पर्यटन

युवा विवेक    14-Nov-2025
Total Views |

पर्यटन
मनुष्याला नेहमीच नवीनतेची ओढ असते. हीच ओढ त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. नवीन ठिकाणे पाहणे, तेथील संस्कृती, परंपरा, लोकजीवन आणि निसर्गसौंदर्य अनुभवणे यालाच आपण पर्यटन म्हणतो. पर्यटन हा केवळ प्रवास नसून तो मन, शरीर आणि विचारांना नवी ऊर्जा देणारा अनुभव असतो. पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. काही लोकांना निसर्गरम्य डोंगर, समुद्रकिनारे, धबधबे, जंगले याकडे आकर्षण असते. काहींना ऐतिहासिक किल्ले, मंदिरे, जुनी वास्तू पाहण्याची आवड असते. काहींसाठी तीर्थयात्रा म्हणजे पर्यटन असते तर काही जण ज्ञानपर्यटन करतात म्हणजे ग्रंथालये, विद्यापीठे, संशोधन केंद्रे पाहतात. आजच्या काळात साहसी पर्यटनही लोकप्रिय झाले आहे. ट्रेकिंग, स्कूबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, रॉक क्लायम्बिंग यामुळे तरुणाईला रोमांचक अनुभव मिळतो. पर्यटनाचे फायदे अमूल्य आहेत. प्रथम म्हणजे ते माणसाला मानसिक व शारीरिक ताजेतवानेपणा देते. निसर्गाच्या सान्निध्यात गेले की जीवनातील ताण-तणाव दूर होतात. दुसरे म्हणजे पर्यटनामुळे आपले ज्ञान वाढते.
एखाद्या प्रदेशातील लोकजीवन, खाद्यसंस्कृती, भाषा, पोशाख हे प्रत्यक्ष पाहिल्यावर आपली दृष्टी व्यापक होते. तिसरे म्हणजे पर्यटन हे आर्थिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. देश विदेशातील पर्यटक येतात तेव्हा स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. हॉटेल्स, वाहतूक, हस्तकला, मार्गदर्शन सेवा यांना चालना मिळते. आज भारत हा पर्यटनाचा मोठा केंद्रबिंदू आहे. उत्तर भारतात हिमालयाचे बर्फाच्छादित डोंगर, काश्मीरचे निसर्गसौंदर्य, गंगानदीची तीर्थक्षेत्रे, तर दक्षिणेत केरळचे बॅकवॉटर, मंदिरांची भव्य वास्तू, गोव्याचे समुद्रकिनारे ही सर्व स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. महाराष्ट्रात अजंठा वेरूळ लेणी, शिवनेरी, रायगड, सिंहगड यांसारखे किल्ले, कोकणातील समुद्रकिनारे हे पर्यटनाचे खरे खजिने आहेत. पर्यटनामधून आपण राष्ट्रीय एकात्मतादेखील अनुभवतो. राजस्थानातला एक युवक जेव्हा नागालॅंडमध्ये जातो किंवा काश्मीरमधला प्रवासी जेव्हा कोकणात येतो, तेव्हा वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांच्या जवळ येतात. त्यामुळे परस्परांबद्दल आदर, सहिष्णुता आणि मैत्री निर्माण होते. तथापि, पर्यटनाचे काही तोटेही दिसतात. काहीवेळा पर्यटक बेदरकार वागतात, निसर्गाचे नुकसान करतात, प्रदूषण करतात. ऐतिहासिक वास्तूंची हानी होते. त्यामुळे "जिथे जाऊ तिथे स्वच्छता आणि जपणूक" हा पर्यटकांचा संस्कार असावा. पर्यावरणाचे रक्षण करून पर्यटन केले तरच ते टिकाऊ होईल. आजच्या युगात पर्यटन हा फक्त छंद राहिलेला नाही तर तो एक उद्योग झाला आहे. सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजना केल्या आहेत. "अतिथी देवो भव" ही संकल्पना जगासमोर यातूनच  मांडली गेली. पर्यटकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि सुंदर अनुभव मिळावा म्हणून हॉटेल्स, रस्ते, माहिती केंद्रे यांची उभारणी केली जाते. पर्यटन हे माणसाला फक्त भटकंती घडवत नाही तर मनाला समृद्ध करणारा अनुभव ठरतो. प्रवासातून माणूस घडतो, परिपक्व होतो, जगाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकतो. म्हणूनच पर्यटन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
 
गुरुप्रसाद सुरवसे