स्वच्छता

युवा विवेक    14-Nov-2025
Total Views |

स्वच्छता
 
स्वच्छता ही केवळ आरोग्याशी संबंधित गोष्ट नसून ती प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वच्छतेतच देवाचे वास्तव्य असते असे आपल्या संस्कृतीत सांगितले गेले आहे. पण दुर्दैवाने, आपण स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे किंवा घराच्या बाहेर अस्वच्छता ठेवणे हे सगळे प्रकार आपण रोजच पाहतो. अशा सवयींमुळे केवळ आपले वातावरण दूषित होत नाही तर आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे स्वच्छता राखणे हे आपले स्वकर्तव्य आहे.
घर, शाळा, गाव किंवा शहर स्वच्छ ठेवले तर तेथे राहणाऱ्या लोकांचे जीवन निरोगी व आनंदी राहते. मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, कॉलरा यांसारखे आजार अस्वच्छतेतूनच पसरतात. जर आपण प्रत्येकाने आपले घर, आपली गल्ली आणि आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली, तर अनेक रोगांपासून बचाव होईल. स्वच्छ वातावरणामुळे मन प्रसन्न राहते आणि कार्यक्षमतेत वाढ होते. भारताने स्वच्छ भारत अभियान राबवले, यामागेही हीच जाणीव होती की नागरिकांनी स्वतः पुढे येऊन आपले कर्तव्य पार पाडावे. केवळ शासनावर किंवा इतरांवर अवलंबून राहून स्वच्छता साध्य होत नाही. प्रत्येकाने स्वतः कचरा योग्य ठिकाणी टाकणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाण्याची नासाडी टाळणे आणि झाडे लावणे ही कामे केली, तर समाज खरोखरच स्वच्छ व सुंदर बनेल. शाळांमधून मुलांना स्वच्छतेचे धडे मिळाले पाहिजेत. कारण स्वच्छतेची सवय लहानपणापासून लागली तर ती आयुष्यभर टिकते. मुलांनी आपले डबे संपल्यावर कचरा डस्टबिनमध्ये टाकणे, वर्ग स्वच्छ ठेवणे, हात धुवून जेवण करणे या छोट्या गोष्टींमधून मोठा बदल घडू शकतो.स्वच्छता ही फक्त बाह्य नसून अंतर्गतही आवश्यक आहे. मनातील मत्सर, द्वेष, राग आणि खोटेपणा यांचा नाश करून मन शुद्ध ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाह्य स्वच्छता आणि अंतःकरणाची स्वच्छता एकत्र आली की समाज निरोगी, सुसंस्कृत आणि प्रगत होतो. म्हणूनच, स्वच्छता हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. माझ्यामुळे परिसर घाण होऊ नये हा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. जर आपण स्वतः स्वच्छतेकडे जबाबदारीने पाहिले, तर आपल्या गावाचे, शहराचे आणि अख्ख्या देशाचे रूप पालटेल.
गुरुप्रसाद सुरवसे