पडद्यामागील कलाकार..

युवा विवेक    27-Apr-2024
Total Views |


पडद्यामागील कलाकार..

नाटक हा मराठी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. नाटकाला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. पण असं असलं तरी प्रत्येक नाटक, अभिनेता, नाटककार अगदी इतकंच नाही, तर नाट्यगृह आणि प्रेक्षकांनीदेखील आपलं एक स्वतंत्र अस्तित्व नाटकात निर्माण केलं. पूर्वीची अनेक नाटके आज पुनर्जिवित होत आहेत ती नाटकवेड्या कलाकार आणि नाटकवेड्या प्रेक्षकांमुळेच! सिनेमा युगानंतर नाटकाच्या एकंदरीतच प्रवासात काहीशी पोकळी निर्माण झाली. पण साठ - सत्तरच्या दशकात ती पोकळी नाटककारांनी विविध विषयांना स्पर्श करत हळूहळू भरुन काढली. नाटककारानी नाटक लिहिल्यापासून प्रत्यक्ष रंगमंचावर येईपर्यंत नाटकाचा प्रवास म्हणजे अनेकविध अनुभवांचं गाठोडं असतं. प्रत्येक प्रयोगात पडदा उघडल्यानंतरचा पहिला क्षण विलक्षण असतो. तो क्षण विलक्षण होण्यामागे अनेक हात झटत असतात.. हेच हात प्रत्येक प्रेक्षक अदृश्यपणे टाळी वाजवताना आपल्या हातात घेत असतो आणि त्या दोन्ही हातांचा अदृश्य स्पर्श म्हणजे, ' शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे ' असाच असतो.

तो क्षण विलक्षण होण्यामागे झटणारे हात पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांचे असतात. हे कलाकार आपले हात एकमेकांच्या हातात गुंफतात तेव्हा नाटक नावाची सुरेख कला रंगमंचावर दिमाखात वावरते. अभिनेता म्हणून नाट्यगृहात प्रवेश केलेल्या माणसाला रंगमंचावर वेगळी ओळख देण्यापर्यंतचा वाटा पडद्यामागच्या कलाकारांचा असतो. ही ओळख देणारे कलाकार मात्र अनोळखी असतात. अर्थात, अनोळखी असण्याविषयी त्यांच्या मनात दु:ख नसतं. ते आपलं काम नित्यनेमाने करतच असतात. मेकअप करणा-या आर्टिस्टला अभिनेत्याचा मेकअप करणे इतकंच काम नसतं. भूमिकेची थोडी माहिती, अभिनेत्याचा रंगमंचावरील वावर वगैरे गोष्टींचा त्याला बारकाईने विचार करावा लागतो. संगीत नाटक असेल तर संगीतकाराकडे मोठी जबाबदारी असते. वाद्यवृंदांची, अभिनेत्याची तालीम घेत असताना बारीक-सारीक गोष्टी त्याला टिपाव्या लागतात. प्रकाशव्यवस्थेकडे तर मोठीच जबाबदारी असते. रंगमंचाचा एकूण आकार, नाटकातील पात्रांच्या उभं राहण्याच्या जागा, प्रॉपर्टीपासून नट आणि विंगेपर्यंतचे अंतर अशा अनेक गोष्टींचा अभ्यास आधीच करावा लागतो. प्रॉपर्टी लावणा-या लोकांना तर रंगमंच, प्रेक्षकांपासून रंगमंचाचे अंतर, अभिनेत्याचा उभं राहण्याच्या जागा याचा अगदी बारकाईने विचार करावा लागतो. रंगमंचावरचं एखादं झाड, टेबल-खुर्ची किंवा अगदी मागे लावलेलं चित्रही नाटकाला अधिक बोलकं करतं. पडदा उघडणे आणि पडदा पुन्हा लावणे याचं विशिष्ट तंत्र, त्याचा वेग आणि पूर्ण रंगमंच खुला करणे याचं गणित जुळावं लागतं. यातल्या ब-याचशा कामांमधे अधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत नवनवी यंत्रे येत आहेत. परंतु, यंत्रे निर्जीव असल्यामुळे त्यांना मार्ग दाखवायला माणसाचीच आवश्यकता असते. नाटक म्हणजे एक जिवंत देखावा असतो. तो देखावा साकारण्यासाठी नाट्यगृहातील प्रत्येक व्यक्ती नुसती शरीराने नव्हे तर मनानेही जिवंत असली पाहिजे.

