संघ हा केवळ एक शब्द किंवा एक संस्था नाही तर आज ती करोडोंसाठी भावना आहे, राष्ट्रीयत्वाची धगधगती ज्वाला आहे आणि समर्पणाची अखंड माला आहे. 'देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो' ह्या विचाराचं मूर्त रूप म्हणजे संघ, सेवेचा प्रतिशब्द म्हणजे संघ, भारतीय अस्मितेचा स्वभाव म्हणजे संघ..
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ॥
हे वत्सल मातृभूमी, तुला नित्य माझा नमस्कार असो. हे हिन्दुभूमी, तू मला सुखाने वाढविले आहेस. हे अत्यंत मंगल असणाऱ्या पुण्यभूमी, माझा हा देह तुझ्याच कार्यासाठी खर्ची पडो. तुला माझा वारंवार नमस्कार असो.. ह्या शब्दांनी, ह्या भावनेने सर्वतोपरी वाहून घेतलेला संघ, भारतीयांचं आणि भारतमातेचंही अजोड वैभव आहे.
एखादी संस्था काळाच्या कसोटीवर उतरते, यशाची, कर्तृत्वाची आणि वाढीची शंभर वर्ष अव्याहत पूर्ण करून अखंड वाटचाल करत राहते तेव्हा त्या संस्थेचा विचार कितीतरी अंगांनी आणि कितीतरी स्तरांवर करता येऊ शकतो. खरंतर शतकोत्तर वाटेवर वाटचाल करताना शंभर वर्षांतल्या विचारधारेचा प्रवाह, कार्यविस्तार आणि कार्यप्रभाव हा संघासाठी आणि समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी महत्वाचा संशोधनाचा विषय ठरू शकतो यात शंका नाही.
शंभर वर्ष एखादी संस्था चालत आणि वाढत राहणं ही कल्पनाही फार मोठी आहे. कित्येक पिढ्यांना एका विचारात आणि उदात्त कार्यात सामावून घेणं, बदलत्या काळानुसार मूलतत्त्व सांभाळून गरजेपुरतं बदलत राहणं ही सोपी गोष्ट नाही.
मात्र यामागचं गमक काय असावं ? स्वतः डॉ. हेडगेवारांनी केलेला संकल्प सिद्धीपर्यंत पोहोचला तो संकल्पामागच्या निखळ भावनेने, त्याला दिलेल्या विचारांच्या आणि कृतीच्या जोडीने ज्यामध्ये विचार होता तो केवळ भारतमातेचा, भारतीयांचा, त्यात स्वार्थाचा, वैयक्तिक हेतूंचा लवलेशही नव्हता. कदाचित हाच व्यापकाचं वैभव ल्यालेला संकल्प आजही संघाच्या कार्याला ऊर्जा पुरवत राहतो, दिशा दाखवत राहतो.
संघाचं स्वरूप हे अनेकदा 'सांस्कृतिक संघटन' किंवा 'हिंदुत्ववादी विचारधारा' असल्याचं मानलं जातं. मुळात संस्कृतीचा मानवी मनावर आणि जीवनावर खोल परिणाम होत असतो. किंबहुना आचारपद्धती आणि सामाजिक भानही मोठ्या प्रमाणात ह्यावर अवलंबून असतं. अशा भारतीय संस्कृतीचा, हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा संघ गेल्या शंभर वर्षांपासून देशाचं सांस्कृतिक आणि सामाजिक आरोग्य आणि स्थैर्य सांभाळण्याचं काम करत आहे असं मनापासून वाटतं.
संघामध्ये स्वतः संस्था म्हणावी असे असंख्य स्वयंसेवक होऊन गेले आणि नि:संशय होत राहतील. मात्र कोणालाही आपल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या बळावर आपली वेगळी संस्था काढावीशी वाटली नाही कारण ध्येय होतं ते सेवेचं, सेवकापेक्षा सेवा महत्वाची हा संस्कार संघांचाच. संघाचं एक महत्वाचं कार्य म्हणजे बौद्धिक वर्ग. संघांत घेतलं जाणारं बौद्धिक हे जणू विचार करणाऱ्या मनाला दिलेलं विवेकाचं प्रशिक्षण आहे. बुद्धीला दिलेली दिशा आहे ती. ह्यातून घडणाऱ्या स्वयंसेवकाचं वैयक्तिक जगणंही अधिक डोळस आणि म्हणून अधिक सुखदायी होतं.
