“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः”
आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला देवापेक्षाही वरचे स्थान दिले आहे. कारण गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारा शिक्षक नसतो, तर तो जीवनाला योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक असतो. माझ्या जीवनात मला लाभलेले गुरु म्हणजेच माझ्या यशाचे खरे शिल्पकार आहेत. आई-वडील आपल्याला जन्म देतात, पण गुरू आपल्याला व्यक्तिमत्त्व देतात. ते अंधःकारातल्या माणसाला प्रकाश दाखवतात. गुरुंचे ज्ञान म्हणजे दीपस्तंभासारखे आहे, जे जीवनाच्या खडतर प्रवासात आपल्याला सुरक्षित ठेवते. शाळेतले शिक्षक, म महाविद्यालयीन प्राध्यापक किंवा आयुष्यात भेटलेले मार्गदर्शक असोत प्रत्येकाने आपल्याला काही ना काही दिलेले असते. माझ्या शालेय जीवनातले शिक्षक माझ्यासाठी खरे प्रेरणास्थान होते. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर प्रामाणिकपणा, शिस्त, कष्टाची तयारी आणि आत्मविश्वास हे जीवनमूल्ये शिकवली. कठीण प्रसंगात साथ देणारा हात, शंका विचारली की शांतपणे समजावून सांगणारा आवाज हे सगळं आजही माझ्या स्मरणात जिवंत आहे.
कधी कधी गुरू एखाद्या पुस्तकाच्या रूपाने, एखाद्या वाक्याच्या रूपाने किंवा अनुभवाच्या रूपानेही भेटतात. अशा प्रत्येक गुरूकडून काहीतरी शिकायला मिळाले आहे. गुरूंचे एक वाक्य, एक कृती कधी कधी आयुष्य बदलून टाकते. माझ्या गुरूंनी मला शिकवले “ज्ञान हे केवळ गुण मिळवण्यासाठी नसते, तर ते समाजासाठी वापरले पाहिजे.” हे वाक्य माझ्यासाठी मंत्र ठरले. त्यांनीच मला आत्मविश्वास दिला की, “तू प्रयत्नशील राहिलास, तर यश तुझ्या पावलाशी जोडले जाईल.” गुरूंचे ऋण कधी फेडता येत नाही. म्हणूनच आपण गुरूपौर्णिमा साजरी करतो, पण खरी गुरुदक्षिणा म्हणजे त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगणे. गुरू हे आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहेत ते मातीला आकार देतात, त्यात सौंदर्य घडवतात आणि तिला ओळख देतात. माझ्या जीवनातले गुरू माझ्यासाठी प्रकाशपुंज आहेत. त्यांनी दिलेले ज्ञान, संस्कार आणि मूल्ये हीच माझी खरी संपत्ती आहे.
गुरुप्रसाद सुरवसे