या बांगेसरशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पोरं हळूहळू जमा झाली. गावातली भरतीचे वेड असणारी सगळी दहा-वीस पोरं जमा होऊन कुणी डोंगराला तर कुणी मांगखेडा रस्त्याने धावू लागले होते. मांगखेडा गावाला छावणीचे स्वरूप आले होते, रस्त्यानं धावणाऱ्या पोरांच्या पायातील बुटांचा आवाज घोड्याच्या टापांचा आवाज असावा तसा येत होता.

या सगळ्या पोरांच्यात प्रवीणही आपलं नशीब अजमावत होता. गावातील सगळ्या गावकऱ्यांना त्याच्या मेहनतीचं अप्रूप वाटत होतं. यंदाच्या वर्षी प्रवीण पोलीस भरती होऊन जावं असं गावातल्या लोकांना वाटत होतं; तसं मावडी अन् तिच्या मायलासुद्धा वाटत होतं. कारण यावर्षी जर प्रवीण या पोलिस भरतीत लागला तर खऱ्या अर्थानं त्याच्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार होता. त्यासाठी तो उर फुटेसस्तोवर धावत होता.

त्याच्या या मेहनतीमध्ये मावडी अन् तिची आई कायम त्याच्या सोबत होती.

भरतीचा जी. आर. आला तसं प्रवीणला त्याची आई फार कामही सांगत नव्हती, अन् तो ही प्रामाणिकपणे तयारी करत होता. यावर्षी गावातील दोन-चार मुलं पोलीस दलात भरती होणार हे नक्की होतं. कारण त्यांनी जीवापाड केलेली मेहनत आणि अभ्यास यामुळे त्यांचं यश त्यांच्या मेहनती अडून दिसून येत होतं. दिवसांमागून दिवस जात होते, मांगखेडा गावची पोरं भरतीसाठी चांगली तयार झाली होती.

दिवसामागून दिवस जात होते अन् न व्हावी अशी ती एक पहाट प्रवीणच्या आयुष्यात झाली अन् होत्याचे नव्हते झाले. नेहमीप्रमाणे अस्ताला गेलेला सूर्य कोंबडीच्या बांगेसरशी उदयाला आला. अंधारात सूर्योदयाची चाहुल लागताच गावातली तरुण पोरं गावाच्या एका अंगाला असलेल्या महामार्गाला धावायला म्हणून लागली.

गावातली भरतीची ओढ असलेली पोरं यावर्षी पोलीस दलात भरती व्हायचं या आशेनं छाती फुटेस्तोवर धावत होती. उन्हाची तिरीपही त्यांच्याशी सलगी करत पोरांच्या संगतीने धावत होती. एक वळणावर प्रवीणचे नकळत चक्कर येऊन पाऊल अडखळले अन् तो खाली गाड्या वाहणाऱ्या बाजूला पडला अन् तितक्यात मागून येणाऱ्या गाडीने त्याला मागून धक्का दिला.

प्रवीण जागेवर पडला तेव्हा मुक्का मार लागल्याने त्याला ग्लानी आली. मुलांनी त्याची ही अवस्था बघून त्याला उचलून सरकारी दवाखान्यात आणलं. डॉक्टरानी चेक केल्यावर कळले एका पायाला खूप मोठी दुखापत झाली आहे अन् पुढील काही दिवसांत ऑपरेशन नाही केले तर प्रवीण कायमचा पायाने अधू होऊन जाईल. उपचारासाठी लागणारा खर्च प्रवीण अन् त्याच्या आईला झेपेल यापेक्षा खूप मोठा होता.

हे सगळं प्रवीणच्या आईला जेव्हा कळले तेव्हा नुकतीच दुखण्यातून उठलेली त्याची आई दातखिळी बसून धरणीला बसली. अन् मावडी तर बेभान होऊन फक्त आकाशाकडे टक्क बघत राहीली. प्रवीण वर हे अवेळी आलेलं संकट त्याच्या सर्व स्वप्नांचा अन् त्याच्या आई बहिणीसाठी त्याने बघितलेल्या उज्ज्वल भविष्याचा चुराडा करून टाकणारे होते.

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.