सिंगोडी

युवा विवेक    17-Apr-2024
Total Views |


singodi

उत्तराखंडमध्ये पूर्ण भारतभर मिळतात, तशाच मिठाया खाल्ल्या जातात; पण त्यांच्या काही स्पेशल मिठाया सुद्धा आहेत. आता सिंगोडी नाव ऐकल्यावर हे एखाद्या फळभाजीचे नाव वाटू शकते, पण तसे नाही. ही एक मिठाई आहे. उत्तराखंडमध्ये जे गोड पदार्थ प्रसिद्ध आहेत, त्यातील ही सिंगोडी. उत्तराखंडमधील अल्मोरामध्ये लाला जोगा साह यांचे १८६५ मध्ये सुरू झालेले लहानसे दुकान अजूनही लहानच आहे, पण त्यातील पदार्थांची चव मात्र आजही कायम आहे. जोगन लाल यांची चौथी पिढी आजही बाल मिठाई करून विकते. त्यांच्या दुकानाच्या वरचे घरही ३०० वर्षांहून जुने आहे. या दुकानात मिठाई करण्यासाठी साखरेच्या पाकात खवा परतला जातो. कोणतीही भेसळ नसलेला हा खवा आसपासच्या गावातून आणला जातो. मिश्रण थोडे घट्ट झाले की, विलायची पूड टाकून परतले जाते. खवा करताना एकदा आणि साखरेच्या पाकात परत एकदा शिजवला जातो. त्यानंतर मालूच्या पानात भरून तो सर्व्ह केला जातो.

अजून एक प्रकार आहे. सिंगोडी करण्यासाठी विड्याची पाने, खवा, ओले खोबरे, साखर, बदाम आणि वेलची हे साहित्य लागते. साखर कढईत दोन चमचे पाणी घालून वितळली की, त्यात खवा घालून परतावा. मिश्रण एकजीव झाले की; त्यात खोबरे, विलायची पूड एकत्र करून दोन मिनिटे परतून थंड करावे. जास्त दिवस टिकण्यासाठी खवा कुंदासारखा परतावा अथवा पारंपरिक सिंगोडी पांढरीच असते. मिश्रण थंड झाले की, विड्याच्या पानात भरले जाते. विड्याच्या पानाचा आइसस्क्रिमसारखा कोन करून टूथपिकने कोन जोडला जातो. विड्याचे पान नसेल तर केळीचे पानही चालते. या कोनमध्ये खव्याचे मिश्रण भरले की, त्यावर बदाम आणि सुकामेवा चिटकवला जातो. पानाचा छान मंद सुवास येण्यासाठी २-३ तास फ्रिजमध्ये ठेवावे लागते.

अल्मोरामध्ये हिरा सिंग आणि जीवन सिंग यांचे दुकानही प्रसिद्ध आहे. नैनितालपासून ६५ किलोमीटर दूर असलेल्या या शहरात लोक केवळ मिठाई खाण्यासाठी येतात, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशीच बरीच जुनी दुकाने तुम्हाला पूर्ण शहरभर सापडतील.

हिरव्यागार पानात बदामाचा टिळा लावलेली सिंगोडी अतिशय साधीभोळी दिसते. अगदी पहाडी लोकांसारखी. सिंगोडीची शेल्फ लाईफ कमी असल्याने जास्त दूर पाठवली जात नाही, पण फ्रोझन फॉर्ममध्ये पाठवता येऊ शकेल. यात वेगळे फ्लेवर्स मिसळले किंवा वेगवेगळी पाने वापरून नवीन टेस्ट मिळाली तर लोकांना आवडू शकेल. अर्थात पारंपरिक सिंगोडीची चव जशी आहे, तशीच लोकांना आवडेल यात शंका नाही. आता उत्तराखंडमध्ये सगळीकडे ही मिठाई मिळते, पण अल्मोराला गेलात किंबहुना नैनितालला गेलात; तर अल्मोराला जा आणि सिंगोडीचा आस्वाद नक्की घ्या.