संघाची नियमितपणे भरणारी शाखा जणू समर्थांनी दाखवलेल्या शारीरिक आणि आत्मिक विकासाचं मूर्त रूप आहे. साठ हजारहून अधिक असलेल्या देशाच्या कानाकोऱ्यापर्यंत पोहोचलेल्या शाखा आणि त्यामध्ये स्वतःला घडवणारे स्वयंसेवक हेच संघाचं शंभर वर्षांचं नित्यनूतन वैभव आहे. जगात वावरणाऱ्या स्वयंसेवकांची नसानसात भिनलेली शिस्त आणि देशाभिमान, त्याग आणि सेवाभाव यामागे शंभर वर्षांच्या साधनेचं अतुल्य बळ आहे.

एकदा बाबाराव भिडे फार सुंदर म्हणाले होते की 'संघ म्हणजे शाखा आणि शाखा म्हणजे कार्यक्रम..'. संघाच्या शाखांचे आजही अनेक कार्यक्रम नेमाने होत असतात. सांस्कृतिक कार्यक्रम, स्मरणोत्सव, व्याख्याने, विशेष संचलन अशा कितीतरी कार्यक्रमांनी किती नकळत आणि सहज ऐक्याची भावना मनात खोलवर रुजते, संस्कृतीचा जागर जाणीवा जाग्या करत राहतो. ही विचारगंगा केवळ कार्यक्रमांपुरती आणि विशिष्ट स्थळांपुरती मर्यादित न राहता शब्दरूपाने अगदी घरापर्यंत वाहत येते आणि वाहत राहते ती संघाने सुरू केलेल्या मासिकांच्या माध्यमातून. विवेक, एकता, इ. साप्ताहिक आणि मासिकांमधून योग्य गोष्टींचा, विचारांचा जागर कायमच होत आलेला आहे. खरंतर आजच्या काळात माध्यमांचा, माहितीचा आणि त्याकडे पाहण्याच्या असंख्य दृष्टिकोनांचा सुकाळू असताना उचितचेचं व्रत घेतलेल्या ह्या प्रकाशन संस्थांचं महत्व मोलाचं आहे.
शिक्षण हा भारतीय उत्थानाचा राजमार्ग आणि गरज जाणून संघाने सुरु केलेला विद्याभारती उपक्रम आजही फार महत्वाचा ठरतो. शिक्षणाचं भारतीयकरण, राष्ट्रीयकरण करणारी ही भूमिका भारताचं भविष्य प्रयासांनी घडवण्याचं काम आजही निष्ठेने करत आहे. भारतीय कुटुंबासाठी आणि समाज व्यवस्थेसाठी स्त्री ही महत्वाची शक्ती आहे आणि समाजाच्या व त्यायोगे राष्ट्राच्या उत्थानासाठी स्त्रियांची जागृती करणं गरजेचं आहे हे जाणून संघाच्या विचारधारेचा वारसा घेऊन सुरू केलेली राष्ट्रीय सेविका समिती स्त्री-सशक्तीकरणासाठी अनेक दशकांपासून भरीव काम करत आहे. समितीच्या माध्यमातून आज कितीतरी स्त्रियांना स्वतःचा ठसा आपल्या कामातून उमटवता येतोय, स्वविकासाची नवी दालनं त्यांच्यासाठी खुली झाली आहेत. महिलांच्या शाखांमधून इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारं महिलांचं प्रबोधन आणि सशक्तीकरण जगाच्या पातळीवर क्वचितच कुठे पाहायला मिळेल.
