आठवण नव्हे, साठवण!

युवा विवेक    03-Feb-2025
Total Views |


आठवण नव्हे, साठवण!


हृदयातला कोपरा काबीज केला तिने नकळत....
जी कधी शिक्षा वाटायची, ती कधी प्रेम देणारी आई झाली उमगलेच नाही !
जिने अगदी बालवयापासून ते किशोरवयापर्यंत आधार दिला; चुकांवर पांघरूण घातले, सावरले मला, अशी 'माझी' प्रिय शाळा!
माझ्या आयुष्यात जितकी महत्वाची आई आहे, अगदी तितकीच आहे माझी शाळा ।
आज, जे मी स्वतः ला व्यक्त करते, ते कुणामुळे? तिच्याचमुळे!
मैत्रिणींसोबतची ती मजा-मस्ती, ती गंमत-जंमत, आठवणीच बनून राहिल्या... मनाच्या एका कोपऱ्यात साचून राहिल्या... त्या स्पर्धा, ते शिक्षक, ती डब्याची सुट्टी, सहल कसे विसरू मी ?
नकळत क्षणांचे आठवणीत.... अन् आठवणीचे अश्रूंत रूपांतर होते..... अगदी नकळतच !
एका आईपासून - लेकरू अन् शाळेपासून - विद्यार्थी कसा दूर राहिल ?
नकळत क्षण, दिवस, वर्ष सरत जातात..... आणि राहतात त्या फक्त अन् फक्त आठवणी....
ती मात्र तिथेच उभी असते साक्षीदार म्हणून, तिच्या लेकरांच्या यशाची!
एकेकाळी फुलांच्या काळांसम असणारी ती लेकरं, कधी उमलतात, आणि आपल्या कीर्तीचा सुवास पसरवतात कळतच नाही.... हा सुवास सर्वदूर पसरतो अन् त्या मायेचे उर अभिमानन भरून येतं.....

किती पुण्य मिळत असेल तिला आपल्या विद्यार्थ्यांना विदयेचे दान करून !
अन् जेव्हा तिचं ते लेकरू, तिची ओळख अभिमाननं
सांगतं, तेव्हा तर नभसुद्धा ठेंगणे होत असेल!

     

- मुग्धा सुरनीस