परिचित - अपरिचित

युवा विवेक    05-Apr-2024
Total Views |

 
परिचित - अपरिचित

माणसाची माणसाशी ओळख होणे, हे समाजाच्या दृष्टीने सकारात्मक असते. आपल्या भोवताली असलेल्या प्रत्येक माणसाशी आपली ओळख व्हायलाच हवी असे काही नसले तरी अगदीच अनोळखी राहण्यातही फार अर्थ नाही. पण ओळख केवळ नावाला किंवा स्वार्थासाठी नसावी. अनेकदा आपण ज्या परिसरात राहतो तिथल्या ब-याचशा माणसांची आज ना उद्या गरज लागेल या हेतूनेच ओळखी झालेल्या असतात. तरीही ओळख करून घेताना मनात कोणताही हेतू नसावा. मोकळ्या मनाने झालेल्या ओळखीच्या रोपट्याचं मनात छानसं झाड होतं.. हे ओळखीचं झाडच हक्काची सावली देतं. बाकी झाडं फक्त ऑक्सिजनपुरतीच! हे झालं एकमेकांशी एकमेकांची ओळख होण्याविषयी... पण ज्यांच्याशी ओळख असते त्या ओळखीला काहीवेळा नावापुरती ओळख आहे असं म्हणावं लागतं. दोन शब्द बोलणे किंवा स्मितहास्य करत केवळ हात उंचावून दाखवण्यापुरत्याच काही ओळखी असतात. एका अर्थाने त्या परिचयाला अपरिचितच म्हणावे लागेल..

सगळ्यांना सगळ्या ओळखीच्या माणसांचं सगळं आयुष्य माहित असावं असा काही नियम नाही. किंबहुना, अनोळखीपणाच्या आधारावरच बरीचशी नाती टिकून असतात. गुण आणि अवगुण दोन्ही सारखेपणाने स्वीकारुन ज्या ओळखी टिकतील त्यांना 'हे आमचे स्नेही' असं म्हणण्यास हरकत नाही. नातं ओळखीचं असो किंवा रक्ताचं असो, पण सहवास हे त्या नात्याचं आभाळ असतं. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत नसलो तरी सहवासाच्या माध्यमातून अनेक गोष्टींची आपल्याला जाणीव आणि माहिती होते . एखादी गोष्ट कळल्यावर आपल्याला जाणवतं आणि आपण म्हणतो, म्हणजे इतके दिवस ओळख असूनही ही व्यक्ती आपल्याला अपरिचित होती! या जाणीवेतूनच एकमेकांना जाणून घेण्याची ओढ वाढते. सहवास आपोआपच वाढत जातो. यामुळे वैचारिक देवाण-घेवाण होऊन नवे विचार स्फुरतात. कल्पनांची कळी उमलते. त्यातून नव्या उपक्रमांचं, संकल्पनांचं फूल उमलतं आणि या फुलाचा सुगंध भोवतालच्या समाजाला आनंद देतो. त्यामुळेच वर म्हटल्याप्रमाणे ओळख ही समाजाच्या दृष्टीने सकारात्मक असते. समजा, ज्ञानार्जन हे दोन व्यक्तीतील समान ध्येय असेल तर ते पूर्ण करण्यासाठी त्या दोन व्यक्ती एकत्रितपणे अभ्यास करतात. ज्ञानविषयक नवे उपक्रम हाती घेतात. यामुळे समाजातील आणखी चार लोक नदी सागराला येऊन मिळावी तसे त्यांना येऊन मिळतात. दु:ख हा समान धागा असेल तर नाती आणखी घट्ट झालेली पहायला मिळतात. परिचयातील व्यक्तींमधील अशा अपरिचित चांदण्या शोधून त्यांच्या प्रकाशात आपण न्हायला हवं.


माणसं परिचित असूनही अपरिचित असतातच. पण बरेचदा आपण स्वतःलाही अपरिचित असतो. एखाद्या क्षणी, एखाद्या प्रसंगात आपण कसे वागू याचं आपण ठोस उत्तर देऊ शकत नाही. आपण त्या प्रसंगाचे फक्त मनोरे रचत असतो. पण प्रत्यक्ष प्रसंग सुरु असताना तिथल्या वातावरणाचा मनावर प्रभाव पडतो. त्या प्रभावातूनच एखादी अपरिचित कृती आपल्या हातून घडते. तेव्हा आपल्याला स्वतःचीच नव्याने ओळख होते. हल्लीचं युग आर्थिक बाबींशीच अधिक जोडलं गेलं आहे. त्याचा तुमच्या-माझ्या मनावर प्रभाव पडला आहे. आपल्यापैकी ब-याच जणांना स्वतःकडे किती पैसा आहे, संपत्ती किती आहे; याची तपशीलवार माहिती असते. काहींना तर ती अगदी तोंडपाठ असते. पण बरेचदा स्वतःच्या क्षमतांची ओळखही आपल्याला नसते. एखाद्या प्रसंगात त्यांची आपल्याशी ओळख होते. स्वतःच स्वतःला अपरिचित असण्याचं कारण म्हणजे आपण स्वतःला वेळ देत नाही. अगदी आरशातलं प्रतिबिंब सुद्धा घाईच्या वेळी आपण फक्त भांग पाडण्यापुरतंच कसंबसं पाहतो. या अपरिचित स्वतःसाठी आपण स्वतःला वेळ द्यायला हवा. मोकळ्या नजरेने स्वतःकडे अंतर्बाह्य पाहिलं म्हणजे आपण स्वतःला किती अपरिचित आहोत, हे आपलं आपल्यालाच कळेल.


परिचितांच्या अपरिचित गोष्टी काही वेळा गमतीशीर, काही वेळा कलात्मक, तर काही वेळा नवं काही देणा-या असतात. सोसायटीत विक्षिप्त वाटणारा एखादा मुलगा किंवा मुलगी सोसायटीच्या एखाद्या कार्यक्रमात सुंदर रांगोळी काढताना बघितल्यावर वाटतं, आपण या व्यक्तीला उगाचच विक्षिप्त समजत होतो. किंवा एरवी शांतपणे सर्व व्यवहार करणारा माणूस एखाद्या दिवशी हातात काठी घेऊन ती काठी कुणावर तरी उगारतो, तेव्हा आपल्याला नवल वाटतं. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला अपरिचित असतात. कदाचित, त्यामुळेच आपले त्या व्यक्तीशी नाते किंवा बरे संबंध टिकून असतात. नातं बरंचसं परिचित आणि अपरिचित या दोन संकल्पनांवर आधारित असतं. परिचित आणि अपरिचितामुळेच सहवासाला अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच सहवासात समोरच्या व्यक्तीची संपत्ती, आर्थिक स्थिती, अंगावरचे भरजरी कपडे इत्यादी जाणून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. अर्थात, प्रत्येकच अपरिचित गोष्ट आपल्याला जाणून घेता येईलच असं नाही. पण निदान स्वतःमधलं अपरिचित शोधण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करायला हवा. आपण स्वतःला ओळखू शकलो तरच जगातलं आपल्याला काय परिचयाचं आहे, काय अपरिचित आहे, ते जाणता येईल.


- गौरव भिडे