नाटकाची बस ही एक वेगळीच दुनिया असते. चालक हा या बसचा मुख्य कलाकार असतो. प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या असतात. प्रॉपर्टीचं सामान, अभिनेते-अभिनेत्री आणि प्रयोगासाठी लागणारा भरपूर उत्साह इतकं भरुन ही बस रस्त्यारस्त्यांवरुन धावत असते. ही बस नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारातून आत येताच 'सेट लावणे' हा प्रवास सुरू होतो. या दुनियेतला एक पडद्यामागचा कलाकार म्हणजे प्राॅम्पटर! विसरलेले शब्द हीच व्यक्ती कलाकाराला देऊ करते. चहा, नाष्टा, जेवण वगैरे व्यवस्था पाहणारे केटरींगवाले वर्षानुवर्षे सेवा पुरवत असतात. पडद्यामागच्या कलाकारात रंगमंचाची साफसफाई, नाट्यगृहाची साफसफाई करणारेही असतात. याशिवाय निर्माता आणि दिग्दर्शक हे पडद्यामागचे दोन खांबच असतात. प्रयोग सुरू असताना तंत्रज्ञांचं महत्वाचं काम असतं. आणखी एक व्यक्ती म्हणजे मध्यांतरातील चहा आणि बटाटेवडा विक्रेता! तो अगदी पडद्यामागचा कलाकार नसला तरी नाट्यरसिकांची भूक आणि बटाटेवडा खाण्याची बरीचशी हौस भागवण्याची जबाबदारी या माणसाकडे असते. पडद्यामागील कलाकार आपल्या कामात सदैव तत्पर असतात. प्रत्येक नाटकाला ' प्रयोग ' म्हटलं जातं. कारण प्रत्येक प्रयोगात येणारे अनुभव थोड्याफार फरकाने सारखे असले तरी त्यात थोडंसं वेगळेपण असतं. या वेगवेगळ्या प्रयोगातून शिकायला मिळतं. यातूनच हे सारे पडद्यामागचे कलाकार घडत असतात.

आपल्या आयुष्यात देखील हे पडद्यामागचे कलाकार असतात. सर्वसाधारणपणे वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत आपले आई-वडील हे पडद्यामागचे कलाकार असतात. ते आपलं काम अतिशय जाणीवपूर्वक आणि मनापासून करतात म्हणूनच आपण आयुष्याच्या रंगमंचावर अविरतपणे वेगवेगळ्या भूमिका साकारात असतो. त्यातील काही भूमिका यशस्वी होतात. पण त्याचा वाटा आपण आई-वडीलांना बरेचदा देऊ करत नाही. तिथे आपला अहंकार आड येतो. नाटकातील काही नटांचं असंच होतं. त्यांची भूमिका कितीही उत्तम झालेली असली तरी त्यामागे थोड्याफार प्रमाणात पडद्यामागच्या कलाकारांचाही वाटा असतो. पण यशाच्या उंच शिखरावर पोचलो म्हणजे शिखर चढण्यासाठी मदत केलेल्या हातांचा विसर पडतो, त्याप्रमाणे पडद्यामागील कलाकारांचा काहीवेळा विसर पडतो. पडद्यामागील कलाकार आहेत म्हणून रंगमंचावर यशस्वीपणे काम करता येतं आणि रंगमंचावर काम करणारे कलाकार आहेत म्हणून पडद्यामागील कलाकारांना काम मिळतं. त्यामुळे दोन्ही कलाकारांनी एकमेकांना मनापासून स्वीकारलं तर प्रेक्षक पुन्हा पुन्हा नाटकाला येतील आणि कित्येक प्रयोग यशस्वी होतील.

-
गौरव भिडे .