मला आठवतं शाळेत बाईंनी सांगितलेल्या उत्तम विद्यार्थ्याच्या गुणांपैकी एक गुण होता प्रश्न विचारणे! जो विद्यार्थी अधिक प्रश्न विचारतो त्या विद्यार्थ्यामध्ये चिकित्सकता गुण जास्त! मुलांनी जास्ती प्रश्न विचारावे, त्यांना प्रश्न पडावे यावरती एक बालगीत सुद्धा आपल्या मराठी मध्ये आहे! मला आठवतं माझ्या आई बाबांनी मला "आई असचं का? बाबा तसचं का?" नावाचं पुस्तक आणून दिलं होतं. पाऊस कसा पडतो इथपासून ते सूर्य आपल्यापासून किती लांब आहे अशा अनेक प्रश्नांची त्यात उत्तरे होती. ते पुस्तक मी एकदासुद्धा पूर्ण वाचलं नाही हा भाग निराळा पण मुद्दा असा की थोडक्यात लहान होते तेव्हा मोठ्यांना मी निरनिराळे प्रश्न विचारावे, त्या मागचं कारण जाणून घ्यावं असं कायम वाटायचं. तेव्हा मी किती प्रश्न विचारले मला काही आठवत नाही पण आज जेव्हा मी या जगात एक young adult म्हणून वावरत आहे तेव्हा मात्र माझ्याकडे असे अनेक प्रश्न आहेत जे मला माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला सतत विचारावेसे वाटत राहतात. दुर्दैवाने आता मला "कोणाला मी आत्ता शिकवले त्याबद्दल काही प्रश्न आहे का?" असं आमचे प्राध्यापक सोडून कोणीच विचारत नाही आणि ते सुद्धा प्रश्न विचारला तर 'एवढं सुद्धा कळत नाही' अशा आविर्भावात उत्तर देतात.
एक नक्की की मला पडलेले प्रश्न आता काही 'असचं का तसचं का' या प्रकारात मोडत नाहीत. आता पडणारे प्रश्न एखादी गोष्ट अशी का घडते या पेक्षा ती घडल्या नंतर मला काय वाटतं यावर आधारलेले असतात. बाहेर पाऊस का पडतो या प्रश्नाची जागा आता मनावर काळे ढग दाटतात तेव्हा तुम्ही काय करता अशा प्रश्नाने घेतली आहे.
या सगळ्याची सुरूवात नेमकी कधी झाली माहिती नाही पण एवढं नक्की की adulting नावाचं वळण घेतलं आणि अशा अनेक गोष्टी घडू लागल्या ज्या गोष्टी 'मीच का?' हा प्रश्न समोर ठेऊन गेल्या. अगदी प्रचंड हात दुखला इथपासून ते कॉलेजच्या अनेक गोष्टी एकत्र समोर येऊन उभ्या राहिल्या त्या प्रसंगी - मीच का हा प्रश्न कायम डोकावून जायचा. या प्रश्नाचं उत्तर काही मला शोधायला जायचं नाही पण मोठ्यांना मात्र नक्की विचारावं वाटतं की तुम्हाला तुम्ही आमच्या वयाचे होतात तेव्हा किंवा अगदी आजच्या घडीला सुद्धा कधी 'मीच का' असा प्रश्न पडतो का? आणि पडत असेल तर अशावेळी तुम्ही काय करता?
मोठं होता होता जसजसा अभ्यासाचा, कामाचा व्याप वाढत गेला तसतसा आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी राखून ठेवला जाणारा वेळ कमी होत गेला. आता जेव्हा एखादं पुस्तक घेऊन छान एक तास तरी वाचायला बसूया असं म्हणते तेव्हा नेमकं कोणाचा तरी फोन येतो किंवा आपल्याकडे एवढा रिकामा वेळ कसा, काही विसरलो तर नाही अशी शंकेची पाल चुकचुकते. आणि मग दिवसा अखेरी जेव्हा जेमतेम एक पान वाचून होतं तेव्हा मग कोणाला तरी रडत विचारावं वाटतं - तुम्ही मोठे होत गेलात तशी तुमची पाउलं सुद्धा मनाविरुद्धच पडू लागली होती का?
हल्ली बऱ्याचदा आता मात्र मी पोरकटपणा सोडून मोठ्यांसारखं वागेन असं स्वतःशीच ठरवते. पण आजूबाजूची परिस्थिति म्हणा किंवा त्या परिस्थितीचा माझ्यावर अगदी सहज होणारा परिणाम म्हणा - या ना त्या मार्गाने कधी पटकन रागच येतो तर कधी अगदी क्षणात डोळे भरून येतात. बरं तिथेच हे थांबत नाही. पुढचा निदान एक तास डोक्यात एकाच वेळी किमान सहा विचारचक्र सुरू होतात. मग ती एकमेकांवर आदळून स्फोट होतो. हे सारं होण्यापेक्षा मी झोपून जाते. अशा वेळी परवाना नावाच्या पुस्तकात सुद्धा त्या मुलीची आई भाग्य जेव्हा पाठ फिरवतं तेव्हा भिंतीकडे तोंड करून झोपून राहते असं वर्णन केलं आहे हे आठवतं. पण माझ्या वीस वर्षांच्या आयुष्यात मी कधीच माझ्या कुटुंबीयांना असं करताना पाहिलेलं नाही. मग असं समोर सभा बोलावून विचारावं वाटतं की जेव्हा जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं, अकारण हतबल व्हायला होतं, डोळे पाणावू लागतात तेव्हा तुम्ही काय करता? रडून काहीच होत नाही असं उत्तर मला निश्चित नको आहे कारण आपल्या क्रियांवर पुढच्या गोष्टी अवलंबून असल्या तरी आपल्या क्रिया भावनेवर आधारित असतात. आणि भावनांना लगाम घालणं एवढं सोपं नक्कीच नाही. मग भावना, विचार, कामं, कर्तव्य याचा खेळ तुम्ही कसा खेळता?
हे सारं इथे संपत नाही! आणखी अनेक प्रश्न, प्रश्नांवरचे प्रश्न अशी लगोरी मनात आहे. आज चेंडूने लगोरी बरोबर निशाणा लागून फुटलीच आहे तर खेळूनच घेऊया पुन्हा एकदा लगोरीचा खेळ. उत्तरांची रास एकावर एक ठेवून दोन्ही गटांना जिंकवू शकाल तुम्ही?