स्त्री पुरुष समानता..

युवा विवेक    20-Apr-2024
Total Views |


स्त्री पुरुष समानता..

निसर्गात अनेक सजीव - निर्जीव सृष्टीची नाती युगानुयुगे आहेत. अगदी उदाहरण द्यायचं झालंच तर झाडाचं पाण्याशी, आभाळाचं पावसाशी, फूलाचं फुलपाखराशी नातं आहे. ही नाती जरी गरजेपोटी निर्माण झाली असली तरी ती कित्येक युगे टिकून आहेत. ही नाती टिकण्याचा मुख्य आधार गरज असला तरी ती नाती परस्परपूरक आहेत, एकमेकांचं वेगळेपण ते आनंदाने स्वीकारतात. स्वीकार आणि सहकार्याच्या भावनेतून ती नाती घट्ट बांधली जातात. स्त्री आणि पुरुष हे दोन निसर्गाचेच घटक आहेत. स्वाभाविकच त्यांच्यात नाते निर्माण होते. ही नाती परस्परपूरक असल्यामुळेच टिकतात. त्यांच्यात काही बाबतीत सारखेपण असेलही; पण खरंतर नाती निर्माण होतात तीच मुळी एकमेकांच्या वेगळेपणातून! कुणीतरी कुणासाठी असतं... गरजेव्यतिरिक्तही माणसाला कुणीतरी जवळ असावंसं वाटतं. आपल्याहून वेगळ्या असलेल्या व्यक्तीला मनातलं काहीतरी सांगावंसं वाटतं. समुद्रकिनारी एखाद्या संध्याकाळी आपण एकटेच बसलेलो असतो. पण लाटांचा तो विशिष्ट लयीचा आवाज, वा-यासवे डोलणारी नारळाची झाडं, दूर कुठेतरी दिसणारा डोंगर, त्यामागे हळूहळू लपत जाणारा सूर्य या सगळ्या वातावरणात आपलं एकटेपण नाहीसं होतं. शरीराबरोबर मनालाही उत्साह जाणवतो. खरंतर समुद्राला तुमच्या-माझ्यासारखे हात, पाय, डोळे नाहीत. तो आपल्यापेक्षा अगदी वेगळा आहे. पण त्याच्या सहवासात आपल्याला त्याचं आणि आपलं सारखेपण कधी शोधावंसं वाटत नाही. वेगळेपणही जाणवत नाही. कारण त्याच्याशी आपला सहवास अगदी मनापासून घडून येतो.


स्त्री पुरुष समानतेची गरज गेल्या १५ - २० वर्षात अधिकच वाढली आहे. समानता हा गुण आहे आणि तो आपण स्वीकारला तर समाजाचे आणि पर्यायाने स्वतःचेही कल्याण होते. प्राचीन काळी स्त्रियांचे बरेचसे आयुष्य चूल, आपत्याचे पालनपोषण, वडीलधारी माणसे आणि नव-याची मर्जी सांभाळणे इतकेच होते. काळानुरुप त्यात सुधारणा होत गेल्या. कित्येक विचारवंत आणि सुधारकांनी स्त्रियांना समाजात मानाचं स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातील बरेचसे प्रयत्न सकारात्मक ठरले. सुरुवातीला स्त्रिया शाळेत जाऊ लागल्या, पुढे महाविद्यालयात शिकू लागल्या. नोकरी-व्यवसायाच्या वाटा त्यांना सापडल्या. पण समाजात जशा चांगल्या प्रवृत्ती असतात तशा वाईट प्रवृत्तीही असतात. त्यातील वाईट प्रवृत्तींनी स्त्री-भ्रूण हत्या, हुंडाबळी, अत्याचार अशा अनेक अर्थहीन व गैरमार्गाने विरोध दर्शवला. पण स्त्रिया हरल्या नाहीत. त्यांनी आपला प्रवास पुढे सुरुच ठेवला. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने करावा लागणारा प्रवास यातून स्त्रियांसाठी वेगळे शौचालय, बस व रेल्वेमधे आसनव्यवस्था यासारख्या मागण्या पुढे आल्या. सरकारी आणि राजकीय क्षेत्रात महिलांना आरक्षण देण्यात आले. नाना त-हेचे मार्ग अवलंबून स्त्रियांना समाजात समान संधी उपलब्ध करुन देण्यात आली आणि अजूनही कित्येक संधी उपलब्ध होत आहेत. स्त्री पुरुष समानतेच्या मार्गांचे, घडून आलेल्या बदलांचे आणि समानतेचे आपण स्वागतच केले पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात समानता हा शब्द 'बरोबरी' या शब्दाकडे वळत असल्याचे जाणवते. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने पुरुषाप्रमाणे पुढे गेलेच पाहिजे, तुल्यबळ असलेच पाहिजे तरच समानता म्हणता येईल, अशी काही मते पुढे येताना दिसतात.


स्त्री सुधारक आणि एकूणच सर्व सुधारक, विचारवंत मंडळींनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तीन जगण्याची तत्वे सर्वसाधारणपणे सांगितली आहेत. पण अलीकडच्या काळात बरोबरी, तुल्यबळ आणि स्पर्धा ही तीन तत्वे स्त्री पुरुष समानतेच्या विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींनी स्वीकारल्याचे जाणवते. त्याचा परिणाम म्हणजे पुरुष वागेल तसं स्त्रीने वागलं पाहिजे असं ब-याच मंडळींचं हल्ली म्हणणं आहे. स्त्री सिगारेट ओढते तेव्हा तिची बाजू मांडण्यासाठी "पुरुष नाही का सिगारेट ओढत!" किंवा पूर्वी पुरुष घटस्फोट घेत. आता स्त्रिया घेतात. याचेही समर्थन करताना अनेक स्त्रीवादी संघटना म्हणतात, " पूर्वी पुरुष जसे वागले त्या अपराधाची ही फळे आहेत." इत्यादी अनेक वक्तव्ये केली जातात. पण व्यसनाधिनता, घटस्फोट घेणं किंवा नातं तोडणं ही गोष्ट मुळातच स्त्री किंवा पुरुष कोणीही केली तरी ती वाईटच आहे. त्यामुळे तुलना करीत बसण्यापेक्षा हेतू आणि कृती लक्षात घेतली तरच ते थांबणार आहे. आज काही घरांत स्त्रिया स्वयंपाक करतात, तर काही घरांत पुरुष स्वयंपाक करतात. स्वयंपाक कोणी करावा ही त्या घराने आपल्या कुटुंबापुरती केलेली 'ॲडजस्टमेंट' असते. ही 'ॲडजस्टमेंट' समाज स्वीकारायला शिकला तरी आंदोलनांची फारशी आवश्यकता नाही. मुद्दे अनेक असतात पण सद्सद्विवेकबुद्धीचा उपयोग केला म्हणजे प्रश्नांचे निरसन निश्चितच होते.


वैभव जोशींनी लिहिलेल्या 'आनंदघन' या गीतात, " तुझियामुळे मी सार्थता, तुजवाचूनि मी आर्तता.." ही ओळ आहे. ही सार्थता आणि आर्तता आपल्याला जाणता आली म्हणजे आपल्याला पुरुषाचा आणि स्त्रीचा व्यक्ती म्हणून सारखेपणाने स्वीकार करता येईल...


- गौरव भिडे