" माझे मन पांडुरंगी.."

युवा विवेक    27-Oct-2025
Total Views |

आपल्या आयुष्यात काही ठिकाणं मनात घर करून बसलेली असतात. ही ठिकाणे फार समृद्ध असतात किंवा संपन्नतेने नटलेली असतात असं मुळीच नाही पण ती आपल्यासाठी स्पेशल असतात..महत्त्वाची असतात. जगाच्या दृष्टीने त्याची किंमत फारशी नसेलही पण या ठिकाणांमध्ये आपल्या आठवणी मुक्तपणे वावरत असतात. माझ्या आठवांमध्ये फिरणार असंच एक ठिकाण म्हणजे माझ्या गावातलं विठोबाचं देऊळ !
लांबरुंद सभामंडप, घडीव गाभारा, पल्लेदार बांधकामाचं शिखर किंवा बिलोरी हंड्या-झुंबरांनी, चकचकीत टाइल्सनी सजलेलं हे मंदिर मुळीच नव्हतं. इथली छोटेखानी पडवी दिवसरात्र अंधाराने झाकोळलेल्या अवस्थेत असायची. पडझड झालेल्या गाभाऱ्यात अंधार भेदत येणारा कवडसा नेमका पांडुरंग आणि रुक्मिणीच्या चेहऱ्यावरचे तेज दाखवायचा. संपूर्णतः मातीचे बांधकाम, छतावरच्या माळवदाला काळाच्या ओघात भगदाडे पडलेली आणि रात्री पाकोळ्यांचा यात मुक्त वावर असं एकंदरीत देवळाचं रुपडं. गावातल्या भटक्या कुत्र्यांना विठोबाच्या पडवी बाहेरच्या वळचणीला हक्काची जागा होती. इथल्या अंगणातल्या मोठ्या तुळशीवृंदावनात नागोबाचा दगड बसवलेला होता.. अजूनही आहे.. या नागोबाला नागपंचमीला मोठा गराडा पडतो. लहानपणी आम्हा मुलांना या नागोबाची भलतीच भीती वाटायची. नागपंचमीला मुली फेर धरून खेळण्यासाठी विठोबाच्या अंगणात जमायच्या. माहेरपणाला आलेल्या नवख्या माहेरवाशीणी आपल्या सासरचे, नवऱ्याचे कौतुक लाजत लाजत इथेच आपल्या मैत्रिणींना सांगायच्या. भोंडल्याच्या वेळेस कितीतरी गाणी म्हणत याच देवळासमोर फेर धरून मुली मौज करायच्या. पांडुरंग म्हणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्याला आपली आई वाटतो,आणि पंढरपूर माहेर. पण आमच्या गावातल्या प्रत्येक सासुरवाशीणीला माहेरपणाचा दिलासा दिला तो याच रुक्मिणी-पांडुरंगाने. पाण्यावर पाणी भरायला जाताना त्या बापड्या गावातल्या स्त्रिया पांडुरंगाच्या पायाशी डोकं ठेवून जात. नेमाने भेटणारा जवळचा सखा भेटावा तशी त्याला गाऱ्हाणी सांगत. या बायकांच्या संसारातील प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार म्हणजे हा विठोबा. हा जसा स्त्रियांना जवळचा तसा गावातल्या कष्टकरी पुरुषवर्गाला सुद्धा. घर-कुणबीकी, गुरं-जनावरं नेटाने सांभाळणाऱ्या या मातीतल्या लोकांचा दिवसाचा शिणवठा रात्री विठोबाच्या पडवीत होणाऱ्या भजनाने कुठल्या कुठे निघून जायचा. रात्रीच्या वेळी देवळातून उठणारे भजनाचे सूर, गाभाऱ्यात दरवळणारा तुळशीचा,बुक्क्याचा,उदबत्त्यांचा आणि तेलातुपाचा वास, लोडशेडिंगच्या कृपेमुळे कंदीलाच्या मिणमिणत्या पिवळ्या उजेडात पडणाऱ्या उपस्थितांच्या पडछाया आणि या सर्वाला भारलेपणा देणारी आतली लामणदिव्याच्या मंद ज्योतीने अंधुकशी दिसणारी विठोबाची मूर्ती आणि अंधारामुळे तिचे अधिकच गडद झालेले सावळेपण मनातल्या अगदी खोल जागी अजूनही लुकलुकते आहे.