संघाचं अतुल्य कार्य केवळ वैचारिक स्तरावर मर्यादित नाही तर त्यात व्यवहारिक, प्रत्यक्ष जीवनात केलेली असंख्य कामंही आहेत. नैसर्गिक आणि अन्य आपत्तींमध्ये स्वयंसेवकांनी सामाजिक किंवा वैयक्तिक पातळीवर केलेली मदत असेल, सारंकाही मोठा आधार देणारं आहे. संघाच्या पुढाकाराने बांधलेलं विवेकानंद शीला स्मारक हा ह्या सेवाभावाचा गौरवशाली इतिहास आहे तर अयोध्येतलं श्रीराम मंदिर ह्या सेवाभावाचा कळस. विद्यार्थ्यांसाठी काम करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही आजमितीला जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. भारतीय जनसंघ, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, सेवा भारती, संस्कृत भारती, स्वदेशी जागरण मंच, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, संस्कार भारती, प्रसार भारती, विज्ञान भारती, डिजिटल भारती, स्वामी विवेकानंद सेवा समिती, सहकार भारती, सेवा सहयोग, समर्थ भारत, इत्यादी संस्था ह्या संघरूपी वटवृक्षाच्या वाढलेल्या समृद्ध शाखा आहेत. खरंतर संघाला कोणताही विषय वर्ज्य नाही, प्रत्येक क्षेत्रात संघाचं काम असल्याचं शतकाच्या वाटेवर आज दिसून येतं. कोणताही एखादा लेख किंवा लेखक संघाच्या आजपर्यंतच्या समृद्ध कार्याचा आढावा घेऊ नाही मात्र कोणीही त्यामध्ये आपल्या योगदानाद्वारे खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो.
संघाचं कार्य मोठं आहेच मात्र अतिविशाल आहे ते स्वयंसेवकांचं मन, त्यांच्यातील राष्ट्रीय भावना आणि सांस्कृतिक अभिमान. मातृभूमीसाठी, देशवासीयांसाठी अवघ्या घरादारावरचा मोह गंगार्पण करून, निवास, प्रवास आणि आवासाच्या चिंतेपेक्षा मातृभूमीच्या, देशवासीयांच्या विकासाची चिंता शिरोधार्य मानणाऱ्या स्वयंसेवकांची यादी फार फार मोठी आहे, त्यांचं कार्य आणि विचार ही संघाची खरी श्रीमंती म्हणावी लागेल.
केवळ मातृभूमीसाठी, धर्मासाठी स्वतःचे प्राण पणाला लावून कार सेवेसाठी शेकडो मैल चालत जाणाऱ्या तरी प्रसिद्धीकडे पाठ फिरवणाऱ्या अशा या स्वयंसेवकांना उपमा आणि उपाधी कोणती द्यावी ? स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या संघाच्या कामाचा अभ्यास व्यवस्थापनाच्या अभ्यासकांसाठी फार मोलाचा आहे.
शतकाची वाट चालत, नव्या जोमाने पुढे पाऊल टाकत असताना संघाने 'पंच परिवर्तनाची' संकल्पना प्रामुख्याने मांडली आहे. ह्यामध्ये समूहातील 'स्व'जागरण, सामाजिक समरसता, कौटुंबिक प्रबोधन, नागरी कर्तव्य आणि पर्यावरणाचा समावेश आहे. ह्या पंच सूत्रांच्या आधाराने परिवर्तनाच्या मार्गावर चालून निजकल्याणासाठी आपण नक्कीच प्रयास करायला हवे. अशा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शतकातील कार्य वैयक्तिक ते सामाजिक, संस्थात्मक ते राष्ट्रीय अशा सर्व स्तरांवर महत्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर, सेवेचं व्रत म्हणजे संघ. असं व्रत ज्याला उद्यापन नाही.. सुरुवात केव्हाच झाली आहे, आपण जायचं ते आपल्याला घडवायला, मातृभूमीच्या अथांग ऋणांचं स्मरण करत कृतज्ञता व्यक्त करायला..
- अनीश जोशी