‘वंशवृक्ष’

युवा विवेक    24-Oct-2025
Total Views |

‘वंशवृक्ष’
माझ्या वाचनप्रवासात ‘वंशवृक्ष’ ही एस. एल. भैरप्पा यांची पहिली कादंबरी होती. कन्नड भाषेतून उमाकुलकर्णी यांनी केलेले मराठी भाषांतर हातात घेतल्यावर एक वेगळाच अनुभव मिळाला. माझे मूळ गाव कर्नाटकातील असल्याने त्या प्रदेशातील संस्कृती, लोकजीवन आणि विचारजगत यांच्याशी नातं जुळवण्यासाठी मी काही प्रादेशिक साहित्य वाचावं अशी इच्छा होती — आणि ‘वंशवृक्ष’मुळे ती पूर्ण झाली.
या कादंबरीची नायिका आहे कात्यायनी, जी कपिला नदीच्या पुरात आपला नवरा गमावते. तिच्या कुशीत फक्त सहा महिन्यांचा तिचा मुलगा असतो. समाजाच्या परंपरेनुसार तिला केशवपन केल्याशिवाय घरातील स्वयंपाकगृहात प्रवेश दिला जात नाही. पण अशा कठोर बंधनातही कात्यायनीचा मनोविश्व वेगळ्या दिशेने प्रवास करतो. तिला शिक्षण घ्यायचं असतं, स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं करायचं असतं. सासरे श्रीनिवास श्रोत्री यांच्या परवानगीने ती महाविद्यालयात प्रवेश घेते. आणि तिथे तिच्या आयुष्यात प्रवेश होतो प्रोफेसर राजा राव यांचा.
कात्यायनी आणि राजा राव यांची कथा त्या काळातील समाजरचनेच्या तुलनेत खूपच पुढारलेली वाटते. कात्यायनीचे नंतरचे राजा राव यांच्याशी प्रेमसंबंध जुळून येतात, आणि तिचं दुसरं लग्न ही कादंबरीतील सर्वात विचार करायला लावणारी घटना ठरते. लेखक भैरप्पा इथे प्रेम, नैतिकता, आणि समाजरचनेच्या सीमेवर उभं राहून प्रश्न विचारतात की "आयुष्यात खरं महत्त्वाचं काय? समाजनियमांचं पालन की स्वतःचं सुख?"
Vanshvruksha - वंशवृक्ष 
दुसरीकडे, सदाशिव राव यांचा करुणा रत्नेशी झालेला संबंध हा तितकाच गुंतागुंतीचा आहे. संशोधन पूर्ण करण्यासाठी केवळ उद्देशपूर्तीसाठी झालेलं लग्न. या दोन्ही कथा एकाच वेळी आधुनिकतेच्या शोधात आणि पारंपरिक मूल्यांच्या संघर्षात उभ्या राहतात. भैरप्पांच्या लेखनशैलीतून सामाजिक परंपरा विरुद्ध वैयक्तिक इच्छा, नैतिकता विरुद्ध वैयक्तिक निवड, आणि कुटुंबीय मूल्ये विरुद्ध आत्मिक समाधान असा विचारांचा द्वंद्व उभा राहतो.
कादंबरीचा शेवट अत्यंत प्रभावी आहे. श्रीनिवास श्रोत्रींना त्यांच्या स्वतःच्या जन्माविषयी सत्य समजतं आणि त्यांच्या परंपरेवरील विश्वासाला धक्का बसतो. तर कात्यायनीला जाणवतं की तिने केवळ भौतिक सुखासाठी दुसरं लग्न करून काहीतरी गमावलं आहे. कोण बरोबर आणि कोण चूक, याचं उत्तर लेखक वाचकांवर सोडतात.
भैरप्पांच्या लेखनातील सर्वात मोठं बलस्थान म्हणजे त्यांची व्यक्तिरेखा उभी करण्याची ताकद. प्रत्येक पात्र विचारपूर्वक घडवलेलं आहे — त्यांच्या कृती, भावनांमधून समाजाच्या अनेक थरांवर प्रकाश पडतो.
मला वैयक्तिकरित्या श्रीनिवास श्रोत्री ही व्यक्तिरेखा अतिशय आवडली. ते आपल्या विचारांवर ठाम राहतात, आपल्या मूल्यांवर जगतात आणि त्यामुळेच ते वाचकांसमोर केवळ पारंपरिक व्यक्ती म्हणून नव्हे, तर आत्मसंघर्ष करणारा माणूस म्हणून उभे राहतात. ते बरोबर आहे की नाही हा प्रश्न जरी राहिला, तरी त्यांच्या तत्त्वनिष्ठतेने मनावर ठसा उमटतो.
‘वंशवृक्ष’ ही केवळ एका स्त्रीच्या प्रवासाची कथा नाही; ती प्रत्येक वाचकाला आरसा दाखवते. पारंपरिकतेच्या आवरणाखाली आपण खरोखर किती मोकळे आहोत? आपली नैतिक मूल्यं आपण स्वतःसाठी जगतो का, समाजासाठी?
एस. एल. भैरप्पा यांची ही कादंबरी वाचताना आपण प्रत्येक पानावर विचार करतो काय योग्य, काय अयोग्य?
काय परंपरा, आणि काय वैयक्तिक स्वातंत्र्य?
आजच्या तरुण पिढीसाठी ही कादंबरी अत्यावश्यक आहे. कारण ती सांगते, जीवन फक्त सामाजिक चौकटीत बसवलेलं नसतं, ते आपल्या विचारांच्या मुळांशी जोडलेलं असतं.
मैत्रेयी राजेंद्र कातरकी