खरंतर गावोगावची देवालये म्हणजे आपल्या संस्कृतीरक्षणाचे केंद्रबिंदू. गावची सांस्कृतिकता या देवळांच्या भोवती फिरत असते. सणउत्सवात जल्लोषासाठी तर अडीअडचणीत रक्षकाच्या भावनेने लोक देवतांची उपासना करतात. साधारणपणे संस्कृतीनिष्ठ असणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात श्रद्धा ही असतेच. ही श्रद्धा कुठल्यातरी स्वरूपात आविष्कृत होण्यासाठी अशा वास्तू उपयोगी पडतात. या वास्तूंना दिखावा करण्याची गरज नसते; त्यांचं फक्त असणं हेच खूप दिलासादायक असतं. असाच दिलासा मला ह्या विठोबाच्या देवालयामुळे वाटतो.
LordVitthal or #Panduranga is an incarnation of #LordVishnu, In Maharashtra  Karnataka , Vishnu is called vitthal the one who is standing on vith (red  rectangle stone ), he is also called panduranga 
शिक्षणासाठी गाव सोडून मला पाऊण तप झालं पण गावच्या स्मृती या मनाच्या हिंदोळ्यावर सतत झुलत असतात. बदल हा काही आपल्यासाठी थांबत नाही, तो अनिवार्य आहे. अशाच बदलाच्या टप्प्यावर हे गावचं जुनं आणि पुराणपणाचं ओझं सांभाळणारं देऊळ आता अगदी भव्यदिव्य झालंय. आता देवळाच्या भिंतींना ओल येत नाही, देवळाचं माळवद गळत नाही,वळचण आणि पडवी म्हणजे काय हे तर नवख्या मुलांना माहितीही नाही. इथल्या अंगणात आता पांढऱ्या मातीचा उन्हात भाजणारा फुफाटा आणि भोळंभाबडं वाटणारं मातीचं वृंदावन आता पेव्हर ब्लॉक्स आणि स्टायलिश वृंदावनाने रिप्लेस केलंय. देवळावर चांगलं शतकभर छाया धरणारी बाभळ आता दिसत नाही. शोभेची वृक्ष लागवड मात्र भरपूर झाली आहे. हे लौकिकाअर्थाने विधायक बदल पाहिले की जुन्या स्मृती अधिकच उचंबळून येतात. जुन्या देवळाचा तो बापडा जुनेपणा डोळ्यांसमोर तरळतो. हल्ली इथे प्रत्येक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. पुष्कळ वर्गण्या, फ्लेक्स आणि साऊंड वगैरे यथासांग होतं. पण रोज रात्रीचे भजन हल्ली बंद झालंय असं बाबा परवा सांगत होते. नव्याबरोबर जुळवून घेताना जुनं मागे सोडावं लागतच. पण या सगळ्या नव्या नवलाईत एक जुनी गोष्ट मात्र चिरंतन आहे ती म्हणजे रुक्मिणी पांडुरंगाची सावळी मूर्ती आणि गावकऱ्यांची त्याच्या प्रति असणारी अनन्य श्रद्धा..!! आजची तरुण मुलंमुली रोज खेळायला जरी विठोबाच्या देवळात जमत नसली तरी एकादशी,अष्टमी किंवा काल्याला पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवतात हे काही कमी दिलासादायक नाही.. फक्त देवळाबद्दलच्या त्यांच्या भाबड्या आठवणी नाहीत याची मनात कुठेतरी खंत वाटत राहते.
-पार्थ खाडिलकर