माझे आवडते ठिकाण

युवा विवेक    05-Mar-2025
Total Views |


माझे आवडते ठिकाण

 

मनाला रिलॅक्स करणारी हक्काची जागा म्हणजेच माझे आवडते ठिकाण..!

आपले आवडते ठिकाण हे प्रत्येक वेळी एखादे पर्यटन स्थळच असले पाहिजे असे बंधन नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस माझे आवडते ठिकाण असे म्हटले की, वेगवेगळे हिल-स्टेशन, निसर्गरम्य ठिकाणी यांची यादीच असते. परंतु माझ्या दृष्टीने माझे आवडते ठिकाण म्हणाल तर ते हे की, जिथे आपण स्वतःला खूप जवळून जाणून घेतो रिलॅक्स होतो. मग ते ठिकाण आपले घर, ऑफिस, शाळा, कॉलेज कुठेही असू शकते. फक्त ते आपण आपले आवडते ठिकाण आहे हे मान्य करीत नाही.

 

चला तर आज आपण माझ्या अनुभवातून माझे आवडते माझे हक्काचे ठिकाण जाणून घेऊयात. पाहूया तुम्हाला गवसतय का तुमच्या हक्काचे तुमचे आवडते ठिकाण आमचे घर टू रूम किचन होते. पण या घराला छान सुंदर गॅलरी होती. जिथे माझ्या आईने अतिशय हौशीने तुळस, मोगरा, वेगवेगळ्या रंगाच्या जास्वंदीची झाडे लावली होती. या झाडांमध्ये आईने ब्रह्मकमळाचे झाड देखील लावले होते.. हळूहळू झाड गेले बहरत. झाडाला चार-पाच कळ्या आल्या त्याची फुले उमलली. अतिशय सुंदर सुवास पसरला होता. या झाडाच्या जवळ एक कडप्पा होता जी माझी स्वतःची हक्काची जागा.. जिथे मी तासान तास बसून अनेक विषयांवर लेख लिहिले. खास करून लॉकडाऊनच्या काळात या माझ्या हक्काच्या जागेने मला क्षणोक्षणी सहाय्य केले..

 

कधी हा कोपरा माझा हक्काचा मित्र बनला माझे मलाच कळले नाही. आज जरी ते झाड नसले तरीही त्या कडप्पा जवळ बसले की, हातात कागद पेन येतो आणि कागदावरती शब्द उमटतात..

 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी स्वतःला शोधण्यासाठी अशा हक्काच्या जागेची हक्काच्या कोपऱ्याची आवश्यकता आहे.. चला तर आजपासून सगळे शोधूयात आपल्या स्वतःच्या हक्काची स्वतःला रिलॅक्स करणारी स्वतःची जागा.

     

- नेहा कुलकर्णी जोशी