नाममहिमा

युवा विवेक    21-May-2024
Total Views |


नाममहिमा

वारकरी संप्रदायातील सर्वच संतांनी नामस्मरण भक्ती सांगितली आहे. ज्ञानोबांच्या ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा। पुण्याची गणना कोन करी।।’ पासून निळोबांच्या ‘हरीच्या भजनी हरीचे भक्त। झाले विख्यात भुमंडळी ।।’ पर्यंत सर्व संतांच्या अंभगांत नाम भक्तीचा महिमा आणि फलश्रुतीचे वर्णन आहे.

नामभक्तीचं माहात्म्य वर्णन करताना तुकोबा म्हणतात -

नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पाये जन्मांतरीची ॥१॥

न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण ॥२॥

ठायींच बैसोनी करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥३॥

राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्व काळ ॥४॥

याविण आणिक असता साधन । वाहातसे आण विठोबाची ॥५॥

तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी। साहाणा तो धणी होती येथे ॥६॥

नामाचं संकीर्तन हे फार सोपं आहे, त्यात काही प्रश्न नाहीच; पण त्याने जन्मांतरीची पापे जळतात, हे त्याचे  माहात्म्य! 'वाल्याचा वाल्मिकी झाला ही कथा आपल्याला माहीत आहे. निळोबारायांच्या उपरोक्त चरणांनुसार महर्षि नारद जेव्हा वाल्या कोळ्याला नामभक्तीचा मार्ग दाखवतात आणि तोही झालेल्या उपदेशाने प्रवृत्त होऊन 'राम' नामभक्ती करतो. त्याचे फळ काय तर साक्षात श्री विष्णूचा अवतार असणारे श्रीराम यांच्या जीवन चरित्राचे लिखाण करण्याचे सौभाग्य वाल्या कोळी म्हणजेच महर्षी वाल्मिकी यांना प्राप्त झाले. जगातील पहिलं महाकाव्य ज्याला आपण 'वामिकी रामायण' म्हणून ओळखतो आणि ज्यामुळे महर्षी वाल्मिकी आजही जनमानसांत विख्यात आहेत हा नामभक्तीचाच महिमा! आणि याच कारणाने माऊली म्हणाले आहेत, 'पुण्याची गणना कोण करी ॥'

पुढे तुकोबा म्हणतात फार सायस करण्याची, वनात जायची गरज नाही. फक्त नामस्मरण करा. त्याने 'सुखे येतो धरा नारायण।' मग कोणाच्या घरी आलेत देव? तर भक्तराज 'प्रल्हाद' यांची नामभत्ती आठवावी.

तुका म्हणे कैसा खांब कडाडला ।

ब्रह्मा दचकला सत्यलोकी ।। (३०९५ तु.गा.)

प्रल्हादाकारणे नरसिंह जालाती।

त्याचिया बोलासी सत्य केले ॥ (२०९१ सुगा.)

नामभक्तीने देव भक्ताच्या घरी आले. एवढंच नाही तर 'त्याचि बोला सत्य केले’ भक्तांचा शब्द पाळण्याचं काम देव करत असतो.

नामभक्तीसाठी अन्य साधनांची गरज नाही. पाहिजे तर काय? आहे त्या स्थितीत एकचित्त होऊन सवडीने नाही तर आवडीने देवाला आळवावे. आर्त हाक द्यावी. सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला । नाम आठविंता रुपी प्रकट पै झाला ॥ (संत ज्ञानेश्वर)

पुढे तुकोबांनी 'राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा' हा मंत्र सर्वकाळ जपण्याचा उपदेश केला आहे. राम म्हणजेच श्री विष्णूचा ७ वा आणि कृष्ण म्हणजे ८ वा अवतार. कृष्ण म्हणजेच विठ्ठल, केशव. ही पाचही नावे एकाच तत्त्वाची आहेत. तरीही प्रत्येक नामाचा महिमा सांगितला आहेच:

राम म्हणता वार चाली । यज्ञ पाऊला पाऊली ।। (संत तुकाराम)

कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम । एक हरिनाम जपता घडे ॥ (संत एकनाथ)

हरि भजनी हे ठवळीकाले जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥ (संत तुकाराम)

संत साहित्यात असे असंख्य प्रमाण आपल्याला मिळतील.

चौथ्याच चरणात तुकोबा म्हणतात, 'या पेक्षा दुसरं सोपं साधन नाहीच आणि हे मी विठोबाची आण घेऊन सांगतो.'

नवविधा भक्तीचा विचार केल्यास नाम म्हणजेचं संकिर्तन भक्ती ही अन्य भक्तीच्या तुलनेत लभ्य/सोपी आहे, कारण या भक्तीचे एकमेव साधन नाम हे सुलभ आहे.

ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । (संत झानेश्वर)

शेवटी तुकोबा म्हणतात 'जो शहाणा आहे तोच या मार्गाने येणार.' आजच्या काळात आपणही 'हार्ड वर्क' पेक्षा 'स्मार्टवर्क'लाच प्राधान्य देतो. त्यामुळे जो शहाणा आहे, आपल्या हितासाठी जागृत आहे तो नामस्मरण करणारच.

अमन चौधरी