भारत हा सण-उत्सवांचा देश आहे. येथे प्रत्येक ऋतू, प्रत्येक संस्कृती आणि प्रत्येक परंपरेनुसार वेगवेगळे सण साजरे केले जातात. त्यामध्ये विजयादशमी किंवा दसरा हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. आश्विन शुद्ध दशमीला साजरा होणारा हा सण शौर्य, सद्गुणांचा विजय आणि न्यायाच्या मार्गाचे प्रतीक आहे. विजयादशमीचे महत्त्व केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्याही फार मोठे आहे. या दिवशी श्रीरामाने रावणाचा पराभव केला ही पौराणिक कथा प्रत्येकाला ठाऊक आहे. रावणाचे व्यक्तिमत्त्व विद्वान असले तरी त्याच्या अहंकाराने वाईट कर्मांना जन्म दिला. श्रीरामाने धर्म, संयम आणि सद्गुणांच्या बळावर त्याचा पराभव करून दाखवला. त्यामुळे विजयादशमी हा सण म्हणजे सत्याचा असत्यावर विजय आणि नीतीचा अन्यायावर विजय याचे प्रतीक आहे. या दिवशी पांडवांनी वनवास संपल्यानंतर शस्त्रांचे पूजन केले अशीही कथा सांगितली जाते. कारखाने, गाड्या, शेतातील अवजारे, घरगुती साहित्य यांचे पूजन करून साधनांचा मान राखण्याची ही प्रथा आहे. यामध्ये श्रमाचा आणि साधनांचा सन्मान करण्याचा सुंदर संदेश आहे.
विजयादशमीच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना दिली जातात. याला सोन्याची पाने देणे असे म्हणतात. या प्रथेच्या मागे दान, बंधुभाव आणि मैत्री टिकविण्याचा हेतू आहे. शेजारी, नातेवाईक व मित्र यांना शमीची पाने देताना लोक परस्परांना शुभेच्छा देतात. हा सण भारतीय संस्कृतीतील एकात्मतेचा दुवा आहे. महाराष्ट्रात शस्त्रपूजन व सोन्याची पाने देणे, उत्तर भारतात रामलीला व रावणदहन, तर दक्षिणेत देवीच्या विजयाचा उत्सव अशा विविध पद्धतींनी हा सण साजरा होतो. यावरून भारतीय समाजातील विविधता आणि एकात्मता स्पष्ट दिसते. विजयादशमीचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा आहे. आजही समाजात अन्याय, भ्रष्टाचार, हिंसा आणि अहंकाराचे राक्षस उभे आहेत. त्यांचा पराभव केवळ शौर्य, प्रामाणिकपणा आणि सद्गुणांच्या बळावरच होऊ शकतो. विजयादशमी आपल्याला सत्यनिष्ठ राहण्याचा, वाईट प्रवृत्तीवर मात करण्याचा आणि समाजहितासाठी काम करण्याचा संकल्प घ्यायला शिकवते.
शैक्षणिक दृष्टिकोनातून हा सण विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो. परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर ते कोणतीही कठीण परीक्षा जिंकू शकतात, हा आत्मविश्वास विजयादशमी देते. कामगार, शेतकरी, व्यावसायिक सर्वच जण या दिवशी नवीन उत्साहाने कार्याला सुरुवात करतात.
शेवटी असे म्हणता येईल की, विजयादशमी हा सण केवळ आनंदाचा नसून जीवनाचा मार्गदर्शक आहे. रावणाचे दहन ही केवळ परंपरा नसून आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह यांचा नाश करण्याची शिकवण आहे. “सत्य जिंकते आणि असत्य हरते” हा सार्वकालिक संदेश या सणात दडलेला आहे.
म्हणूनच प्रत्येकाने विजयादशमीला फक्त सण म्हणून न पाहता, त्यामागील प्रेरणा जीवनात उतरवावी. सत्य, न्याय, शौर्य आणि सद्गुणांच्या बळावरच खरी विजयादशमी साजरी होऊ शकते.
गुरुप्रसाद सुरवसे